आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनौ/ अयोध्या - उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करणार नाही. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सातपैकी सहा सदस्यांनी फेरविचार याचिका दाखल करू नये, असे मत मांडले, तर अब्दुल रज्जाक यांनी मात्र याचिका दाखल करावी, असे सुचवले. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुखी म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा निकाल भलेही आमच्या बाजूने नसेल. परंतु, देशातील शांतता आणि बंधुभाव कायम राहावा या दृष्टीने बोर्ड हा निकाल मान्य करत आहे. सरकारच्या वतीने अयोध्येत दिल्या जाणाऱ्या पाच एकर जागेबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.
100 मुस्लिम मान्यवरांचे आवाहन... : अभिनेता नसिरुद्दीन शहा, अभिनेत्री शबाना आझमीसह १०० मुस्लिम मान्यवरांनी अयोध्या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करू नका, असे आवाहन मुस्लिम पक्षकारांना केले आहे. यासंबंधीच्या निवेदनावर अनेक मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते, नाटककार, संगीतकार, कवी, बॉलीवूडचे कलाकार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सुन्नी वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत : भाजप नेते शहानवाज हुसेन, रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांच्यासह इतरांनी सुन्नी वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने उभा असल्याचे यातून स्पष्ट होते, असे महंत म्हणाले. रामानंद संप्रदायाचे प्रमुख जगद््गुरू रामानंदाचार्य स्वामी रामदिनेशाचार्य यांनी हा निर्णय राष्ट्रवादाचा विजय असल्याचे नमूद करून मुस्लिम पक्ष अभिनंदनास पात्र असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी राममंदिरासाठी २०० एकर जागा देण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
याचिका दाखल होणारच...
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी अयोध्या निकालाविरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. लॉ बोर्डाने १७ नोव्हेंबरला बैठकीत फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.