Award / गायनाचे रिअॅलिटी शो म्हणजे अवडंबर, आम्ही त्यात नसणे हा त्यांचा दुबळेपणा

सुरेश वाडकर, सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी

विवेक एम. राठोड

Jul 17,2019 10:22:00 AM IST

औरंगाबाद - आताच्या काळात सुरू असलेले गायनाचे रिअॅलिटी शो म्हणजे केवळ अवडंबर आहे. त्यात आमच्यासारखी गायक मंडळी सामील न होणे हा त्या शोचा दुबळेपणा आहे. मुळात आताच्या काळातील गायकी आमच्या काळातील गायक मंडळी समजू शकत नाही, ही भावनाच अत्यंत चुकीची आहे. तुम्ही कोणत्याही काळात जगा, गाणे हे बारा सुरांतच असते. मग ते जुने असो की नवीन. त्यामुळे रिअॅलिटी शो हा प्रकारच मला मुळात अत्यंत दुबळा वाटतो, असे खडे बोल ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी सुनावले आहेत. भारतीय संगीत नाटक अकादमीचा यंदाचा गायनाचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने त्यांनी “दिव्य मराठी’शी साधलेला हा संवाद त्यांच्यात शब्दांत...


माझ्या गुरूंना, रसिक मायबापांना हा पुरस्कार समर्पित
विशेष योगायोग म्हणजे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला हा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि अर्थातच सांगीतिक आयुष्य घडवण्यात माझ्या गुरूंचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना समर्पित आहे. शिवाय, इतकी वर्षे रसिक मायबाप मला बर्दाश्त (गमतीने) करतायत. त्यामुळे त्यांनाही याचे श्रेय जातेच. या पुरस्काराने माझ्या आयुष्यात आणखी एक मानाचा तोरा रोवलाय, याचा अभिमान आणि आनंदही आहे, असे वाडकर म्हणाले.


संगीतानंच सर्वकाही दिलं : १९६८ मध्ये मी १३ वर्षे वयाचा होतो तेव्हापासून संगीतात रमलोय. तेव्हापासून आजवर निरंतर संगीताची साधना करतोय. रोज गातोय. संगीताने मला घडवले, मला लोकांच्या आयुष्यात सांगीतिक सूर पोहोचवण्याचे माध्यम बनवले. यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. विशेष म्हणजे, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आजही कोलकात्यात कार्यक्रम सादर करतोय, हे खरंच आनंददायी असल्याचे वाडकर म्हणाले.


स्टेजवर गायनकलाच पारखावी, आपली नाटकं नकोत
रिअॅलिटी शोजमध्ये लहान-लहान वयाची बालके प्राणपणाने गातात. त्यांच्यातील कौशल्ये उत्तम आहेत. माझी समकालीन गायक मंडळी अशा शोजमध्ये परीक्षक आहेत. परंतु, आमच्यासारख्यांना परीक्षक बनवल्यानंतर त्या मुलांची गायकी पारखणेच महत्त्वाचे असावे. मुळात, आम्ही तिथे जाऊन नृत्य करणे, उगाच ओरडणे, अशा स्क्रिप्टेड गोष्टी होऊ नयेत. तिथं गायकीच व्हावी. नाटकं नकोत, असे माझे प्रामाणिक मत असल्याचेही वाडकर म्हणाले.


अभिनेत्री सुहास जोशी, लेखक राजीव नाईक यांनाही पुरस्कार
प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी आणि नाटककार राजीव नाईक यांनाही २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुहास जोशींनी बॅरिस्टर, कन्यादान, स्मृतिचित्रे, नटसम्राट, एकच प्याला आदी नाटकांत अभिनय केला आहे. तर, राजीव नाईक यांनी अखेरचं पर्व, अनाहत, वांधा आदी नाटकांचे लेखक केले आहे. शिवाय, नाट्यविषयक त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

X
COMMENT