आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍त्री दास्‍यमुक्‍तीचा अविष्‍कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय साहित्यात फाळणीला केंद्रीभूत ठेवून अतिशय सकस साहित्य लिहिले गेले आहे. त्यामध्ये मंटो ते खुशवंतसिंग नि गुलजार ते शिव कुमार यांच्या ‘अ रिव्हर विथ थ्री बँक' या साहित्यकृतीची प्रामुख्याने दखल घेतली जाते. आणि त्यातच  बिंदू भट्ट यांच्या ‘आखेपातर' अर्थात ‘अक्षयपात्र' या कादंबरीचीही प्रामुख्याने नोंद घ्यावी लागेल...

 

पंधराव्या शतकातील आद्यकवी नरसी मेहता यांचा एकूणच गुजराती साहित्य- समाजमनावर विशेष प्रभाव राहिलेला आहे. त्या काळामध्ये वैष्णव जणांची व्याख्या सांगताना या संतकवीने  लिहिले की - ‘जे पीर पराई जाणे रे' तोच खरा वैष्णव असतो. काळाच्या ओघात पुढे हेच भजन महात्मा गांधीजींचे सर्वात आवडते भजन राहिले. गेल्या दशकभरात मात्र गांधींचा असलेला गुजरात किंवा नरसी मेहतांचा गुजरात, अवघ्या भारतभर स्वतःच्या विकासाच्या प्रारूपासाठीही प्रसिद्ध राहिला. याच काळात झालेलं गोध्रा हत्याकांड किंवा अलीकडचे उना प्रकरण या सर्वांचे ओरखडेसुद्धा इथल्या समाजमनावर प्रकर्षाने उमटलेले दिसून येतात. या पार्श्वभूमीवर समकालीन गुजराती साहित्यामध्ये गेल्या काही दशकातील एक प्रमुख कादंबरीकार म्हणून आपणाला बिंदू भट्ट यांची नोंद निश्चितच घ्यावी लागते.

 

गुजरात  विद्यापीठाशी  संलग्न  असलेल्या एका महाविद्यालयामध्ये बिंदू भट्ट या हिंदीच्या प्राध्यापिका आहेत. ‘आधुनिक हिंदी कादंबरी' हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. सुरुवातीला कादंबरी, सोबतच लघुकथा नि समीक्षात्मक लेख असं वैविध्यपूर्ण लेखन आजमितीस त्यांच्या नावावर आहे. ‘मीरां याज्ञिक नी डायरी' ही त्यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी विद्रा व मीरा या दोन मैत्रिणीच्या समलिंगी संबंधावर बेतलेली आहे. म्हणजे १९९२ मध्ये  कादंबरी साठी एका प्रादेशिक भाषेत समलिंगी संबंधाची हाताळणी करणे हे निश्चितच क्रांतिकारी होते. त्यावेळी या कादंबरीवर दोन्ही बाजूने प्रचंड वाद प्रतिवाद झाले. पण त्यासोबतच ‘मीरा याज्ञिक नी डायरी' या कादंबरीने बिंदू भट्ट यांना मात्र गुजराती कथा-साहित्य विश्वात एक सशक्त कादंबरीकार म्हणून प्रस्थापित केले.

 

भारतीय साहित्यात फाळणीला केंद्रीभूत ठेऊन अतिशय सकस साहित्य लिहिले गेले आहे. त्यामध्ये मंटो ते खुशवंत सिंग नि गुलजार ते शिव कुमार यांच्या ‘अ रिव्हर विथ थ्री बँक' या साहित्यकृतीची प्रामुख्याने दखल घेतली जाते. आणि त्यातच बिंदू भट्ट यांच्या ‘आखेपातर' अर्थात ‘अक्षयपात्र' या कादंबरीचीही प्रामुख्याने नोंद घ्यावी लागेल. मूलतः फाळणीसारख्या घटनेला मध्यवर्ती ठेऊन लिहिलेली ही गुजराती साहित्यातील पाहिलीच कादंबरी होती. या कादंबरीचे अनेक भारतीय भाषेत भाषांतर झालेले आहे. अंजनी नरवणे यांनी या कादंबरीचे मराठीमध्ये ‘अक्षयपात्र' या नावाने भाषांतर केलेले असून ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
आजूबाजूच्या हलाखीच्या परिस्थीतीने हतबल झालेली, परिस्थितीच्या  रेट्याने मोडून पडलेली माणसं या कादंबरीत आपणाला पाहायला मिळतात. त्यांची एकाकी झुंज नि दररोज तोंडासमोर उभे राहणारे कडवट प्रसंग जगूनच पुढे सरकणारी ही माणसं या कथाविश्वाचा आत्मा आहेत. फाळणीमुळे उद्ध्वस्त झालेल्या नि ती सावरण्यासाठी एकाकी लढा देणाऱ्या नायिकेचे वास्तवपूर्ण चित्रण या कादंबरीत आढळून येते. स्त्रीच्या नजरेतून फाळणीच्या दुष्परिणामांना सामोरे जाणारी ही गुजराथी साहित्यातील दुर्मिळ अशी कादंबरी आहे. वर्तमान काळासोबतच भूतकाळातील आठवणींना उजाळा देत या कादंबरीचे कथानक आकाराला येत जाते. पश्चिमेला दिसणाऱ्या लालसर चंद्र कंचन बा या नायिकेला ज्वारीच्या अर्ध्या भाकरीसारखा दिसत राहतो. नि त्यातूनच त्यांना मागे पडलेल्या दुष्काळाची आठवण होत राहते. नि ती सांगते तेव्हा - ‘अन्नधान्याची तंगी होती. लोक तासनतास रेशनच्या दुकानासमोर उभे राहायचे. तेव्हा परदेशातून आलेले लाल गहू आणि लाल ज्वारीचे पीठ मिळायचे'. एकीकडे दोन घासासाठी मारामार असतानाच स्त्री म्हणून असलेला अंगचाच  चिवटपणा सांगताना नायिका म्हणते की - मी एक स्त्री आहे. एका एवढ्याशा गवताच्या काडीलाही घरटं मानून जगण्याची शक्ती माझ्यात आहे.  


पण असा धीर धरत असतानाच चिल्ल्यापिल्ल्यांच्या हालअपेष्टा पाहण्याची सक्ती मात्र भयानक आहे. नायिका सांगते की - लहान, लहान गोष्टींसाठी आसुसलेल्या मुलांचे डोळे बघायला जेवढी हिंमत लागते, त्यापेक्षा फार कमी हिंमत लागते आत्महत्या करायला. मरण्यापेक्षा जगणे भयानक असलेल्या एका भयपर्वाचे बहुस्तरीय शब्दांकन या कादंबरीत वाचकाला आढळून येते. लेखिकेने या कादंबरीत सौराष्ट्रात आढळून येणारी खेडवळ रांगडी भाषा योग्य पद्धतीने वापरलेली आहे. तिथल्या लहानशा खेड्यात राहणाऱ्या माणसांच्या विचारविश्वाचा आढावा घेत असताना त्या भागातील चालीरीती,परंपरा किंवा मिथके भेदकपणे आकाराला आलेली पहायला मिळतात. नायिका सांगते की - शेतकरी तर म्हणायचे, ‘जे वर्ष चांगले जाईल त्या वर्षी शेतकरी बैल तरी नवे आणतो किंवा बायको तरी. त्या काळात मुली कमी असायच्या. मुलगा रोख दोन हजार रुपये द्यायला तयार होता, पण समता सोडचिठ्ठी द्यायला तयार नव्हती. या कादंबरीमध्ये असे कित्येक प्रसंग किंवा संवाद सापडतील की ते आपणासमोर तत्कालीन परीस्थितीतील सामाजिक नि राजकीय ताणेबाणे उलगडून दाखवतील. मुळातच सुरुवातीपासूनच गुजराती  कादंबरी लेखनाला एका ठोस सामाजिक आशयाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. यासाठी आपण पहिल्यावहिल्या ‘करण घेलो' या नंदशंकर मेहतांच्या गुजराती कादंबरीचा विचार करू शकतो. वाघेला राज्याच्या शेवटचा राजपूत अर्थात करण या राजाच्या आयुष्यावर बेतलेल्या कादंबरीला जशी ऐतिहासिक पार्शवभूमी आहे अगदी तसाच त्याला ठाशीव असा सामाजिक आशयसुद्धा आहे. अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेली ही कादंबरी, राजा रामदेवराय यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेसंबंधांवर ही प्रकाश टाकते. सती प्रथा, तत्कालीन समाजवर्तन, त्यांचे रोटी-बेटीचे व्यवहार व जगण्याच्या पद्धती यांचे अतिशय बारकाव्यानिशी मांडणी आद्य कादंबरीकार नंदशंकर मेहता यांनी या कादंबरीमध्ये केलेली आहे. थोडक्यात अक्षयपात्र ही बिंदू भट्ट यांची कादंबरीही त्या काळातील एका स्त्रीपात्राच्या माध्यमातून केलेले ठोस सामाजिक विधान असल्याचे वाचकांच्या निश्चितच लक्षात येते.

 

अक्षयपात्र ही कादंबरी लेखिकेने रघुवीर चौधरी यांना अर्पण केलेली आहे. रघुवीर चौधरी हे गुजराती मधील फक्त ज्ञानपीठ पुरस्कार विजेतेच नसून, गुजरात दंगलीनंतर अमानुष कत्तलींच्या विरोधात आवाज उठविणारे ते महत्त्वाचे साहित्यिक आहेत. म्हणूनच अक्षयपात्र त्यांना समर्पित करण्यात एक गभितार्थ आहे असे मला वाटते. त्या सोबतच अनिल जोशी यांनी याच पार्श्वभूमीवर ‘हुल्लोड गीतो' अर्थात ‘दंगलीची गीते' प्रकाशित केली. तर आयेशा खान यांनी वेगवेगळ्या भागातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अत्याचाराला जाब विचारणाऱ्या कवितांचे ‘कुछ तो कहो यारो' या नावाने संपादन केले. दुर्दैवाने दंगलीच्या काळात ‘वली गुजराथी' या उर्दूतील महत्वाच्या कवीची कबर उद्धवस्त करण्यात आली. मृत्यपूर्वी या कवीने लिहिले होते की - ज्या शहराचे गाणे मी / आयुष्यभर गात आलोय / त्या शहरातच / मात्र राहणे शक्यच होत नाहीये मला. दुर्दैवाने काही काळातच कवीची ही  भावना संवेदनशील जनमानसासाठी खरी ठरली. त्यासोबतच आपल्याला अलीकडे गुजरातमध्ये झालेल्या उना प्रकरणाची दखल घेणे भाग आहे. या घटनेचा निषेध म्हणून अमृतलाल मकवना या तरुण लेखकाने आपला पुरस्कार राज्य शासनाला माघारी केला. पण त्यासोबतच गुजराती दलित साहित्यावर आपल्याकडील मराठी दलित साहित्याचा बराच मोठा प्रभाव राहिलेला आहे हेही यानिमित्ताने दिसून येईल. बिंदू भट्ट यांचा ‘बांधणी' या नावाने एक लघुकथा संग्रह ही २००९ साली प्रकाशित झालेला आहे. सोबतच त्यांनी हिंदीतून गुजराती नि गुजराती भाषेतून हिंदी भाषेत ही अनुवाद केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण आंधळी गल्ली व सुरेंद्र चौधरी लिखित फणीश्वरनाथ रेणू या गुजराती अनुवादाचा विचार करायला हवा. एकंदरीतच बिंदू भट्ट या गुजराती भाषेतील आघाडीच्या लेखिकेच्या समग्र साहित्यात आपणाला एक प्रागतिक सूर आढळून येतो. त्यांच्या साहित्यात आढळणाऱ्या नायिका या मर्जीनुसार जगणाऱ्या आहेत. व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी त्या कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याचं धाडस बाळगणाऱ्या आहेत. एकाच वेळी बिकट परिस्थितीशी दोन हात करत असतानाच त्या स्वतःचं एक जग निर्माण करू पाहतायत. लैंगिक नि सामाजिक बंधनांना झुगारण्याची ऐपत त्या बाळगून आहेत. तिने दास्य नि दुय्यमत्व केव्हाचेच नाकारले आहे. तिचे इतरत्र रंगवले जाणारे पारंपरिक रूप नाकारून खुल्या जगाला ती सामोरी जात आहे. एकंदरीतच गुजराती साहित्यातला स्त्री दास्यमुक्तीचा आविष्कार समजून घ्यायचा असेल तर बिंदू भट्ट यांच्या कादंबऱ्या आपणाला वाचाव्याच लागतील.

 

लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३
shinde.sushilkumar10@gmail.com

बातम्या आणखी आहेत...