आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेसातीची अंधश्रद्धा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एकदा शनी अमावास्येनिमित्त मैत्रिणीसोबत मी शनिशिंगणापूरला गेले होते. तेथे मंदिराच्या आवारातच एका झाडाखाली आम्ही आमच्या चपला काढून ठेवल्या होत्या. रांगेत जाऊन शनैश्वराचे दर्शन घेतले. मंदिराचे बदललेले भव्य स्वरूप पाहून मन प्रसन्न झाले. मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी दिसून आली. मंदिराच्या आवारातच आरामासाठी मोठे दालन असून तेथे बेंच टाकण्यात आलेले आहेत. प्रसादाचीही व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे. बाहेरील बाजूस टेबल-खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. त्यावर बसून जेवण करण्याची सोय आहे. आम्ही तेथेच बसून घरून आणलेले जेवण केले. बाहेर खूप ऊन असल्याने दालनात जाऊन विश्रांती घेतली. सायंकाळचे पाच वाजले होते. मंदिरात साफसफाईच्या कामांना सुरुवात झाली होती. आमचीही परतीची तयारी सुरू झाली होती. मी माझ्या चपला शोधत असतानाच एक ट्रॅक्टरची ट्राली अर्ध्याअधिक चपला-बुटांनी भरलेली दिसली. झाडझूड करणारे नोकर त्या चपला ट्रॅक्टरमध्ये उचलून टाकत होते. एक बाई तिच्या चपला शोधण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये चढली तेव्हा स्वयंसेवकांनी तिला खाली उतरण्यास भाग पाडले. मी आपल्या चपलांविषयी विचारले असता तो हसत म्हणाला, ‘चपलांचे राहू द्या. तुमची साडेसाती गेली.’ ट्रॅक्टर निघून गेले. अनेक भक्त अनवाणी पायांनीच जाताना दिसले. अनवाणी पायांनी आम्हाला चालताही येईना. बस मंदिरापर्यंत आली होती. त्या बसमध्ये कसेबसे बसलो, पण चपला गेल्याची रुखरुख मनात कायम होतीच. नंतर मला बोलण्यातून कळले की, मुद्दाम चपला सोडून भाविक निघून जातात. चपला गेल्या तर साडेसाती जाते, अशी तेथील लोकांची धारणा आहे. माझ्या मते शनैश्वराच्या दर्शनानेच साडेसाती जाते, अशी भाविकांची धारणा झाली पाहिजे.