आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा; 'जिल्ह्यातल्या काही नेत्यांना गुलालाची अॅलर्जी आहे, त्यांना आधीच बुक्का आणायचा सल्ला दिला होता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी 1 लाख 69 हजार 67 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. प्रीतम मुंडेंना एकूण 6 लाख 78 हजार 175 मते मिळाली. बीडमध्ये 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बीडची निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता होती, पण प्रीतम मुंडेंनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि पावणे दोन लाखांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा हा राष्ट्रवादीमधून भाजपात आलेले आमदार सुरेश धस यांच्या आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघाचा आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे भिमराव धोंडे विधानसभेवर आमदार आहेत. या विजयानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय.


धस म्हणाले- "या जिल्ह्यातल्या काही नेत्यांना गुलालाची अॅलर्जी आहे, त्यांना आधीच बुक्का आणायचा सल्ला दिला होता. जिल्ह्यात पंकजा मुंडेंनी केलेल्या कामावर लोकांनी विश्वास ठेवला आणि हा मोठा विजय मिळवलाय. राष्ट्रवादीच्या पक्षविरोधी नेत्याने पोरकटपणाचे लक्षण या जिल्ह्यात केले. सोशल मीडियावर फक्त जातीवादाचे विष कालवायचे काम केले. याला 'चपराक' हा शब्दही कमी पडणार आहे. बीड जिल्ह्याने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता खेटर हातात घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवली आहे", अशी टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली.


त्यासोबतच राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावरही सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले- "राष्ट्रवादीत कानफुके आहेत, त्यांनी या जिल्ह्यात ज्येष्ठ माणसे ठेवायची नाही हे ठरवले आहे. जयदत्त अण्णा नको, सुरेश धस नको हे ठरले आहे. पण मुंडे साहेबांना मानणारा मोठा मतदार जिल्हाय्ता आहे, तो मतदार कुठेही हरत नाही. मुंडे साहेबांचेही रेकॉर्ड त्यांच्या मुलीने मोडले आहे. साहेब 1 लाख 36 हजार मतांनी जिंकले होते, ताई पावणे दोन लाखांनी जिंकल्या", असे धस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...