आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद पुकारलेल्या पक्षाला नाही तर हेतूला पाठिंबा; मनसेप्रमुख राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंधन दरवाढीविरोधात सोमवारी विरोधकांनी पुकारलेला भारत बंद हा कुणी पुकारला आहे, यापेक्षा त्यामागचा हेतू काय होता ही बाब आपल्या दृष्टीने महत्त्वाची होती, म्हणून मनसेने या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याचे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. केंद्राने केलेली नोटबंदी आणि जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा निर्णय फसल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशात हे सरकार हात घालत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. तसेच इंधन दरवाढ हा आपल्या हातातला विषय नाही, असे आज सांगणारा भाजप विरोधात असताना का आंदोलने करत होता, असा सवालही त्यांनी केला. 


'कृष्णकुंज' निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी बंद यशस्वी झाल्याचा दावा केला. आजच्या बंदद्वारे सर्वसामान्य लोकांच्या मनात सरकारविरोधात असलेला रोष प्रकट झाल्याचे ते म्हणाले. मात्र, बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल सरकारने आमच्या कार्यकर्त्यांवर जी गंभीर गुन्ह्यांची कलमे लावली, ती योग्य नसून भविष्यात भाजप जेव्हा विरोधात असेल तेव्हा त्यांनाही याचे परिणाम भोगावे लागतील. हे सर्व प्रकरण भाजपच्या अंगलट येणार, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या इंधन दरवाढीविरोधातल्या वक्तव्याचाही त्यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. 


रविशंकर प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार जर इंधन दरवाढ हा सरकारच्या हातातला विषय नसेल तर विरोधी पक्षात असताना भाजप इंधन दरवाढीविरोधात का आंदोलने करत होता? तसेच विरोधात असताना खुद्द नरेंद्र मोदींनी इंधन दरवाढीविरोधात केलेली वक्तव्ये काढून पाहावीत, असा खोचक सल्लाही त्यांनी या वेळी दिला. पैसे आणि ईव्हीएमचा गैरवापर करून निवडणुका जिंकणे हाच भाजपचा अजेंडा असून भाजपचा कारभार हा काँग्रेसपेक्षाही वाईट असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, आपल्याला काँग्रेसची भलामण करायची नाही. मात्र खोटे आकडे सांगण्यात भाजपचा हातखंडा आहे. देश हागणदारीमुक्त झाल्याचा दावा भाजप करते, मग सकाळी उघड्यावर शौचाला बसलेले दिसतात ते मोर असतात का, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या दाव्याची खिल्ली उडवली. 


शिवसेना म्हणजे झिपरे कुत्रे 
शिवसेना आपल्यावर जे आरोप करते आहे, तशाच स्वरूपाचे आरोप शिवसेनेवर झाले होते. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेला वसंतसेना म्हटले जायचे. पैसे अडकले किंवा कामे अडली की शिवसेना सत्ता साेडण्याची धमकी देते आणि कामे झाल्यावर सत्तेला चिकटून राहते, असे सांगताना राज ठाकरे यानंी शिवसेनेला झिपऱ्या कुत्र्याची उपमा दिली. 

बातम्या आणखी आहेत...