आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांची मनमानी नको, स्वस्त व्याजाचा लाभ ग्राहकांना मिळावा : कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लवचिक (फ्लोटिंग) व्याजदरावर कर्ज घेणाऱ्या लोकांना घटलेल्या व्याजदराचा फायदा देण्यात बँका मनमानी करत असल्याने सुप्रीम कोर्टाने सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून ६ आठवड्यांत उत्तर मागितले आहे. 

 

याचिकाकर्ता मनी लाइफ फाउंडेशनच्या सूचनांना कोर्टाने १२ ऑक्टोबर २०१७ ला आरबीआयकडे पाठवून यावर निर्णय घेण्यास सांगितले होते. विविध बँका व नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या मध्यमवर्ग, कनिष्ठ मध्यमवर्गाला लवचिक दरावर घर, शैक्षणिक व वाहन कर्ज देत असल्याचे फाउंडेशनने एका जनहित याचिकेच्या माध्यमातून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. बँकांचा खर्च वाढला की व्याजदर त्वरित वाढवला जातो. परंतु खर्च घटल्यानंतर सहा-सहा महिन्यांपर्यंत व्याजदर घटवले जात नाही. व्याजदर घटल्याची किंवा वाढल्याची माहितीही ग्राहकांना दिली जात नाही. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. व्याज मोजण्याची प्रक्रिया भेदभाव, दडपशाहीची असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 

 

२०११ मध्ये रेपो दर २.०% वाढला, बँकांनी व्याजही तितकेच वाढवले 
आरबीआयने २०१४ पासून आजपर्यंत रेपो दर २.०% घटवले आहे. याआधी २०११ मध्ये सात वेळा २.०% पर्यंत रेपो दर वाढवण्यात आले. तेव्हा बँकांनी व्याजदरात त्वरित २.०% पर्यंत वाढ केली. परंतु यानंतर आरबीआयने रेपो दर घटवण्यास सुरुवात केली, मात्र बँकांनी दर घटवले नाहीत. चार वर्षांत रेपो दर २.०% घटले, तर बँकांनी बेस रेटमध्ये १.०५% कपात केली. 

 

रेपो दरातील कपातीचा फायदा ग्राहकांना नाहीच 
२०१५ मध्ये रेपो दर १.२५% घटले, बँकांनी बेस रेट ०.७% घटवले : २०१५ मध्ये आरबीआयने रेपो दर चार वेळा कमी केला. परंतु बँकांनी ग्राहकांना तीन वेळाच दिलासा दिला. तो ०.७०% इतकाच होता. दुसरीकडे रेपो दर मात्र १.२५% कमी झाले होते. विशेष म्हणजे रेपो दर घटल्यानंतर बँकांनी लगेच बेस रेट घटवले नाहीत. प्रत्येक वेळी दोन ते चार महिन्यांचा वेळ घेण्यात आला. 


- २०१६ मध्ये रेपो दर ०.५०% घटवले, बँकांनी व्याजदर घटवले नाही : ५ एप्रिल २०१६ रोजी रेपो दर ०.२५% व ४ ऑक्टोबरला पुन्हा ०.२५% घटवले, परंतु बँकांनी बेस रेट घटवले नाही. 
- २०१७ मध्ये रेपो दर ०.२५% घटले, बँकांनी ०.५०% बेस रेट घटवले : या वर्षात रेपो दर दोन वेळा ०.५०% वाढले, बँकांनी तीन वेळा व्याज ०.५०% पर्यंत वाढवले आहे. 
- पण...जेव्हा रेपो दर वाढले तेव्हा व्याजदरात तत्काळ वाढ करण्यात आली : २०१० व २०११ मध्ये ११ वेळा रेपो दर वाढले. बँकांनी त्वरित व्याजदर वाढवले. या दोन वर्षांत रेपो दर ३% पर्यंत वाढले. दबाव वाढल्याने बँका २.५०% पर्यंत व्याज वाढवू शकल्या. 

- बँकांची मनमानी थांबवण्यासाठी ४ मुख्य सूचना, कन्व्हर्जन शुल्कही न आकारण्यास सांगितले होते 
- १ ज्या बँका फ्लोटिंग दर असलेल्या कर्जावर सध्याच्या व्याजदरापेक्षा जास्त व्याज घेतात व कमी झालेल्या दराचा फायदा ग्राहकांना देत नाहीत त्यांच्यासाठी आरबीआयने निर्देश जारी केले. 
- २ फ्लोटिंग दरावर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कमी व्याजाचा फायदा मिळत नसेल तर ती रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जायला हवी. मध्यवर्ती योजनेच्या माध्यमातून ही रक्कम फ्लोटिंग दरावर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना परत मिळावी. 
- ३ ग्राहक कमी व्याजदरासाठी पात्र आहेत. त्यांना कमी व्याजदर मिळावा यासाठी कन्व्हर्जन शुल्क लावले जाऊ नये. अशा शुल्काची वसुली थांबवण्याचे निर्देश द्यावे. 
- ४ व्याजदरात झालेल्या बदलाबाबत बँकांनी ग्राहकांना त्वरित कळवावे. दूरध्वनी, एसएमएस आणि ईमेलद्वारे ही सूचना द्यावी. 

बातम्या आणखी आहेत...