रसिक स्पेशल / हे असे कित्येक खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

महाराष्ट्राची ही निवडणूक आणि त्यानंतरचा घटनाक्रम शब्दशः अभूतपूर्व आहे, ऐतिहासिक आहे. आणि, नवे पर्व सुरू करणारा आहे

संजय आवटे

संजय आवटे

Dec 01,2019 12:20:00 AM IST

संजय आवटे

निवडणुका खूप होतात आणि सरकारेही स्थापन होतात. मात्र, महाराष्ट्राची ही निवडणूक आणि त्यानंतरचा घटनाक्रम शब्दशः अभूतपूर्व आहे. ऐतिहासिक आहे. आणि, नवे पर्व सुरू करणारा आहे. गेल्या काही दिवसांतील देशभरातील वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स पाहिल्यावर कदाचित अंदाज येईल, महाराष्ट्रात जे चालले आहे, ते किती महत्त्वाचे आहे! देशभरातील माध्यमे, त्यातही त्या त्या राज्यांतील प्रादेशिक वर्तमानपत्रे या सगळ्या नाट्याकडे कुतूहलाने बघत आहेत. त्यात संतापापेक्षाही महाराष्ट्राविषयीच्या कौतुकाची भावना अधिक आहे. गेल्या काही वर्षांतील एकचालकानुवर्ती सत्तेला महाराष्ट्राने आव्हान दिले आणि भल्याभल्यांचा तोरा उतरवला. ज्यांच्या हाती अवघी सत्ता एकवटली आहे त्यांचा पराभव करण्यासाठी उभा महाराष्ट्र एकवटतो आणि हे मदांध तख्त फोडतो, याचा जो मेसेज देशभर गेला आहे, त्यामुळे देशाचे राजकारण आता नवे वळण घेणार आहे.

तुमने तो रावण से लंका ही मांग ली...

मुंबई महानगर-पालिका अन्य पक्षाच्या ताब्यात असती तर गोष्ट वेगळी होती. ती कॉंग्रेसकडे असती तरी एकवेळ चालले असते. राष्ट्रवादीकडे असती तर अडचणच नव्हती. पण, शिवसेनेच्या ताब्यात मुंबई असता कामा नये. ज्या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेने भाजपशी सोबत केली, त्या मुंबईवरच यांचा डोळा आहे, हे सेनेच्या लक्षात आल्यानंतर चित्र खऱ्या अर्थाने बदलले. भाजपपासून शिवसेना दुरावली ती तेव्हा.

ज्या गोवा, मणिपूर, मेघालयात भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाही पायदळी तुडवली, त्या तिन्ही राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षा एकट्या मुंबई महानगरपालिकेचे बजेट जास्त आहे. मुंबई पंचक्रोशीत म्हणजे मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणात एक ना दोन, नऊ महानगरपालिका येतात. (तेवढ्या संपूर्ण गुजरातमध्ये नाहीत!) आपल्या शेजारची ही मुंबई काबीज करता येत नाही हे मोदी–शहांचे जुने शल्य आहे. ‘मुंबई का डॉन कौन?’ हा प्रश्न त्यांना कधीचा अस्वस्थ करतो आहे. देशातील गुजरात वगळता सर्व राज्ये गेली तरी चालतील, पण महाराष्ट्र जिंकायचाच आणि पुढे मुंबईही काबीज करायची, हे त्यांचे स्वप्न आहे. त्याला महाराष्ट्र–गुजरात नातेसंबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तसेच आर्थिक हितसंबंधही आहेत.


ठाकरेंसोबत संसार करतानाच शिवसेनेचं घर उन्हात बांधायचं, हे मोदी–शहांनी ठरवलं होतं. म्हणून तर शिवसेना सत्तेत सोबत असतानाही मुंबई महानगरपालिका जिंकण्याची जबाबदारी देवेंद्रांवर सोपवली गेली होती. मुंबई शिवसेनेच्या ताब्यात असणे मोदी आणि शहांना कधीचे खटकते आहे. देवेंद्रांनी एखाद्या विधानसभेसारखी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली. ती निवडणूक या व्यापक योजनेचा भाग होता. वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याचा प्रयत्न देवेंद्रांनी केला तो उगाच नव्हे. भाजप आणि शिवसेनेची ती नुरा कुस्ती नव्हती वा रुसवाफुगवाही नव्हता. देवेंद्रांना ते जमले नाही हे खरे, पण मुंबई जिंकता येऊ शकते, याची खात्री मिळाल्याने मोगॅम्बो खुश झाले.


मुंबई महानगरपालिका अन्य पक्षाच्या ताब्यात असती तर गोष्ट वेगळी होती. ती काँग्रेसकडे असती तरी एकवेळ चालले असते. राष्ट्रवादीकडे असती तर अडचणच नव्हती. पण, शिवसेनेच्या ताब्यात मुंबई असता कामा नये. ज्या मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेने भाजपशी सोबत केली, त्या मुंबईवरच यांचा डोळा आहे, हे सेनेच्या लक्षात आल्यानंतर चित्र खऱ्या अर्थाने बदलले. भाजपपासून शिवसेना दुरावली ती तेव्हा. ‘अग्निपथ’ चित्रपटात ‘मांडवा’ मागितल्यावर संजय दत्त हा हृतिक रोशनला म्हणतो ना, ‘तुमने तो रावण से उस की लंका ही मांग ली!’ भाजपचा डाव शिवसेना संपवण्याचा आहे आणि जागोजागी त्यांनी प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन संपवलेले आहे, हे केवळ विश्लेषण नाही, तर ते उद्याचे वास्तव आहे हे सेनेच्या लक्षात आले. शिवाय, इथे असणारा मुंबईचा मुद्दा देशाच्या पातळीवर कुठेही नाही. त्यामुळे ही लढत आणखी वेगळी आहे, हेही उद्धव ठाकरेंना समजले.


गोष्टींमध्ये असते ना, तसे शिवसेनेचा जीव आहे तो मुंबईत. त्यांना राज्यभर विस्तारायचे आहे. देशभर प्रभाव निर्माण करायचा आहे, असेही ते म्हणत असतात. पण, हातची मुंबई गेली तर आपले अस्तित्वच संपले, हे सेनेला समजते. ज्या पक्षांना आपण विरोध करत आहोत, त्या काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही मुंबईत काही रस नाही. आणि, ज्यांच्यासोबत आहोत, त्या भाजपला मुंबईतच रस आहे. संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे, भाजपला शिवसेना खतम करायची आहे. बाकी अवमान, फरपट हे मुद्दे महत्त्वाचे होतेच, पण ते कमी महत्त्वाचे होते. खरा मुद्दा हा होता. भाजपला जागा दाखवून आपण स्वतःचे वाघपण सिद्ध करायचे, हे उद्धव यांनी ठरवले होतेच. पण, तशी संधी मिळत नव्हती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. उद्धव यांनी तो घेतला आणि तब्बल ६३ जागा जिंकल्या. त्यानंतर मात्र त्यांची कमालीची फरपट झाली. ज्या शरद पवारांनी आज त्यांचे स्वप्न पूर्ण केले, त्यांनीच तेव्हा ती फरपट आरंभली होती. भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय पक्का होत होता, पण लोकसभा निवडणुकीच्या निकालाने शिवसेनेच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. त्यामुळे विधानसभेला भाजपसोबत जाण्याशिवाय अन्य पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट होता. विरोधकच नव्हते आणि देवेंद्रांना आव्हान देणे निव्वळ अशक्य होते. त्यामुळे आपली फरपट अटळ आहे, असे उद्धव यांना वाटत असतानाच शरद पवारांच्या झंझावाताने वातावरण फिरले. निवडणुकीचा निकाल अगदी तसा लागला, जो शिवसेनेला हवा होता. आणि, अगदी तसा लागला की जो भाजपला नको होता. भाजपला सोडून सरकार स्थापन करण्याचे शिवसेनेने ठरवले होते. मुख्यमंत्रिपदापेक्षाही खरा मुद्दा तो होता.

गोवा, मणिपूर, मेघालयात सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या अमित शहांनी शिवसेनेची ही अट मान्यही केली नाही, याचे कारण महाराष्ट्र गेला तरी चालेल, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे ही कल्पनाही ते सहन करू शकत नव्हते. मुंबईवर तर शिवसेनेचे राज्य आहेच, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणे त्यांना कदापि मान्य होणार नव्हते. जे मोदी आणि शहा शांतपणे (थंड डोक्याने!), भावनांमध्ये न गुंतता, साम–दाम–दंड–भेद अशा साऱ्या नीती वापरून राजकारण ‘खेळतात’, त्यांनी या वेळी मात्र हा निर्णय ‘इमोशनली’ घेतला. काहीही झाले, तरी सेनेचा मुख्यमंत्री नाहीच, यावर ते अडून बसले. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्रांना ते हवेच होते.


युती तुटली खरी, पण पुढे काय? ‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणणाऱ्या गँगची अशी खात्री होती की काही करून मोदी–शहा महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजपची शांतता आवाज येण्याइतकी भयंकर होती. त्यामुळे काही ना काही मार्ग काढून भाजपच सरकार स्थापन करणार, असे दावे होत होते. त्यात काँग्रेसची वृत्ती बर्फही थंड करून खाणारी. शरद पवारांच्या रोजच्या रोज गुगली. त्यामुळे काय घडेल, याचा अंदाज येत नव्हता. आदित्य ठाकरेंना वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यावर तर शिवसेनेचा गेम झाला, अशी चर्चा सुरू झाली. अखेर, तिन्ही पक्ष एकत्र आले आणि उद्धव ठाकरे हे आगामी मुख्यमंत्री, असे जाहीरही झाले. खुद्द पवारांनीच जाहीर केले. तशा हेडलाइन उमटल्या. पण, ते अंक वाचकांच्या घरात पोहोचण्यापूर्वीच नवी हेडलाइन आली. देवेंद्र आणि अजित पवार यांनी रातोरात सरकार स्थापन करून अंधाराच्या राज्याचा शपथविधी सोहळाही आटोपला. भाजपचा हाच तर गेम होता, असे म्हणून भक्तांनी चाणक्य अमित शहांच्या नावाने टाळ्या वाजवल्या. पण, महाराष्ट्रात बसलेल्या शरद पवार नावाच्या महाचाणक्याने अजित पवारांचे ते बंड आहे, असे जाहीर केले आणि मोडूनही काढले. मग, एकाच वेळी संसदीय शैलीत, त्याच वेळी न्यायालयीन पातळीवर आणि सोबत रस्त्यावर उतरून शरद पवारांनी हे अंधारातले सरकार बरखास्त केले. आणि, दिवसा उजेडात नवे सरकार स्थापन केले. तमाच्या तळाशी दिवे लागले आणि संविधानदिनी नवी प्रकाशवाट तयार झाली. महात्मा फुल्यांच्या पुण्यतिथीला ‘शेतकऱ्यांचा आसूड’ आठवत नव्या सरकारने शपथ घेतली.


निवडणुका खूप होतात आणि सरकारेही स्थापन होतात. मात्र, ही निवडणूक आणि त्यानंतरचा घटनाक्रम शब्दशः अभूतपूर्व आहे. ऐतिहासिक आहे. आणि, नवे पर्व सुरू करणारा आहे. गेल्या काही दिवसांतील देशभरातील वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स पाहिल्यावर कदाचित अंदाज येईल, महाराष्ट्रात जे चालले आहे, ते किती महत्त्वाचे आहे! ‘टेलिग्राफ’पासून ते ‘ओरिसा पोस्ट’पर्यंत अनेक दैनिकांच्या पहिल्या पानांवर महाराष्ट्र उमटत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला आणि २८ नोव्हेंबरपर्यंत सरकारच स्थापन होत नाही, यामुळे मराठी माणूस संतापणे स्वाभाविक आहे. नको हे राजकारण अथवा आता मी मतदानच करणार नाही, इथपर्यंत त्याचा पारा चढणेही स्वाभाविक आहे. सगळे पक्ष सारखेच लबाड आहेत, असा सूर व्यक्त होणेही समजून घेण्यासारखे आहे.


मात्र, देशभरातील माध्यमे, त्यातही त्या त्या राज्यांतील प्रादेशिक वर्तमानपत्रे या सगळ्या नाट्याकडे कुतूहलाने बघत आहेत. त्यात संतापापेक्षाही महाराष्ट्राविषयीच्या कौतुकाची भावना अधिक आहे. गेल्या काही वर्षांतील एकचालकानुवर्ती सत्तेला महाराष्ट्राने आव्हान दिले आणि भल्याभल्यांचा तोरा उतरवला, अशी भावना तेथील माध्यमांमध्ये आहे. शिवाय, हा तोरा कोणत्या एका व्यक्तीने नाही, तर अवघ्या महाराष्ट्राने उतरवला, असेच या दैनिकांमधील लेख, अग्रलेख सूचित करत आहेत. देवेंद्र फडणवीस तोंडावर पडणे एवढाच याचा अर्थ नाही. एकतर महाराष्ट्र म्हणजे मणिपूर वा गोवा नव्हे. देशातील, उत्तर प्रदेशनंतरचे, सगळ्यात मोठे राज्य. मुंबईसारखे राजधानीचे शहर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय. देवेंद्रांची प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट. मीच मागे म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मिश्रण. म्हणजे, सत्ता चालवताना ते मोदी असतात, तर निवडणूक जिंकताना शहा. ज्यांच्या हाती अवघी सत्ता एकवटली आहे, त्यांचा पराभव करण्यासाठी उभा महाराष्ट्र एकवटतो आणि हे मदांध तख्त फोडतो, याचा जो मेसेज देशभर गेला आहे, त्यामुळे देशाचे राजकारण आता नवे वळण घेणार आहे. (शीर्षकातील ‘मराठी’ हा शब्द भाषेच्या संदर्भाने नाही. तो अवघा महाराष्ट्र, ‘मराठी माणूस’ अशा अंगाने आहे.)


काँग्रेसला यातून देशव्यापी उभारी मिळणार आहे. शरद पवार या ‘महाराष्ट्र पॅटर्न’चे जनक असल्याने आता देशभरातील विरोधकांचे ते नेते होऊ शकणार आहेत. हाच प्रयोग देशस्तरावर करण्याची संधी त्यांना आहे. शिवसेनेसाठी हे ‘सायकॉलॉजिकल वॉरफेअर’ आहे, ज्यात ते जिंकलेले आहेत. सरकार असो वा नसो, सेना चालते ती नेत्याच्या करिष्म्यावर. बाळासाहेबांनंतर उद्धव यांनी शिवसेना वाढवली हे खरे, पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही मर्यादा आहेत. आता मुख्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव यांना तसे वलय मिळाले आहे, जसा नेता शिवसैनिकांना हवा आहे. (अर्थात, हे दुधारी शस्त्र आहे. सत्तेच्या वाऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख या पदाचीच पिसं गळणार नाहीत, हे उद्धव यांना पाहावं लागणार आहे!) एकुणात, शिवसैनिक प्रचंड उत्साहात आहेत आणि शिवसेनेसाठी हे वातावरण अत्यंत आश्वासक आहे. शिवतीर्थावरील शपथविधी सोहळा हा त्याचा पुरावा होता.


भाजपसाठी मात्र हे सारं काळजी वाढवणारं आहे. सरकार गेलं यापेक्षाही जी नाचक्की झाली आणि लोक खुलेआम भाजपच्या विरोधात बोलू लागले, ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडातही भाजप पराभूत झाला. पण, तिथले संदर्भ स्थानिक होते. कर्नाटकात भाजपला फटकारले गेले, पण तिथले सरकार पाडून भाजप पुन्हा सत्तेत आला. तेही संदर्भ वेगळे आहेत. (इथेही असे प्रयोग करण्याचा प्रयत्न भाजपचा असू शकतो!) महाराष्ट्राच्या निवडणुकीला आणि सरकार स्थापनेला असणारे संदर्भ व्यवच्छेदक वेगळे आहेत!


ही निवडणूक ‘आणखी एक’ अशी निवडणूक नव्हती. निकाल ऐतिहासिक होता आणि सरकार स्थापन झाले, ती पद्धत तर अभूतपूर्व आहे! राजकारणाची परिभाषा बदलून टाकणारा हा घटनाक्रम आहे. निवडणुकीच्या रिंगणात मतदार हाच केंद्रबिंदू आहे, हे महाराष्ट्रातील मतदारांनी सिद्ध केले. तर, घोडेबाजार करून, सारे संकेत पायदळी तुडवून तथाकथित चाणक्यांनाही सत्तास्थापनेचा खेळ खेळता नाही, हे निकालानंतरच्या घडामोडींनी अधोरेखित केले. महाराष्ट्राने भल्याभल्यांचा तोरा उतरवला आणि अवघ्या देशाला नवी प्रकाशवाट दाखवली. महाराष्ट्राचे राजकारण आगामी काळात बदलत जाणार आहेच, पण निवडणुकीची चाहूल लागलेल्या बिहारसारख्या राज्यातील नितीशकुमारांनाही त्यामुळे बळ मिळणार आहे. पर्यायाच्या वाटा सर्वदूर दिसू लागणार आहेत. विरोधी अवकाश रुंदावत जाणार आहे. एकध्रुवीय राजकारण बहुध्रुवीय, बहुपेडी होत जाणार आहे. महाराष्ट्रातील ही नवी “तिघाडी’ अनैसर्गिक आहे. या तिघाडीला महाजनादेश नाही, पण महाराष्ट्रासाठी, दीर्घकालीन राजकारणासाठी आणि लोकशाहीसाठी हे “महासरकार’ स्थापन होणे महत्त्वाचे आहे! सरकार स्थापन झाले, महाराष्ट्रासारखे बारा कोटींचे राज्य निर्नायकी राहणे गैर आहे. महायुती सत्तेत आली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. पण, प्राप्त परिस्थितीत जे घडले आहे, त्याशिवाय अन्य विधायक पर्याय उपलब्ध नाही. अंधारातल्या सरकारपेक्षा हे उजळ माथ्याने आलेले सरकार अधिक आश्वासक.


पण पुढे काय? भाजपला दूर ठेवण्यासाठी हे तिघे एकत्र आले. आता सरकार चालवताना काय? नैसर्गिक आघाडी असूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार चालवताना किती मारामारी केली, हे महाराष्ट्र विसरलेला नाही. भाजप आणि शिवसेना यांच्याविषयी तर बोलायलाच नको. आता तर ही तिघाडी अनैसर्गिक आहे. शिवसेनेची भूमिका आणि दोन्ही काँग्रेसची भूमिका यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. दोन्ही पक्षांचे आदर्शवाद वेगळे आहेत. मूल्यव्यवस्था वेगळी आहे. शिवाय, स्थानिक पातळीवर दोन्ही काँग्रेसची मुख्य लढाई शिवसेनेबरोबर आहे. अशा वेळी हे सरकार चालवण्याचे मोठे आव्हान आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले असले तरी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली चमकदार कामगिरी महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. देवेंद्रांकडून अशाच अपेक्षा आहेत. विरोधी पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेसचे अपयश आपण पाहिले आहे. अशा वेळी विरोधी पक्षनेता कसा असतो, हे त्यांनी आता शिकावे. राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेता करायला भाजप म्हणजे काही काँग्रेस नाही! दमदार आणि संख्येनेही महाकाय असणारा विरोधी पक्ष म्हणून भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


तिघाडीची बिघाडी होऊ नये यासाठी नव्या सरकारला महाराष्ट्राचा विचार करावा लागणार आहे. इथला सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे आशेने पाहतो आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकरी उद्ध्वस्त झाला. सहकार संपला. गावे उजाड झाली. शहरे बकाल झाली. विरोधाचा सूर दाबला गेला. “भारतमाता की जय’ म्हणत दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र बदलण्याचे मोठे आव्हान आहे. तिन्ही पक्षांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. काँग्रेसकडे तर माजी मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादीकडेही नेत्यांची फौज आहे. पण, पाच वर्षे झालेल्या उपासमारीमुळे दोन्ही काँग्रेसची ही कार्यक्षमता नको त्या ठिकाणी बहरणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. “मी पुन्हा येईन’च्या अहंकाराच्या फुग्याला लोकांनी टाचणी लावली हे जसे खरे आहे, तसेच काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मस्तवाल राजकारणालाही लोकांनी नाकारले आहे हेही लक्षात घ्यावे लागेल. गळ्यात सोन्याची साखळी आणि दारासमोर स्कॉर्पिओ असणाऱ्या काँग्रेसी नेत्यांचा मस्तवालपणा स्थानिक पातळीवर अनेकदा पाहायला मिळाला आहे. शिवसेनेचेही वेगळे नाही. सरकार म्हणून काम करताना या पक्षांना आत्मपरीक्षण करावे लागेल. स्वतःच्या शैलीत बदल करावे लागतील. सुडाचे राजकारण नाकारावे लागेल.


एकत्रितपणे सरकार चालवण्यासाठी तुम्हाला कौल मिळालेला नाही. पण, तुम्ही सरकार स्थापन केले, हे चांगलेच आहे. महाराष्ट्राच्या खूप शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत.


पण, एक भान असू द्या. हे सिंहासन तुमचे नाही. अंतिम सत्ता जनतेची आहे, याचा पुढील पाच वर्षे विसर पडू देऊ नका.


विसराल तर घसराल आणि खोल दरीत कोसळाल!

पण पुढे काय?


देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरले असले तरी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली चमकदार कामगिरी महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. देवेंद्रांकडून अशाच अपेक्षा आहेत. तिघाडीची बिघाडी होऊ नये, यासाठी नव्या सरकारला महाराष्ट्राचा विचार करावा लागणार आहे. इथला सर्वसामान्य माणूस तुमच्याकडे आशेने पाहतो आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकरी उद्ध्वस्त झाला. सहकार संपला. गावे उजाड झाली. शहरे बकाल झाली. विरोधाचा सूर दाबला गेला. ‘भारतमाता की जय’ म्हणत दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र बदलण्याचे मोठे आव्हान आहे.

(लेखक “दै. दिव्य मराठी’चे राज्य संपादक आहेत.)

X
COMMENT