खिचडी राजकारण
भाताचं आणि डाळीचं एक समीकरण असतं. शक्यतो भाताने कुठेही एकटं नाही जायचं. कधी एखादी श्रीमंत लोण्यात गुंग अशी डाळ, कधी मेथी
-
भाताचं आणि डाळीचं एक समीकरण असतं.
शक्यतो भाताने कुठेही एकटं नाही जायचं.
कधी एखादी श्रीमंत लोण्यात गुंग अशी डाळ,
कधी मेथी, पालक लोकांशी विचारपूर्वक युती केलेली डाळ;
कधी कधी तर भांडून भांडून
दोन डाळी एकत्र येऊन
अद्रक लसूण टोमॅटोमध्ये रमलेली डाळ;
आणि कधी कधी सात्त्विकतेचा परमोच्च आविष्कार असलेलं साधं वरण.
त्यामुळे जेव्हा काही बाळबोध डाळी,
शिजतानाच भातात पडू लागल्या,
आणि बरोबर फोडण्या, कढीपत्ते, जिरेपूड
घेऊन मिसळू लागल्या,
तेव्हा भात अगदी हुरळून गेला.
अति मसालेदार खाणे, दमून भागून कुठून तरी येणे, पटकन काही तरी बनवणे भाग पडणे
इत्यादी कारणाने या "खिचडी’चे उद््घाटन झाले,
आणि आजतागायत विविध वेळी,
विविध प्रकारांत ती देशभर उजळून निघाली.
आपल्याकडे जरा कुठे प्रसिद्धी मिळाली की,
राजकारणी लोक कान टवकारतात,
त्यात आपला स्वतःचा फायदा काय होत आहे ते बघतात आणि आपल्यात त्याला सामील करून घेतात.
तशी खिचडी हुशार. नव्हे, शहाणीच.
तिला भारतीय खास पदार्थ म्हणून संबोधलं जाणार हे कळताच,
तिने पापड, कढी, चटणी, लोणचं,बटाट्याच्या काचऱ्या, वगैरे मंडळींना बरोबर घेतले,
आणि सरकारला सुनावले.
"मी एकटीच खास नाही.
माझ्या बरोबरची मंडळी माझे कार्य अधिकच सुंदर करतात आणि मला एकटीला भारताचा खास पदार्थ संबोधून,
किती तरी रोटी, नान, पराठा, परोटा, फुलका, इडली, डोसा,
उथप्पा, कोरी रोटी, मंडळींवर अन्याय होईल.
किती तरी दुग्धजन्य व इतर गोड पदार्थ डावलले जातील आणि भारताच्या खाद्य संस्कृतीत
विभाजकता माजेल.
देशातील राजकारण्यांची ही प्रथा असेल,
माझी नाही.
एखाद्या लहान मुलाने, कामावरून दमून आलेल्या गृहिणीने अथवा फार भूक नसलेल्या आजी-आजोबांनी मला पुरस्कार दिला,
तर मी तो खाद्यसंस्कृतीचा सन्मान समजीन.
आपल्या देशात, राजकीय पुरस्कार
आजकाल जरा काही मनाविरुद्ध झालं
की परत करतात. मी त्यातली नाही. मला अवॉर्डवापसी जमत नाही. प्लीज. मला माझ्या सहकाऱ्यांबरोबर एकटं सोडा.
मी आयुष्यभर करत आले, ते करू द्या.
साध्या माणसांना तृप्त करणे आणि त्यांचे पोट भरणे. जेणेकरून त्यांना विश्रांतीत एक सुंदर
डुलकी लागेल आणि सुखाची स्वप्नं दिसतील.
तुम्हा राजकीय लोकांना हे आजपर्यंत जमलं का?- सुरंगा दाते, मुंबई
suranga.date@gmail.com