आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टोलॅब : नाट्यक्षेत्राकडे पाहण्याची नवीन दृष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुषमा देशपांडे

मराठी रंगभूमीने रसिकांना भरभरून दिलंय. रंगभूमी दिन साजरा करताना केवळ चार भिंतींच्या आत दाखवले जाणारे नाटक, त्यातील कलाकार, संहिता इतकाच विचार मर्यदित न ठेवता थिएटर ऑफ ऑपरेस्ट म्हणजेच शोषित-पीडितांचा आवाज मांडणारी रंगभूमी असा उद्देश ठेवून मुंबईत रंगभूमीसंदर्भात नाविन्यपुर्ण कार्यशाळा घेणाऱ्या सुषमा देशपांडे यांनी व्यक्त केलेलं हृद्य मनोगत...

अगुस्तो बॉल नावाचे एक ज्येष्ठ नाटककार होते. त्यांनी रंगभूमीवर पहिल्यांदा थिएटर ऑफ ऑप्रेस ही नवीन पद्धत सुरू केली. मी त्यांच्यासोबत ही पद्धत शिकले होते. नाटक हे फक्त एक मनोरंजन नसून नाटकांमार्फत आपण समाजातील वेगवेगळ्या गोष्टी मांडू शकतो. आपलं नाटक हे एका समुदायाचं, समाजाचा आवाज बनू शकतं ही त्यामागची भूमिका असते. याचा वापर मी स्वत: माझ्या नाटकांमधून करते आणि या वर्कशॉपमधूनही आम्ही मुलांना अशा प्रकारचे नाटक शिकवू पाहतो. नाटक समजून घेण्याची नवीन संवेदनशीलता निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘तालीम थिएटर’ यांच्यामार्फत ‘अॅक्टोलॅब’ नावाने अनोख्या प्रकारचे वर्कशॅाप सुरू करण्यामागे मुलांमध्ये वेगळ्या प्रकारच्या जाणिवा निर्माण करणे, त्यातून नाटकाला आवश्यक असणारे अभिनय, गाणी, संगीत हे सर्व मुलांनी शिकावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचे आयोजन करतो. या खेळांतूनच मुलं नाटकाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकतात. उदाहरण सांगायचं तर एका सत्रात आम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून सर्व क्रिया करायला लावतो. डोळे बंद असल्यामुळे आपोआपच मुलांच्या इतर संवेदना अधिक क्रियाशील होतात. त्यातूनच त्यांना अभिनय, ध्वनी याची नव्या पद्धतीने जाणीव होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ फक्त नाटकं शिकवतं नाहीत तर आपल्या स्वत:कडे, स्वत:च्या जाणिवांकडे बघण्याची नवी दृष्टी देतात.आपण आपल्या आयुष्यात अनेक अनुभव घेत असतो, पण या अनुभवांचं विश्लेषण करत नाही. या खेळांतून आम्ही मुलांना हेच विश्लेषण करणं शिकवतो. त्यामुळे या खेळांतून मुलं विचार करायला शिकतात. बॉडी लँग्वेज, आवाज अशा विविध संकल्पनांवरचे नाटकासाठी आवश्यक असणारे खेळ ठरवले आहेत.  हे नाटकासाठी तर आवश्यक आहेच, पण माणूस म्हणून जगतानाही खूप महत्त्वाचं आहे.  

नाटकाचा विषय निवडणे हा एक भागच आहेच, पण तुमच्या सर्व संवेदनांचा, तुमच्या आवाजाचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करता या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यशाळेत लेक्चर देऊन नाटकाबद्दल शिकवत नाही तर अशा पद्धतीने खेळांचा उपयोग करून नाटक शिकवतो. यातून मुलं खूप मोकळ्या पद्धतीने बोलू लागतात, विचार करू लागतात. बघणं, ऐकणं, स्पर्श या जाणिवांबद्दल जास्त जागरूक करणं हा आमचा मूळ उद्देश आहे. हल्लीच्या काळात टीव्ही आणि रिअॅलिटी शोमुळे मुलांचा आणि पालकांचा कल हा जास्त टीव्ही सीरियलमध्ये काम करण्यासाठी, तिथं काम मिळावं याकडेच असताे. त्यामुळे अनेकदा नाटकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक असतो. पण नाटकांमधील अभिनयामुळे खऱ्या अर्थाने कलाकार घडतो, असं मला वाटतं. या कार्यशाळेत  चौदा-पंधरा वर्षातील मुलं-मुली आहेत. 

या कार्यशाळेत आम्ही नाटकात किंवा सीरियलमध्ये काम मिळवून देऊ वगैरे अशा प्रकारचं कोणतच आमिष देत नाही. आपल्याकडे सामाजिक विषयांवरच्या नाटकांकडे खूप नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. यामध्ये समाज आणि  नाट्यक्षेत्रातल्या एका मोठ्या गटाचादेखील समावेश आहे. नाटकातून सामाजिक विषयांची मांडणी म्हणजे कंटाळवाणा, रटाळ भाग आहे, असं देखील अनेकांचं मत असतं. पण मला नाटक हाच समाजाचा आरसा आहे असं वाटतं. आपल्याकडे मराठी रंगभूमीला अशी परंपराही आहे. यामध्ये घाशीराम कोतवाल, नटसम्राट, पाहिजे जातीचे, कमला अशा अनेक सामाजिक अंतरंग मांडणाऱ्या नाटकांची परंपरा आहे. त्यामुळेच चाकोरीबाहेरची नाटकं करण हेच  महत्त्वाचं असल्यानं हीच परंपरा पुढं नेली पाहिजे, असं मला वाटतं.

(sushama.deshpande@gmail.com)

बातम्या आणखी आहेत...