आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी हे हिटलरच; त्यांना प्रतिस्पर्धी नकोय, त्यामुळेच अकांडतांडव!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्‍ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जर्मनचा हुकुमशहा हिटलरशी केली आहे. मोदी हे विपक्षपक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप शिंदे यांनी केला आहे. आपल्या उद्योगपती मित्रांसाठी रफाल तसेच अन्य व्यावसायिक प्रकरणात मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून अकांडतांडव करत आहेत. मिशेल आणि मोदी हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरू आहे, अशी टीकाही सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि परिसरातील काँग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून शिंदे यांनी मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआक्रोश वाढत चालल्यानेच विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी सरकार पोलिस अंगावर सोडत आहे. मात्र, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कायदा हातात घेणाऱ्या पोलिसांनी सत्ता येत जात असते याची जाणीव ठेवावी, असे शिंदे म्हणाले. सोलापूरला आणीबाणीसदृश परिस्थिती आणली गेली हे मोदी हुकूमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेल्या उचलबांगडीतून व कुणाशीही सल्लामसलत न करता जाहीर केलेल्या नोटबंदीसारख्या निर्णयातून ते आधीच दिसून आल्याचेही ते म्हणाले.

 

राज्यात 17 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्यात 17 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एकाही शेतकऱ्याच्या घरी जायला पंतप्रधानांना वेळ नाही. निवडणुकीत दिलेल्या किती आश्वासनांची पूर्तता केली ते ही मोदींनी सांगितले असते तर बरे झाले असते. निवडणुका आल्याने पंतप्रधान मोदी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध प्रकल्पांच्या घोषणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...