आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरूषदिन आणि मी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 सुरेश शेळके 

गेल्या २० वर्षांपासून १९ नोव्हेंबर हा पुरूष दिन जागतिक पातळीवर साजरा केला जातो. स्त्रीवादाचा तिरस्कार, उपहास किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून या दिनाचं आयोजन असा यामागचा उद्देश निश्चितच नाही. एक पुरूष म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून आपल्या भवतालातल्या स्त्रियांना पूरक ठरणारं वर्तनमूल्य पुरूषांनी अंगीकारावं असा त्यामागचा व्यापक दृष्टिकोन आहे. माणूसपणाचं हेच मूल्य घेऊन गेली अनेक वर्षे लिंगसमभाव क्षेत्रात काम करणाऱ्या एका सहृदय कार्यकर्त्याचं हे मनोगत... 


आज १९ नोव्हेंबर. जागतिक पुरुष दिन. १९९९ पासून सुरुवात झालेल्या पुरुष दिन साजरा करण्यामागे कुठलीही महत्त्वपूर्ण घटना घडली नसली तरीही पुरुष दिन साजरा करण्यासाठीचा हा दिवस मला महत्त्वाचा वाटतो. गेली तीस वर्षं मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.  ह्या कारकीर्दीत माझ्यासमोर अनेक प्रसंग, घटना घडल्या आहेत. संस्थेच्या माध्यमातून लिंगसमभाव या विषयावर काम करत असताना खूप वेगवेगळे अनुभव फील्डवर आले. हे सगळे अनुभव मी एक पुरुष म्हणून लिंगसमभावाच्या नजरेतून आणि भूमिकेतून पाहत असतो.     

आपल्याकडे गेल्या दहा वर्षात पुरुष दिन साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. या क्षेत्रात काम करताना समाजातल्या सर्वच प्रकारच्या, सर्वच गटांतल्या आणि स्तरांतल्या लोकांशी माझा सातत्यानं संपर्क येत असतो. अशा लोकांना भेटून येणारे अनुभव दरवेळी नवनवीन गोष्टी शिकवतात. कधीकधी नवीन विचारही समोर येतात. फील्डवर काम करतानाचे अनुभव प्रामुख्यानं, स्त्री-पुरुष भेदभाव, धार्मिक रूढी-परंपरा, भाषिक वादविवाद, जाती-धर्माचे वाढते वर्चस्व याकडे झुकणारे अधिक असतात. इन्साफ, वर्ल्ड सोशल फोरम, फियान भारत, मुंबईतील डान्स बार संघटनेतील महिला, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या दंगलीत होरपळलेल्या लोकांसोबत काम अशा लोकल ते ग्लोबल पातळ्यांवर आमचं काम नेहमीच सुरू असतं. या कामातून आलेल्या, येणाऱ्या अनुभवांचा मी ‘जेंडर’ च्या भूमिकेतून विचार करतो. त्यामुळे अमुक एक गोष्ट आपल्याकडे होते तशी इतर देशात होत नाही हे मिथकही मला अभ्यासता आलं. यातून एकच गोष्ट मला सातत्यानं लक्षात येत गेली आणि ती म्हणजे ‘लिंगसमभाव’ या विषयावर निरंतर काम होणे गरजेचे आहे.    
 
जागतिक पुरुष दिन असो किंवा जागतिक महिला दिन असो, हे दोन्ही दिवस साजरे करण्यामागे मूळ उद्देश मानवी हक्काची जोपासना हाच राहिलेला आहे. त्यामुळे पुरुष दिन साजरा करण्यामागे स्त्रियांना अथवा स्त्रीवादाला कमी लेखण्याचा उद्देश अर्थातच नाही. किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असाही नाहीये. प्रत्येक लढाई, आंदोलन, चळवळ आणि मोहिमा ह्या सगळ्यांनी एकत्रितरीत्या सोबत एकमेकांना बदलत, एकमेकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढणे मला सामाजिक कार्यकर्ता या भूमिकेतून महत्त्वाचे वाटते. शिवाय दुसरे म्हणजे  यामध्ये समाजातील एक मोठा उपेक्षित वर्ग म्हणजे ट्रान्सजेंडर यांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.  
आजच्या पुरुष दिनाकडे एक पुरुष म्हणून पाहताना एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे, तो म्हणजे बळाचा वापर कोण कोणावर करतं याबद्दल विचार केला जायला हवा. जी व्यक्ती सामाजिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सबल नाही - मग ती स्त्री असो, पुरुष असो किंवा ट्रान्सजेंडर - अशा व्यक्तीविरुद्ध बळाचा वापर केला जातो. हा बळाचा वापर केवळ पुरुष किंवा केवळ स्त्रियाच करत नाहीत, तर केवळ सबल असणारी व्यक्तीच बळाचा वापर करते. ती स्त्री असेल अथवा पुरुष. समाजात वावरत असताना स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसे राहायचे, कसे वागायचे याबद्दलचे अलिखित नियम ठरलेले आहेत. या नियमांच्या उलट वागणारी व्यक्ती (स्त्री-पुरुष दोघेही) समाजामध्ये स्वीकारली जात नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून He for She ही मोहीम जगभरात सुरू आहे.  ‘तिच्यासाठी तो’ कसा असू शकतो या मुद्द्याची पार्श्वभूमी हा विषय निवडण्यामागे आहे. या अनुषंगानं आम्ही लिंगसमभावाच्या दृष्टिकोनातून अनेक चर्चासत्रं, कार्यक्रम आयोजित करत असतो. लिंगभावाआधारित हिंसा, लैंगिकता, मर्दानगी, नातेसंबंधामधील सहमती, लैंगिक विविधता अशा अनेक विषयांवर या चर्चासत्रांमधून, प्रशिक्षणांमधून चर्चा केली जाते. विशेष म्हणजे, ‘लिंगभावावर आधारित होणारी हिंसा’ या विषयावर फक्त मुली, महिलाच नाही तर मुलगे, पुरुषही आपापले अनुभव व्यक्त करतात, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. सकारात्मक अनुभवांचं असंच खूप सारं संचित घेऊन आम्ही आमच्या संस्थेच्या दैनंदिन कामकाजातही अनेक बदल केलेत. परिणामी संस्थेतील स्त्री-पुरुष सहकारी एकमेकांकडे स्पर्धक म्हणून नव्हे तर मोटिव्हेटर म्हणून पाहतात.


दोन व्यक्तींमध्ये वैचारिक मतभेद असू शकतो. पण त्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुम्ही चांगल्या-वाईटाचं लेबल लावू शकत नाही. लावूही नये. जेव्हा कोणी माझ्याशी एखाद्या स्त्रीबद्दल तिच्या अनुपस्थितीत त्या स्त्रीला अवमानकारक वाटेल, तिचा सन्मान दुखावला जाईल असे बोलत असेल तर एक पुरुष म्हणून मी तो संवाद त्या क्षणी थांबवतो. लिंगसमभावासारख्या विषयावर काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून मला ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते. कारण इतरांना मी जे सांगणार आहे, शिकवणार आहे त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतो. हे करताना, स्वत:च्या पत्नीला स्त्रीशिक्षणाचे धडे देऊन समाजातल्या स्त्रियांना शिक्षणाचं दार खुलं करणाऱ्या महात्मा फुले, सुधारणावादी शाहू महाराज यांचा कृतीतला आदर्श माझ्यासमोर असतो. त्यामुळेच मुद्दा केवळ महिला अथवा पुरुष दिन असा नाहीच आहे, तर सर्वांना समान संधी, समान अधिकार आणि सर्वांना सन्मान मिळणं हा आहे.  
पुरुष दिन साजरा होण ही गोष्ट मला गरजेची आणि महत्त्वाची वाटते. या दिनाच्या निमित्तानं पुरुष म्हणून मी कसा? माझ्या संपर्कात येणारी माझी सहचारिणी, माझ्या नातेवाईक आणि सहकारी सखींसाठी मी पूरक कसा ठरू शकेन यावर प्रत्येक पुरुषानं विचार करायला हवा. 

शारीरिक आणि नैसर्गिकदृष्ट्या पुरुषांनी स्वत:च्या सक्षमतेचा उपयोग स्वत:ची सत्ता, अधिकार प्रस्थापित करण्यासाठी न करता दुर्बलांना सक्षम करण्यासाठी उपयोगात आणला पाहिजे. मानवी हक्क हे सर्वांसाठीच आहेत ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मी पुरुष किंवा स्त्री असण्यापेक्षा एक ‘व्यक्ती’ किंवा ‘मानव’ म्हणून माझे विचार हे माझ्या भवतालात वावरणाऱ्या इतर स्त्रियांसाठी अधिक Rational आणि Humanist असावेत, असले पाहिजेत हे मूल्य माझ्यात कायम रुजवण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत आलोय, करत राहणार...   

लेखकाचा संपर्क : ७३५०५६७७७७