Accident / Surat: मृतदेहांची ओळख पटवणेही अशक्य, घड्याळ आणि मोबाईलवर रिंग देऊन शोधताहेत Dead Bodies

प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होते मृतदेह, असे होते रुग्णालयातील चित्र...

दिव्य मराठी वेब टीम

May 25,2019 12:35:55 PM IST

सुरत - सरथाणा जकातनाका येथे तक्षशिला आर्केडमध्ये लागलेल्या आगीत मृतांची संख्या 23 वर पोहोचली आहे. या आगीत गंभीर जखमींपैकी दोघांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. सोबतच आणखी 7 जणांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही आग इतकी भयंकर होती बाहेर काढलेल्या मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य बनले आहे. पीडितांच्या कुटुंबियांपैकी एक वडील आपल्या मुलांचे मृतदेह घेण्यासाठी शनिवारी रुग्णालयात पोहोचले. यावेळी तेथील मृतदेहांचा ढीग पाहून ते जागीच कोसळले. शुद्धीवर आले तेव्हा पुन्हा मुलांचा तपास सुरू केला. सगळे एकसारखेच दिसत होते. कित्येक तास ते फक्त भटकत होते. अशात त्यांनी आपल्या मुला-मुलींच्या मृतदेहांच्या हातातील घड्याळ आणि त्यांच्या मोबाईलला रिंग देऊन शोधून काढले. शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.


या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या जाह्नवी चतुरभाई वसोया (18) आणि कृती निलेश दयाल (17) यांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळांवरून पटली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी नवीन वॉच घेऊन दिल्या होत्या. यासोबतच 18 वर्षांची ईशा खडेला ड्रॉइंग शिकण्यासाठी आली होती. तिच्या वडिलांनी तिचा मृतदेह शोधण्यासाठी मोबाईलवर रिंग दिली. तेव्हा एका कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ईशा या आगीत पूर्णपणे भाजली. परंतु, फोन कसा-बसा सुरक्षित होता.


प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होते मृतदेह
स्मीमेर रुग्णालयात एकानंतर एक 10 रुग्णवाहिका आल्या. त्यामधून 30 मिनिटांत 17 मृतदेह रुग्णालयात आणले गेले. ते सर्वच मृतदेह चादरींमध्ये आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळले होते. त्या सर्वांच्याच नातेवाइकांनी आप-आपल्या मुला-मुलींना शोधण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली. अनेकांच्या मुला-मुलींचे मृतदेह त्यांच्या डोळ्यांसमोर होते. पण, त्यांना ओळखता येत नव्हते. त्यापैकी काही तर मृतदेहांची ओळख पटवण्याची हिंमतही करत नव्हते. कदाचित तो मृतदेह आपल्या मुलाचा नसावा अशाच विचारांमध्ये ते शून्यात हरवले होते. काही कुटुंबियांनी आपल्या काळजाच्या तुकड्याचे पासपोर्ट फोटो आणि मोबाईलमध्ये फोटो घेऊन आले होते. रुग्णालय स्टाफला ते वारंवार दाखवून साश्रू नयनांनी ते चौकशी करत होते.

X
COMMENT