आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आशा’ जिवंत राहो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भोगले जे दु:ख त्याला’ या प्रसिद्ध आत्मकथनाच्या लेखिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशा आपराद यांचं नुकतंच निधन झालं. समाज सुधारणेच्या चळवळीत आणि कार्यात त्यांच्यासोबत काम केलेल्या एका कार्यकर्त्यांनं त्यांच्या स्मृतीला दिलेला हा उजाळा.
 
आशा यांच्या अचानक जाण्याने अनेक आठवणी जाग्या झाल्या. ६७ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी प्रचंड समस्यांना तोंड दिले होते. या सर्व घटनांचा मी साक्षीदार होतो. त्यांचा सर्व संघर्ष मी जवळून पाहिला. आपला हा संघर्ष त्यांनी ‘भोगिले  जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्रात मांडला. त्यांच्या जीवघेण्या आयुष्य प्रवासाचे वर्णन वाचताना हृदय हेलावून जाते. मुस्लिम समाजातल्या एका महिलेने असे अनुभव लिहिणे, समाज सुधारणेचे काम करणे हे नक्कीच सोप्पं नाही. १९८४ मध्ये कोल्हापुरात महिला दक्षता समितीची स्थापना मृणाल गोरे, प्रमिला दंडवते यांच्या प्रेरणेने झाली. तत्कालीन कोल्हापुरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा त्यामध्ये सहभाग होता. ऊर्मिलाबाई सबनीस, शकुंतला पाटील, सुचेता कोरगावकर, मीरा संत अशा दिग्गज ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांच्या बरोबरच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, आदींच्या सहकार्याने महिला आधार आणि समजुतीने व तडजोडीने कौटुंबिक तंटे सोडवण्याच्या उद्देशाने महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. या सर्वांमध्ये तरुण असणाऱ्या दोन कार्यकर्त्या सामील झाल्या होत्या आशा आपराद आणि सुचिता पडळकर. आशा यांचं वयाच्या अ‌वघ्या १४-१५ व्या वर्षी लग्न झालं. एकोणिसाव्या वर्षापर्यंत चार मुली पदरात आल्या. सख्ख्या आईनं केलेला छळ,  अल्पशिक्षित तरुणाशी लावून दिलेलं लग्न अशा परिस्थितीतून त्या गेल्या. परंतु स्वस्थ न बसता बीए, बीएड, एमए, एम फिल. पदव्या मिळवल्या. यशस्वी प्राध्यापक झाल्या. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. सर्व काळात त्यांनी सामाजिक कामातही आपला ठसा उमटवला. आपल्या मुलींना उच्चशिक्षित केले. पतीला आपल्या कामातील सहभागी बनवले. लेखन केले. आपल्या लेखनातून त्यांनी समाजमानस घडवण्याचा प्रयत्न केला. आपली नोकरी सांभाळून त्यांनी काही काळ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे काम केले. तलाकविरोधात मोर्चामध्ये त्यांचा सहभाग होता. तर कोल्हापुरातील तलाकपीडित महिलांना महिला दक्षता समितीच्या सचिव या नात्याने न्याय मिळवून दिला. तलाकपीडित महिला मोर्चात सामील झाल्या. मुस्लिम शिक्षण परिषदेच्या आयोजनात भाग घेतला. या सर्व प्रवासात घरच्या अनेक अडचणी आणि विरोध असूनही प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांच्या कार्यात सामील झाल्या. कोल्हापुरात होणाऱ्या सर्व सामाजिक चळवळीत त्या आघाडीवर असत. अलीकडे मात्र त्यांच्या तब्येतीच्या बऱ्याच तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यामुळे महिला दक्षतामध्ये त्यांचा अनियमितपणा वाढला होता. त्याबद्दल गमतीनं त्या आपल्या सहकारी कार्यकर्त्यांजवळ म्हणायच्या, तनुजा गाडी आता जुनी झाली गं. सारखी गॅरेजला असते बघ. एक पार्ट दुरुस्त झाला की दुसरा खिळखिळा होतोय. मग पुन्हा गाडी गॅरेजला जाते. खूप संवेदनशील अशा असणाऱ्या आशाताई महिला दक्षतामध्ये चांगल्या समुपदेशक होत्या. ग्रामीण भागातील रहिवास आणि त्यांनी स्वतः जे दुःख भोगले होते त्यामुळे त्यांच्या सल्ला हा  सर्वच समाजांत मानला जाई. आमच्या परिवारातून सच्ची कार्यकर्तीअचानकपणे आमच्यातून अंतर्धान पावली याचे तीव्र दुःख होतेय. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोल्हापुरातील सर्वच जाती-धर्मांतील लोक, मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने कोल्हापुरातील पुरोगामी सामाजिक चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे.पण  मुस्लिम समाजातच नव्हे, तर संघर्ष करणाऱ्या आजच्या प्रत्येक महिलेमध्ये ‘आशा’ जिवंत राहो , हीच आशा अपराद यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

बातम्या आणखी आहेत...