आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीमध्ये लेकींचीच लढाई; सुप्रिया-कांचन यांनी खाेचले पदर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शरद पवारांचा बालेकिल्ला बारामती मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीच्या खासदार, पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने तिकीट दिले आहे.

विशेष म्हणजे या दोघीही बारामतीच्याच ‘लेकी’. दोन वेळेच्या उत्कृष्ट  संसदपटू सुप्रिया 

विजयाची हॅट्ट्रिक  साधणार की वाचून भाषण करणाऱ्या कांचन यांना लाेकसभेत प्रवेश मिळणार याबाबत बारामतीकरांना उत्सुकता आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रियाच्या वहिनी आहेत, तर कांचन यांच्या आत्या. त्यामुळे ही नात्यातील लढाई रंगतदार हाेईल यात शंका नाही.

 

सुप्रिया सुळे, ‌उमेदवार, राष्ट्रवादी

1. व्यक्तिमत्त्व

पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या वारसदार. २००६ मध्ये राज्यसभा, २००९ पासून दाेनदा लाेकसभेत. दिल्लीतील सक्रिय राजकारणाचा अनुभव. दिल्लीत अभ्यासपूर्ण भाषणे आणि मतदारसंघात महिला आणि युवतींशी थेट संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य बनले आहे. कुटुंबाचा राजकीय वारसा असला तरी खासदार म्हणून सुप्रियांनी स्वत:चे स्वतंंत्र कर्तृत्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे. 

 

2. राजकीय - सामाजिक प्रभाव 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि यशस्विनी अभियान यांच्या माध्यमातून सुप्रिया यांना महिला, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कामाचा अनुभव. मतदारसंघातील शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप, बचत गटांच्या महिलांसाठी उद्योग मेळावे आणि गावांमधील रस्ते व पाण्याची सोय यावर त्यांनी भर दिला. लोकसभेत सर्वाधिक हजेरी, सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणे आणि राष्ट्रीय विषयांवर, नवीन विधेयकांवर अभ्यासपूर्ण विवेचन यामुळे त्यांना दोन वेळा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.  

 

3. विजयाचे गणित 

बारामती, इंदापूर आणि भोर या तीन मतदारसंघांवर सुप्रिया यांच्या विजयाची भिस्त आहे. इंदापूरमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील सुप्रियांना मदत करणार की अजित पवारांच्या विरोधाचा हिशेब चुकता करणार यावर सुप्रियांचा विजय अवलंबून.  केवळ विजय मिळवणे एवढेच नव्हे, तर मताधिक्य राखणे हेही सुप्रियांसमाेर आव्हान. २००४ मध्ये पवारांनी ६.३४ लाखांचे मताधिक्य मिळवले, मात्र २००९ मध्ये सुप्रियांच्या विजयावेळी ते ४.८७ लाखांपर्यंत घसरले. २०१४ मध्ये,  तर हे मताधिक्य ७० हजारांपर्यंत घसरले. आजवर मदतीला असलेले बंधू अजित पवार या वेळी पुत्र पार्थसाठी मावळमध्ये व्यग्र आहेत. त्यामुळे सुप्रियांना एकहाती लढत द्यावी लागेल. 

 

4. उणिवा  

एकछत्री कारभार, घराणेशाही हे मुद्दे अडचणीचे ठरू शकतात. विकासाचे माेठे दावे केले जात असले तरी मतदारसंघातील अनेक गावे आजही पाणी व रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित. त्यामुळे मतदारांत राेष. २००४ ते २००९ यादरम्यान गमावलेल्या अडीच लाख मतांची कमी हे नेतृत्वाच्या नाराजीचे कारण मानले जाते. शरद पवारांसारखी माणसे जोडण्याची, वैयक्तिक नाते जपण्याची कला अवगत नसणे आणि पक्ष कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण करण्याच्या गुणाचाही अभाव. 

 

5. एक्स फॅक्टर 

संसदेत १५ वर्षांतील सक्रिय कामगिरी, ग्रामीण-शहरी मतदारांचे प्रश्न लक्षात घेऊन जाणीवपूर्वक केलेली स्वतंत्र कामे, निवडणुकीआधी वाढवलेला जनसंपर्क आणि ‘पवार’ या नावाची जादू यामुळे विजयाचा मार्ग सुकर हाेऊ शकताे.

 

कांचन कुल, ‌उमेदवार, भाजप 

1. व्यक्तिमत्त्व

नवोदित चेहरा, पदवीपर्यंतचे शिक्षण. कांचन कुल यांना माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांमधून राजकीय वारसा मिळालेला. निंबाळकरांची कन्या आणि कुल यांची सून ही दोन्ही चलनी नाणी त्यांच्या बाजूने दिसतात. पहिले भाषण लेखी वाचून दाखवण्याची वेळ आली तरी ‘कुल कुटुंबाकडून झालेली लोकसेवा’ आणि ‘मोदींची देशसेवा’ हे दोन हुकमी पत्ते त्या आपल्या प्रचारसभांत मोठ्या खुबीने वापरत आहेत.  

 

2. राजकीय - सामाजिक प्रभाव 

नव्वदच्या दशकात कांचन यांचे सासरे सुभाष कुल यांनी शरद पवारांच्या बारामतीतील अनभिषिक्त वर्चस्वास पहिल्यांदा अाव्हान दिले. १९९१ मध्ये ते आमदार झाले. त्याच पवारांचे नेतृत्व झुगारून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांच्या आपत्कालीन निधनानंतर कांचन यांच्या सासू रंजना आमदार झाल्या. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कांचन यांचे पती राहुल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रिंगणात होते, मात्र पराभूत झाले. २०१४ च्या मोदी लाटेत रासपतर्फे त्यांनी अामदारकी मिळवली. अशा प्रकारे गेल्या तीन पिढ्यांपासून दौंड मतदारसंघातील कुल कुटुंबाचे वर्चस्व.   
 

 

3. विजयाचे गणित 

भाजपचे चिन्ह आणि रासपची रसद ही कांचन यांची मोठी उपलब्धी. धनगर मतांचा मतदारसंघात माेठा प्रभाव.  गेल्या वेळी महादेव जानकरांना साडेचार लाख मते मिळाली हाेती. मात्र त्यांची ‘कपबशी’ खडकवासलासारख्या शहरी परिसरात चालली नव्हती. त्यामुळे भाजपने यंदा रासपला उमेदवारी देताना ‘कमळा’वर लढण्याचा आग्रह धरला. राज्यातील फडणवीस सरकारने शेवटच्या टप्प्यात धनगर समाजास अनुसूचित जमातींमधून दिलेल्या सवलतींमुळे धनगर समाज कांचन यांच्या बाजूने काैल देऊ शकताे.  त्याशिवाय स्वत:चा दौंड मतदारसंघ, शिवसेनेचा पुरंदर आणि भाजपकडील खडकवासला मतदारसंघावर विजयाची भिस्त आहे.

 

4. उणिवा  

कुटुंबाचे संचित असले तरी नवखा चेहरा ही सर्वात माेठी उणीव. निंबाळकर आणि कुल या दोन्ही सासर माहेरच्या राजकीय घराण्यांचा वारसा सांगत असल्या तरी आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या कांचन याच निवडणुकीत नेतृत्व आणि वक्तृत्वाचे पाठ गिरवत आहेत. आतापर्यंत कोणत्याच पक्ष, संघटनेच्या सदस्याही नसलेल्या कांचन राजकारणात पूर्णपणे नवख्या आणि मतदारसंघात पतीच्या व पक्षाच्या कृपेवर प्रचार करत आहेत.

 

5. एक्स फॅक्टर 

शिवसेना, भाजप व रासप या तिन्हींची एकत्रित ताकद हेच भांडवल. बारामतीत पवारांचा पराभव करणे हे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे लक्ष्य असल्याने मोदींची सभा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार येथे निर्णायक ठरू शकतो.

बातम्या आणखी आहेत...