स्टेटमेंट / ‘मी पुन्हा येईन’चा घोष सोडा, महाराष्ट्राला नवे सरकार द्या!

अपमानाचा बदला घेण्यासाठी सेना जोरात, देवेंद्रांचा पाय खोलात

संजय आवटे

संजय आवटे

Nov 08,2019 08:22:28 AM IST

ि धानसभा निवडणुकीची चाहूल लागली, तेव्हा सत्ताधारी कोण, हे स्पष्ट होते. मात्र, विरोधक शोधूनही सापडत नव्हते. “या निवडणुकीनंतर विरोधक दिसणारही नाहीत,’ अशा वल्गना देवेंद्र फडणवीस करत होते. निकाल लागल्यानंतर आताचे चित्र अगदी वेगळे आहे. विरोधक स्पष्ट आहेत, पण सत्ताधारी दिसत नाहीत. ‘आपण विरोधी बाकांवर बसणार. कारण आम्हाला तोच कौल जनतेने दिला आहे,’ अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे विरोधक कोण, हे स्पष्ट आहे. पण, सरकार मात्र गायब आहे.


महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत आज रात्री संपत असली, तरीही सरकार स्थापन झालेले नाही. पेच वाढतच चालला आहे आणि चित्र अद्यापही अस्पष्ट आहे.


राज्यात भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजप ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ ठरली. निकाल स्पष्ट होता. त्यामुळे खरे तर कोणताही पेच निर्माण होण्याचे काही कारण नव्हते. मात्र, आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समसमान वाटा हवा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. त्या भूमिकेत गैर काही नाही. दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली. समान जागा, सत्तेत समसमान वाटा असे या युतीचे सूत्र होते, असे सांगितले जाते. तरीही कमी जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने दाखवली. त्या वेळचे चित्र वेगळे होते. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला होता. भाजपला विलक्षण यश मिळालेले होते. ३७० च्या मुद्द्यामुळे वातावरण तापले होते. काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ होती, राष्ट्रवादी काँग्रेसमधून रोज एक नेता पक्ष सोडून बाहेर पडत होता. देवेंद्र फडणवीस एखाद्या बाहुबलीप्रमाणे पुढे आले होते. त्यांच्या महाजनादेश यात्रेला महाप्रतिसाद मिळत होता. त्या तुलनेत विरोधक दिसतही नव्हते. महाराष्ट्राला तेव्हा सत्ताधारी होते, पण विरोधकच दिसत नव्हते. विरोधकांच्या शोधात महाराष्ट्र होता. शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधकाची भूमिका बजावली असली, तरी बदलत्या संदर्भात भाजपसोबत युती केल्याशिवाय अन्य पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपवण्यात गुंतलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही सध्या शिवसेनेला बरोबर घ्यायचे होते. त्यामुळे महायुती झाली. शिवसेनेने कमी जागा मान्य केल्या. खरे तर तेवढ्याही जागा सेनेच्या पदरात पडल्या नसत्या, पण त्याच सुमारास शरद पवारांचा झंझावात सुरू झाला.


विरोधकांची चाहूल भाजपला लागली. शिवसेनेइतकीच आपल्यालाही युती अपरिहार्य आहे, हे देवेंद्रांना समजले. जागावाटप झाले खरे, पण भाजप आणि शिवसेनेने अनेक ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडण्याची व्यूहरचना आखली.


भाजप आणि शिवसेना यांची युती खरीच, पण त्या दोघांनी खरी निवडणूक लढवली ती एकमेकांच्या विरोधात. देवेंद्र फडणवीसांचा होरा असा होता की विरोधक तर गलितगात्रच आहेत. त्यामुळे २८८ जागा असलेल्या महाराष्ट्रात महायुतीला २२० हून अधिक जागा मिळतील. महत्त्वाचे म्हणजे, एकट्या भाजपला १४५ जागा मिळतील. शिवसेनेच्या जागा मुद्दाम कमी करायच्या. म्हणजे अर्थातच सेना युतीत असेल खरी, पण गपगुमान बसेल. जे मिळेल ते घेईल. शिवसेनेची इच्छा एवढीच होती, की काही झाले तरी आपल्या हातात सत्तेच्या चाव्या यायला याव्यात. भाजपला एकट्याच्या बळावर मॅजिक फिगर गाठता येऊ नये.


निकाल अगदी तसा लागला, जसा तो उद्धव ठाकरेंना हवा होता. आणि, अगदी तसा लागला, जो देवेंद्रांना अजिबात नको होता. त्यांचे “मी पुन्हा येईन’ एवढे पक्के होते की शिवसेनेला निकालानंतर असे महत्त्व द्यावे लागेल, हे त्यांच्या गावीही नव्हते.


मात्र, सगळेच अंदाज फिरले. भल्याभल्यांचे आडाखे मतदारांनी उधळून लावले. विरोधक गलितगात्र होते हे खरे, पण मतदारांची या सरकारवर प्रचंड नाराजी होती. मोठा असंतोष होता. या असंतोषाला नायक नव्हता, त्यामुळे मतदारांसमोर देवेंद्रांशिवाय पर्याय नव्हता. पण, आकस्मिकपणे शरद पवार रणांगणात उभे राहिले. त्यांच्या झंझावाताने चित्र पालटले. शरद पवारांनी ईडीला दिलेले आव्हान, भरपावसातली त्यांची सभा यामुळे वातावरण बदलले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शंभरहून अधिक जागा मिळाल्या. खुद्द भाजप १०५ जागांवरच अडकला. मॅजिक फिगर १४५ असल्याने सगळ्या किल्ल्या शिवसेनेच्या हातात गेल्या. एवढेच नाही, तर भाजपला दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही एकत्र येऊन सरकार बनवू शकतात, अशी आकडेवारी पुढे आली.


आजवरच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवसेना सज्ज झाली नसती, तरच नवल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेची फरफट केली होती. त्या वेळी हे दोघेही निवडणूक वेगवेगळे लढले होते. भाजपकडे १२२, तर शिवसेनेकडे ६३ आमदार होते. दोघांनी एकत्र येणे नैसर्गिक होते. पण, भाजपने शिवसेनेला अजिबात जुमानले नाही. त्यात, स्थिरतेसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्वच संपून गेले. आधी विरोधी पक्षनेतेपद घेतलेली शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली खरी; पण कमालीचे दुय्यमत्व सेनेच्या वाट्याला आले. मोदी लाटेत भलेभले वाहून गेलेले असताना ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये स्वबळावर ६३ जागा जिंकल्या, ती सेना सरकारमध्ये मात्र असहाय ठरली. गेल्या पाच वर्षांत सेनेला ठोकण्याची एकही संधी देवेंद्रांनी सोडली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर आव्हान उभे करून भाजपने अगदी बरोबरीच्या जागा मिळवल्या. राज्यात अशी स्थिती. केंद्रातही दुय्यम मंत्रिपद. त्यामुळे शिवसेनेचे सगळीकडे हसे झाले. राजीनामे खिशात घेऊन फिरणारे उद्धव ठाकरे चेष्टेचा विषय ठरले. या निवडणुकीपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि ३७० चा माहोल यामुळे तर भाजपसोबत अशीच फरफट होत शिवसेना संपून जाणार, असा अनेकांचा अंदाज होता. देवेंद्रांची ती खेळी होती. विरोधी पक्ष, मित्रपक्ष, पक्षांतर्गत विरोधक असे सगळ्यांना संपवून टाकण्याचा विडाच संघ स्वयंसेवक असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उचललेला होता. अवघ्या जगावर त्यांना एकहाती राज्य करायचे होते! मात्र, निकालाने त्यांचा तोरा उतरला.


शिवसेना आता जो वाटा मागत आहे, त्यात गैर काही नाही. निम्म्या जागा असूनही मागच्या सरकारमध्ये सेनेला ना उपमुख्यमंत्रिपद मिळाले, ना कोणते महत्त्वाचे खाते मिळाले! सरकारमध्ये एकत्र असूनही शिवसेनेच्या गंडस्थळांवर हल्ला केला गेला. आता मात्र शिवसेनेने समसमान वाटा मागणे स्वाभाविक आहे. या निकालांनी शिवसेनेला सगळे हिशेब चुकते करण्याची संधी दिली आहे. ज्यांना ज्यांना संपवण्याचा डाव देवेंद्रांचा होता, त्यापैकी प्रत्येकाला आता अशी संधी मिळाली आहे. भाजपमधील पक्षांतर्गत विरोधकांनाही देवेंद्रांचे महत्त्व कमी होणे हवेच आहे. संजय राऊत यांना बळ देणाऱ्यांमध्ये असे अनेक जण आहेत.


ही विधानसभा निवडणूक गाजवली ती शरद पवारांनी आणि निकालानंतरचे ‘सामना’वीर आहेत ते संजय राऊत. हा पेच वाढत असताना शरद पवार या प्रक्रियेत आहेत कुठे? खरे म्हणजे, शरद पवार अशा राजकारणाचे ‘चॅम्पियन’ मानले जातात. पवारांनी ठरवले, तर सेनेला पाठिंबा देऊन ते सरकार स्थापन करू शकतात. त्यांनी तसे करावे, असे अनेकांना वाटते. निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी अशी गणितं मांडताना दिसत होते. २०१४ मध्ये जे शरद पवार स्थिरतेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची खेळी खेळत होते, ते आज तर हे अगदी सहजपणे करू शकतात. पण, शरद पवार असे करणार नाहीत. अशा प्रकारच्या राजकारणानेच गमावलेली विश्वासार्हता ते आता पुन्हा मिळवू पाहत आहेत. आजचे शरद पवार वेगळे आहेत. मुंबईत राजकारणाचे रणांगण तापलेले असताना शरद पवार बांधावर आहेत, हा त्यांच्या बदलणाऱ्या राजकारणाचा पुरावा आहे. अर्थात, तशी संधी आलीच, तर पवार ती सोडणारही नाहीत! मग सरकार स्थापन होणार की नाही? राष्ट्रपती राजवट येणार का? मध्यावधी निवडणुका आल्या तर काय? असे काही घडले, तर त्याचे खापर अर्थातच भाजप आणि शिवसेनेवर फोडले जाईल. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांवर. ‘मी पुन्हा येईन’चा घोष त्यासाठी त्यांना सोडावा लागेल. देवेंद्रांनी आता एक पाऊल मागे घेत शिवसेनेची मागणी मान्य केली, तर सरकार स्थापन होऊ शकते. त्यामुळे चेंडू कोर्टात आहे तो देवेंद्रांच्या. असे करण्याऐवजी काळजीवाहू सरकार, राष्ट्रपती राजवट किंवा सत्तास्थापनेचा दावा, घोडेबाजार अशा कर्नाटकी दिशेने ते जाणार असतील, तर मात्र “बुडत्याचा पाय खोलात’ याशिवाय अन्य म्हण त्यांचे वर्णन करू शकणार नाही!

X
COMMENT