आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताईच्या प्रतिष्ठेसाठी दादांची धावपळ..सुप्रिया सुळेंसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारामती लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर दाैंडचे अामदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने उमेदवारी दिल्याने सुळे यांच्यासमाेर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच काँग्रेसमधील इंदापूर, भाेर, वेल्हा, मुळशी येथील कार्यकर्ते सुळेंविराेधात सक्रिय झाल्याने काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी तातडीने बैठक घेण्यात आली. या वेळी अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. 

 

लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाेन्ही पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाे निर्णय घेतील ताे आम्हाला मान्य असेल, असे पत्रकारांशी बाेलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला बारामती हा पवार कुटुंबीयाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा असून सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजितदादा सध्या धावपळ करत असल्याचे यातून स्पष्ट झाले.  

 

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, आमदार संग्राम थाेपटे, संजय जगताप, उल्हास पवार उपस्थित हाेते. या वेळी पवार म्हणाले, मावळ, शिरूर, बारामती, पुणे या लाेकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार एकत्रित फाॅर्म भरण्यास जातील. मात्र, त्यापूर्वी दाेन्ही पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक काँग्रेस भवन येथे घेण्यात यावी, असे आम्ही सुचवलेले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे वेगवेगळे प्रश्न असून ते मार्गी लावण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील. 

 

रावेरची जागा काँग्रेसने मागितली : पवार
पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाेबत रावेरच्या जागेबाबत बाेलणे झाले असून काँग्रेसचे तेथील कार्यकर्ते संबंधित जागेची मागणी करत असल्याचे सांगण्यात आले आहे. पर्यायी मतदारसंघ आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी आम्ही केली. मात्र, काेणतीही टाेकाची भूमिका न घेता राज्यातील जास्तीत जास्त जागा जिंकून येईल, अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या संजयमामा शिंदे यांच्याविराेधात निंबाळकर यांना उमेदवारी दिली तरी ते चांगल्या मताधिक्क्याने निवडून येतील. कॅबिनेट मंत्री, माजी उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांनी तेथून माघार घेतलेली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्याविराेधात राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहे, त्याबाबत आपण काेणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.  

 

पुण्याच्या जागेबाबत राहुल गांधी निर्णय घेतील : हर्षवर्धन पाटील  
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांचा फाेन अाला व अापण एकत्रित बैठक करू, असे ते म्हणाले. त्याप्रमाणे बारामती लाेकसभेतील काँग्रेसचे लाेकप्रतिनिधी बैठकीसाठी बाेलवण्यात अाले. नेत्यांमध्ये एकवाक्यता झाल्यानंतर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत काेणत्याही प्रकारचे संघर्ष होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील. पुणे लाेकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काही नावे पार्लामेंटरी बाेर्ड कमिटी, स्क्रीनिंग कमिटी यांच्याकडे पाठवण्यात अाली. मात्र, काेणताही अंतिम निर्णय न झाल्याने अखेर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल हे याबाबत स्वत: निर्णय घेतील.

बातम्या आणखी आहेत...