आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळगावच्या गरीब कुटुंबातील सूरज शिंदेची गरुड झेप; महाराष्ट्राच्या अंडर 23 क्रिकेट संघात निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाल घोलप

करमाळा - बीसीसीआय अंतर्गत म्हैसूर येथे सुरू झालेल्या क्रिकेट स्पर्धांसाठी महाराष्‍ट्र संघातून खेळण्यासाठी करमाळा तालुक्यातील कोळगाव या ग्रामीण भागातील ट्रक चालकाचा मुलगा सूरज शिंदेची 23 वर्ष खालील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. सूरजचे वडील कैलास शिंदे शेतीवर उपजीविका अवघड झाल्याने पुणे येथे गेले तिथे दुसऱ्याच्या ट्रक वर चालक म्हणुन काम केले. त्यांच्या मुलाने दैदिप्यमान कामगिरी करत यश संपादन केले आहे.


सूरज शिंदे हा कोळगाव येथील गरीब कुटुंबात जन्म घेतला असला तरी त्याने आपले पंख विस्तारायला सुरुवात केली आहे. सूरजचे आजोबा इंद्रजीत शिंदे हे कोळगाव येथील शेतकरी, वीस वर्षापूर्वी पाणी नसल्याने शेतीत काहीच होण्यासारखे नसल्याने सूरजचे वडील कैलास शिंदे यांनी पुणे गाठले. तिकडे सुरजला लहानाचे मोठे करत असताना सूरजच्या कारकीर्द घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीमंतांचा खेळ समजला जाणाऱ्या क्रिकेटसाठी सूरजच्या वडिलांनी होकार दिला व वेळोवेळी मदत करत राहिले. दुसऱ्याच्या ट्रक वर काम करुन सूरजचे प्रवास दौरे व येणारा खर्च कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या आड येत असला तरी ते कधी भासवू दिले नाही. त्याचेच आज त्यांना फळ मिळत आहे.

सूरजने स्थानिक क्रिकेट संघात चांगली कामगिरी केल्याचे फळ त्याला मिळाले आहे. अन्वर शेख क्रिकेट अकॅडमी पुणे येथून आपल्या क्रिकेट खेळण्याची सुरुवात केल्यानंतर दोन वर्ष तिथेच सूरजने धडे घेतले. त्यानंतर क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून सरावास सुरुवात केली. सलग तीन वर्ष या क्लब मधून तो क्रिकेट खेळत असे त्यानंतर विविध संघ व मालिकांच्या माध्यमातून सुरजने चमकदार कामगिरी करत आपली फलंदाजी व गोलंदाजीची चमक निवड कर्त्याना दाखवून दिली. अल्पावधीत सूरज आपल्या फलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघापर्यंत मजल मारू शकला आहे.


2019 मध्ये झालेल्या डेक्कन ट्रॉफी मध्ये सूरजने उत्कृष्ट फलंदाजी करत बेस्ट बॅट्समन चा अवॉर्ड मिळाला होता. त्याच्या त्याच कामगिरीवर त्याची आता होऊ घातलेल्या बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट सी. के. नायडू या स्पर्धांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघातून खेळायला जाणारा सुरज हा करमाळा तालुक्यातील एकमेव खेळाडू आहे. तर त्याने वेगवेगळ्या सामन्यातुन शतकीय खेळी करताना पुण्यात 42 चेंडूत 106 धावा, नांदेडला 60 चेंडुत 141 धावा, 81 चेंडूत 115, 58 चेंडुत नाबाद 99 धावा अशा खेळ्याही लक्षणीय ठरल्या आहेत.