आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्‍नांच्‍या शोधातले टोकदार काव्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जिथे सिंधी तोच सिंध' असे मानत, एक मोठा सिंधी समूह इथे राहिला. तो पाकिस्तानातून इथे स्थलांतरित झाला नि इथल्या संस्कृती-परंपरांचा अविभाज्य घटक बनला. त्या अनुषंगाने गेली दोन दशके सिंधी समूहाच्या भावभावनांचा आविष्कार आपल्या साहित्यातून रेखांकित करणाऱ्या नामांकित सिंधी कवयित्री म्हणून विम्मी सदारंगानी यांचा उल्लेख निश्चितच प्राधान्याने करावा लागेल...

 

काही हजार वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली सिंधी ही भारतीय उपखंडातील अतिप्राचीन भाषांपैकी एक प्रमुख भाषा होय. या भाषेतील साहित्याने प्रदेशाची, धर्माची बंधने तर ओलांडलीच, पण त्यासोबतच वैदिक आणि इस्लामिक विचारधारेला सामावून घेणारी एकमेवाद्वितीय अशी परंपराही निर्माण केली. म्हणूनच या भाषेत जशी शहा अब्दुल लतीफ यांची सुफी कविता आढळते, अगदी तसेच सामीसारख्या महान कवीची वैदिक परंपरेवर आधारित कविताही आढळते. फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. पण आपल्या राष्ट्रगीताप्रमाणे ‘पंजाब सिंध गुजरात मराठा' ही एकात्मतेची परंपरा सांगत ‘जिथे सिंधी तोच सिंध' असे मानत, एक मोठा सिंधी समूह इथे राहिला. तो पाकिस्तानातून इथे स्थलांतरित झाला नि इथल्या संस्कृती-परंपरांचा अविभाज्य घटक बनला. त्या अनुषंगाने गेली दोन दशके सिंधी समूहाच्या भावभावनांचा आविष्कार आपल्या साहित्यातून रेखांकित करणाऱ्या नामांकित सिंधी कवयित्री म्हणून विम्मी सदारंगानी यांचा उल्लेख निश्चितच करावा लागेल.

 

गुजरातमधील आदिपूर येथील विम्मी सदारंगानी या सिंधी भाषेच्या अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी आणि सिंधी साहित्यामध्ये अनुवादाच्या संदर्भात असलेले परस्परपूरक संबंध यावर महत्त्वपूर्ण मांडणी केलेली आहे. त्यांचा सिंधी भाषेमधील ‘सोनहरे रंग जी करणी' हा पहिला काव्यसंग्रह १९९६ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर आजमितीस त्यांच्या नावावर चार काव्यसंग्रह आहेत. त्यांनी हिरिरीने बालसाहित्यसुद्धा लिहिलेलं आहे. त्यांच्या बालसाहित्यात विशेषत्वाने ‘मम्मी इये छो आहे' आणि ‘सभाजी राणी’ या बालसाहित्याचा विशेष उल्लेख करायला हवा. अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘सवाल कि तलाश में' या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी दिवसेंदिवस विरोधाभासी जगणाऱ्या नि व्यवस्थाशरण जाऊ पाहणाऱ्या मानवी प्रवृत्तींचा समाचार घेतलेला आहे.

 

विम्मी सदारंगानी यांच्या कवितेत वाचकाला समकालाचे वास्तव शब्दांकन आढळून येते. त्यात कोणत्याही प्रकारची पोज घेतलेली नसते. रोजच्याच जगण्यातील साध्या साध्या गोष्टी वा प्रसंग त्या वाचकांसमोर उभे करतात. त्यातील नेमका विरोधाभास त्या पकडतात. नि मग त्यांची कविता वाचकाला अस्वस्थ करू लागते. त्या एका कवितेत लिहितात की - मैंने तो / तुमसे कुछ भी नहीं पूछा / बस, सिमट गई तुम्हारी बाहों में / तुम्हारा कसता आलिंगन / मैंने तुम्हारा प्यार समझा / पता ही नहीं चला / कब मेरा दम घुट गया। ही कविता कोणत्याही काळात आपला परिवेश लपेटून घेते. आजूबाजूच्या जगण्यातील ताणपेच योग्य शब्दांत पकडण्याची किमया त्यांची कविता करते. नातीगोती नि कुटुंब-कबिल्यालाच आपलं सर्वस्व मानून जगणाऱ्या किती तरी अनाम स्त्रिया आपल्या आसपास असतात. खरं तर त्या आपल्या घरातही असतातच की. एकंदरीतच त्यांचं माणूस म्हणून हळूहळू नाहीसं होत चाललेलं आयुष्य कवयित्रीने नेमकेपणानं अधोरेखित केलंय. त्यांच्या जगण्यातील अश्रेयी होरपळ समजावून घेण्यासाठी ‘माझा आवळत गेला श्वास' असं सांगणारी ही कविता निश्चितच पुरेशी आहे.

 

दुर्दैवाने आपण अशा एका काळात जगतोय की, जिथे सामान्य माणसाला अगदी साध्या साध्या स्वप्नांनाही मोताद व्हावे लागतेय. कवयित्री सांगते - मैं देख रहा हूँ ख़्वाब / रोटी के, पानी के, रोशनी के / शांत हवा के, खुली खिड़की के... दिवसेंदिवस जगणं अधिकच कठीण होत जाण्याचा हा काळ आहे. अशा वेळी बनेल सत्ताधारी मात्र वेगळ्याच गोष्टी आळवत असतात. रोजच्या जगण्याच्या अडीअडचणींपासून ते सामान्यांना दूर लोटू पाहतात. नि त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. कोणतीही दंगल ही योगायोग असूच शकत नाही. एखादा धर्म दुसऱ्या एखाद्या धर्माच्या विरोधात सहजच कसा उभा राहतो? एक हिंसक नि दहशतगर्द परिस्थिती आजूबाजूला कशी उभी राहते. कवयित्री सांगते की - ‘जेव्हा हिटलर झोपला असेल / आणि गांधी सूत कातण्यात असेल मग्न / तेव्हा आपण मात्र / खेळू लपाछपी' तर दुसऱ्या एका कवितेत ती सांगते - कोई तो मुझे बताए कि / आख़िर कौन सी ऐसी शांति है / जिसको लाने के लिये / ज़रूरत है लड़ाई की! / खू़न की! बंदूक की! या कवयित्रीकडे फक्त अणकुचीदार प्रश्न आहेत. अस्वस्थ करणारे. झोपेचं सोंग घेऊ पाहणाऱ्यांना जागे करू पाहणारे. एकंदरीत असे अनेक कवितारूपी प्रश्न उभे करून जनसामान्यांची भावभावना अधिक मुखर करण्याची आस विम्मी सदारंगानी या कवयित्रीला झपाटून टाकत आहे.

 

सिंधी भाषेला स्वतःचा असा एक देदीप्यमान इतिहास आहे. अंगभूत गेयता नि लोककथांचा बेमालूम वापर यातून हे साहित्य अधिकच रसरशीत बनले आहे. म्हणूनही ते लोकाभिमुखी राहिले आहे. देवनागरी, अरेबिक नवरा अशा अनेक लिपी वापरात असूनही त्याच्या सौंदर्याला कधीच बाधा आली नाही. एखाद्या भाषिक साहित्यासोबतच संगीताचाही समांतर विकास होण्याचे प्रकार जगात दुर्मिळ आहेत. सिंधी साहित्य नि संगीत मात्र वर्षानुवर्षे एकरूप राहिले. त्या भाषेतील साहित्य जन्मताच नादमाधुर्य घेऊन जन्माला आलेले आढळते. अगदी ‘डोडल रसो'सारख्या साहित्याला, तर काही हजार वर्षांची परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळात सिंध प्रांतासाठी सिंधीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला होता. आपल्याकडे पवित्र कुराणाचे पहिल्यांदा भाषांतर हे सिंधीमध्ये झाले, असे मानले जाते. सुरुवातीपासूनच ही भाषा नि तिचे साहित्य एक प्रकारचा धार्मिक उदारमतवाद बाळगून आहेत. वैदिक व इस्लामिक तत्त्वज्ञानाचा अप्रतिम मिलाफ आणि सोबत सुफी शिकवण हे या भाषेतील साहित्याला अधिकच समृद्ध करत राहिले आहे. यासाठी शाह अब्दुल लतीफ यांच्या कवितेचा आपणाला विचार करता येईल. सिंधी साहित्यातील या सर्वश्रेष्ठ कवीने अठराव्या शतकाच्या सुमारास लिहिलेल्या ‘रिसालो' हा आपल्या भूमीतील एक सर्वोत्तम साहित्य आविष्कार मानला जातो. विशेष म्हणजे प्रा. ख्रिस्तोफर शाकल यांनी याचवर्षी ‘रिसालो'चे संपादन नि भाषांतर इंग्रजीमध्ये केलेले असून ते आवर्जून वाचण्यासारखे आहे.

 

एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीचा सिंधी जनमानसावर अनन्यसाधारण परिणाम झाला. त्यातूनच एका अखंड समाजाचे दोन तुकडे झाले. एकच समाज दोन देशांत विभागला गेला नि ही जखम दोन्हीकडे खूप काळ खदखदत राहिली. इतर भारतीय भाषांप्रमाणे सिंधी साहित्यातही फाळणीच्या काळातील रक्तरंजित वास्तववादी चित्रण आढळून येतच. पण त्यासोबतच हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या सौहार्दाच्या, मानवीयतेचं दर्शन घडवणाऱ्या गोष्टीही प्रकर्षाने आढळून येतात. ७० वर्षांनंतर कदाचित इथे लिहिणाऱ्या लोकांनी फाळणी पहिलीही नसेल. किंवा त्यांचा जन्म स्वतंत्र भारतातच झाला असेल. पण असे कैक साहित्यिक आपली परंपरा, संस्कृती नि इतिहास म्हणून सिंध प्रांताशी स्वतःला जोडून घेतात. शेवटी, कोणताही देश हा मातीपासून नाही, तर त्या देशातील माणसापासून बनतो, असं सांगणारे सिंधी कवी नारायण श्याम सांगतात की, ‘जिथे सिंधी आहे, तिथे सिंध' आहे. सिंध हा भूभाग नाही, तर एक संस्कृती आहे. ती जपताना सिंधी बांधव दिसताहेत. अगदी याचसाठी आपणाला विम्मी सदारंगानी यांनी लिहिलेली ‘सिंध जिये, सिंधवाले जिये' या कवितेचा विचार करता येईल.

 

एकंदरीतच विम्मी सदारंगानी या कवयित्रीच्या विपुल साहित्यातून वाचकाला समृद्ध सिंधी संस्कृतीचे दर्शन घडत राहते. प्रश्नांच्या शोधात निघालेल्या या कवयित्रीच्या कविता वाचकांसमोर एक प्रश्न म्हणूनच उभ्या ठाकतात. त्या एका दहशतजर्द जगाची चाहुल देत उभ्या ठाकतात. कठीण काळात, जेव्हा माणसाचा कस लागणार असतो, तेव्हा कवी मात्र आपली कविता हेच समाजाप्रती दायित्व मानून लिहित असतो. ही कवयित्री जेव्हा लिहिते की, ‘मैं ही हूँ आपकी आख़िरी उम्मीद' तेव्हा त्यातील मर्म निश्चितच आपल्यासमोर उलगडत जाते. कोणत्याही कवीचं लिहिणं, बोलणं हेच हजारो वर्षांची संवादाची सहिष्णु परंपरा प्रवाहित करत असते. आजच्या काळात, जर एका समृद्ध भाषेतील समकालीन उदारमतवादी आवाज समजून घ्यायचा असेल, तर विम्मी सदारंगानी यांची कविता वाचायलाच हवी आहे.

 

shinde.sushilkumar10@gmail.com

लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

बातम्या आणखी आहेत...