आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवस संघर्ष; ना ममता जिंकल्या, ना सीबीआय, पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची फक्त चौकशी करा, अटक नको, सुप्रिम कोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प. बंगाल सरकार आणि सीबीआय यांच्यातील तणावपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दोन्ही बाजूंनी अशा नाहक विरोधाभासापासून दूर राहिले पाहिजे, अशा शब्दांत दोन्ही पक्षांना फटकारले. सीबीआयच्या याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालय म्हणाले, शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणाच्या चौकशीत पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सहकार्य करावे लागेल. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने राजीव कुमार यांना सीबीआयच्या शिलाँग येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. याची तारीख सीबीआय ठरवेल. 


सीबीआयला कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची फक्त चौकशी करता येईल, त्यांना अटक करता येणार नाही. तसेच अन्य कोणतीही मोठी कारवाई करता येणार नाही, हेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

 

तिसऱ्या दिवशी धरणे मागे 
ममता यांनी तिसऱ्या दिवशी धरणे आंदोलन मागे घेतले. यात सहभागी झालेल्या पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने प. बंगाल सरकारला दिले आहेत. याचा ममतांनी इन्कार केला. 

 

सुप्रीम कोर्ट- लाइव्ह : सीबीआयकडून अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल, तर प. बंगाल सरकारकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली 

 

वेणुगोपाल : पोलिस आयुक्त राजीव कुमार शारदा चिटफंडप्रकरणी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख होते. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा चौकशी सीबीआयकडे सोपवली, तेव्हा राजीव यांनी सर्व कागदपत्रे दिली नाहीत. या संदर्भात राजीव यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यासाठी सीबीआयने त्यांना बोलावले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. 

 

मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई : आम्ही कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत आहोत. 


वेणुगोपाल : राजीव यांनी आरोपींचे दुरुस्ती केलेले कॉल रेकॉर्ड सीबीआयला दिले. त्यातून कोणी कोणाशी संभाषण केले हे स्पष्ट होत नाही. सुदीप्तो सेन यांचा सेलफोन आणि लॅपटॉप त्यांना परत करण्यात आला आहे. हे एका कारस्थानाचे निदर्शक आहे. राजीव चौकशीसाठी येत नाहीत.

 
सिंघवी : राजीव हे जणू खलनायक आहेत अशा रीतीने हे सर्व होत आहे. मात्र, त्यांनी अनेकदा सीबीआयला पत्र पाठवून एखाद्या त्रयस्थ ठिकाणी भेटण्याची विनंतीही केली. जेथे एसआयटी उपस्थित असेल आणि सीबीआय एकाच वेळी सर्वांना प्रश्न विचारेल.

 
मुख्य न्यायमूर्ती : आपण (राजीव कुमार आणि प. बंगाल सरकार) बऱ्याच गोष्टींचा अंदाज व्यक्त करत आहात. आपली समस्या काय आहे? तुम्हाला सीबीआयच्या चौकशीत सहकार्य करावे लागेल. 


वेणुगोपाल : राजीव यांची दिल्लीत चौकशी करण्याची सीबीआयची इच्छा आहे. 


सिंघवी : राजीव यांची कोलकाता येथे किंवा एखाद्या त्रयस्थ ठिकाणी चौकशी करता येईल. 
मुख्य न्यायाधीश : दोन्ही पक्ष सहमत होतील असे ठिकाण सांगा. 


वेणुगोपाल : शिलाँग येथील सीबीआयच्या कार्यालयात चौकशी करता येईल. 


मुख्य न्यायाधीश : शिलाँग थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे दोन्ही पक्ष थंड राहतील. राजीव शिलाँगला जातील. 


राजीव कुमार यांनी शिलाँग येथे सीबीआयसमोर हजर व्हावे : मुख्य न्यायमूर्ती 

बातम्या आणखी आहेत...