Home | Magazine | Madhurima | Suranga Date writes about appe stand

एका आप्पेपात्राची कहाणी

सुरंगा दाते, मुंबई | Update - Aug 21, 2018, 06:57 AM IST

नाही तवा, नाही कढई , न्हवतो मी कधीच ‘वोक’; कोणी तरी म्हणालं ‘स्टोव्ह टॉप मफिन पॅन’, किती मजेशीर असतात न लोक.

 • Suranga Date writes about appe stand

  नाही तवा, नाही कढई ,

  न्हवतो मी कधीच ‘वोक’;
  कोणी तरी म्हणालं
  ‘स्टोव्ह टॉप मफिन पॅन’,
  किती मजेशीर असतात न लोक.
  जगात किती तरी वस्तूंच्या सूक्ष्म प्रतिकृती दिसतात.
  फोन टेबलावरून खिशात आले,
  संभाषणे तोंडावरून संगणकावर आली,
  महत्त्वाचे कागद अल्मिऱ्यातून
  खिशातल्या हार्ड डिस्कवर;
  वाक्यांशातून स्वर काढून सूक्ष्मीकरण केल्याने
  आता तुम्ही पाच ते सहा अक्षरांत
  जमिनीवर गडाबडा लोळू शकता,
  नाही तर तीन अक्षरांत जोरजोरात हसू शकता.
  आणि म्हणूनच इडलीचे प्रगत सूक्ष्मीकरण
  करण्याचा प्रस्ताव आला
  तेवहा मी हात वर केला!
  मला नाही लागत वाफा, आणि वेगवेगळी भांडी.
  इडलीच्या आंबलेल्या आयुष्यात, थोडा कांदा, मिरची, आले, कोथिंबीर, मीठ, मिरे यांचे योगदान मोठे;
  एखादा लहान चमचा तेल तूप घालून,
  चमचा चमचा बनवलेले खमंग मिश्रण घातले,
  आणि वर घुमटाकृती झाकण ठेवले की,
  केवळ माझ्या आत्मविश्वासाच्या बळावर
  आप्प्याचं आयुष्य मार्गी लागतं.
  एका बाजूच सोनं झालं,
  की पलटून दुसरी बाजू खाली,
  आणि जगात पदार्पण करायच्या आधी,
  थोडा आजूबाजूनी तेलतुपाचा मेकअप.
  कसं असतं,
  एखादी गोष्ट छान दिसली की,
  सर्व लोक त्याचे अनुकरण करतात.
  आजकाल साबुदाणा मंडळी
  माझ्याकडे येऊन उपासाचे आप्पे करतात
  आणि परवाच कोणी तरी उडदाचेही वडे केले,
  आणि दह्यात पडताच दही धन्य झालं.
  पण कुठल्याही यशस्वी माणसाच्या मागे जशी
  एक खमकी हुशार बाई असते,
  तसं माझ्या दुसऱ्या बाजूस
  थेट विस्तवाशी दोन हात करणारा
  प्रसंगी डाग पडणारा
  खालचा पृष्ठभाग आहे.
  इतके सगळं ऐकून
  तुम्हाला वाटेल
  मी निवडणुकीला उभा आहे.
  छे हो! मला तर सगळ्यांनी कायमचं निवडून दिलं आहे!


  - सुरंगा दाते, मुंबई
  suranga.date@gmail.com

Trending