यह समय मामुली / यह समय मामुली नही हैं...

जागतिकीकरणानंतर बदलेल्या मानवी-मूल्य व्यवस्थांचा परामर्श घेणारा एक महत्त्वाचा कवी म्हणजे, अंबिका दत्त चतुर्वेदी हे होय. त्यांच्या राजस्थानी ‘हातोडी' बोलीभाषेतील कविता जनमानसात लोकप्रिय आहेत. त्यांच्या कवितेतून त्यांनी बदलेल्या ग्रामीण परिवेशासोबतच वर्षानुवर्षे दबलेल्या वर्गाच्या महत्त्वाकांक्षी इच्छा-आकांक्षाही प्रखरपणे मांडल्या आहेत...

Aug 05,2018 12:33:00 AM IST

जागतिकीकरणानंतर बदलेल्या मानवी-मूल्य व्यवस्थांचा परामर्श घेणारा एक महत्त्वाचा कवी म्हणजे, अंबिका दत्त चतुर्वेदी हे होय. त्यांच्या राजस्थानी ‘हातोडी' बोलीभाषेतील कविता जनमानसात लोकप्रिय आहेत. त्यांच्या कवितेतून त्यांनी बदलेल्या ग्रामीण परिवेशासोबतच वर्षानुवर्षे दबलेल्या वर्गाच्या महत्त्वाकांक्षी इच्छा-आकांक्षाही प्रखरपणे मांडल्या आहेत...


'सोरम का चित्रांम' हा अंबिका दत्त चतुर्वेदी यांचा राजस्थानी भाषेत प्रकाशित झालेला पहिला कविता संग्रह. या संग्रहातील कवितेत त्यांनी ग्राम्य संस्कृतीतून आकाराला आलेलं राजस्थानी जीवन ताकदीने उभं केलं. लोकपरंपरा नि निसर्गाशी सेंद्रिय पद्धतीने एकात्म होऊ पाहणारा त्यांचा परिवेश या कवितेतून मुख्यत्त्वे डोकावत राहतो. त्यानंतर त्यांचा ‘लोग जहां खड़े हैं ’ आणि ‘दमित आकांक्षाओं का गीत' हे दोन हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘दमित आकांक्षाओं का गीत' या संग्रहातील कवितेतून त्यांनी वेळोवेळी नाकारलेल्या, फसवल्या गेलेल्या किंवा परंपरेच्या नावाखाली बेदखल केलेल्या माणसांच्या अपेक्षा शब्दबद्ध केल्या. त्यांच्या या कविता मुकाट्याने अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या माणसाचा आवाज होऊ पाहताहेत. त्यांच्या इच्छा आशा आकांक्षाना बळ देऊ पाहताहेत.


‘आवों में बारहों मास' या संग्रहासोबत त्यांचा ‘आंथ्योई नहीं दिन हाल' अर्थात ‘अजून दिवस मावळलेला नाही' हा राजस्थानी भाषेतील कवितासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहातील कविता लोकगीतासारख्याच ‘हडोती' बोली बोलणाऱ्या राजस्थानी भाषकांना लोकप्रिय असून कित्येक लोकांच्या त्या अक्षरश: तोंडपाठ झाल्या आहेत. अंबिका दत्त यांचा तीन वर्षांपूर्वी ‘नुगरै रा पद' हा राजस्थानी भाषेतील काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. नुगरै म्हणजे, अवसानघातकीपणा करणारा. कृतघ्न. समाजाविषयी कसलीच आस्था बाळगून नसलेली व्यक्ती हीच प्रवृत्ती त्यांनी या संग्रहातून उभी केली. ‘नुगरै रा पद'साठी वापरलेली भाषा, ही जशीच्यातशी लोकसंवादातून उचललेली आहे. रोजच्या जीवनातील व्यंग पकडणारी ही कविता, लोकगीतांसारख्याच ओघवत्या लयीतून आकाराला आलेली दिसून येते. कवी सांगतो - नुगरै काढ रयो अखबार / टीप टाप कै खबरां मांडै / मांडै झूंठा सांचा समचार / दिन भर भागै थोरी कै ज्यूं / सांझ पड्यां होज्या दरबार / सांच वही जो ईंनै मांडी / बाकी सब बातां बेकार. अशा प्रकारे रोजच्या जगण्यातील असंख्य व्यंग शब्दबद्ध करत, ही कविता वाचकांचा ठाव घेताना दिसतेय.


‘कुछ भी स्थगित नहीं’ हा त्यांचा अलीकडे प्रकाशित झालेला एक महत्वाचा काव्यसंग्रह आहे. या संग्रहातील कविता गद्यप्राय आहे. पण ती टोकदार भाष्य करू पाहतेय. थेट प्रश्न विचारतेय. नि व्यवस्थेला तिचा विद्रुप चेहरा कवितारूपी आरशात दाखवण्याची हिंमत दाखवतेय. कवी आजूबाजूच्या राजकीय व्यवस्थेतल्या नैतिक-अनैतिक गोष्टींचा धांडोळा घेतोय. त्यासाठी त्यांना जबाबदार समजतोय. कवी सांगतो - हम उनसे कैसे उम्मीद कर सकते हैं, कि वे नैतिक होंगे / उनकी असली काबिलियत क्या है / सिवा इसके / कि वे किसी भी संप्रदाय, जाति की समूह उत्तेजना को जागृत करके / उसे उन्माद तक ले जानेवाले क्रूर खेल के सूत्रधार हो सकते हैं. काळाच्या ओघात विकृत होत चाललेल्या आणि निव्वळ सत्तेशी सलगी ठेऊ पाहणाऱ्या विकृत राजव्यवहाराचे व्यवच्छेदक विवेचन या कवितेत सुस्पष्टपणे आले आहे.


समाजातील विसंगती अंबिका दत्त नेमकेपणाने टिपून घेतात. त्यासाठी रोजच्याच जगण्यातील वरवरच्या, साधे वाटणाऱ्या, पण अंगावर येणाऱ्या गोष्टी वाचकांसमोर मांडत राहतात. मुलींचे कपडे शिवणारा शिंपी सांगतो, की मुलींची कपडे शिवणे ही काही सोप्पी गोष्ट राहिलेली नाही. तो सांगत रहातो - एक पुरानी ग्राहक की नई सहेली की ननद का किस्सा / जिसकी कहीं बात चल रही थी फिर टूट गई / उसने जहर खाया था, अनजान जगह पर / लावारिस मिली उसकी लाश को पहचाना था, पुलिस ने कपड़ों से / उसने मेरे सिले हुए कपड़े पहन रखे थे / उस दिन मुझे लगा / औरतों के कफन और शादी के जोड़े / क्या एक से होते हैं... असा एक साधा प्रश्न उभा करून कवी आजूबाजूच्या पुरुषप्रधान संस्कृतीचे कुरूप अंतरंग वाचकांसमोर उभे करतात. हे हररोज घडणाऱ्या प्रसंगातून आकाराला येत जाणारे कुरूप दर्शन वाचकांना अधिकच अस्वस्थ करून सोडते.


अंबिका दत्त यांच्या समग्र साहित्यातच त्यांची कवी म्हणून असलेली त्यांची स्पष्ट भूमिका प्रकर्षाने आढळून येत राहते. सौदेबाजीच्या काळात भाट झालेले साहित्यिक आपण आजूबाजूला पाहतोय. कवी सांगतो कि ‘चापलूस कवि तो बचे रहेंगे / लेकिन उनकी कविता नहीं बचेगी'. आपली कविता ही प्रामाणिकपणाच्या कसोटीवर टिकायलाच हवी, अशी आग्रही भूमिका ते घेतात. आपल्याकडे नारायण सुर्वे म्हणतात, तसे ‘इमानं विकत घेणारी दुकानं पाडापाड्यावर' आहेत. पण अंबिका दत्त सांगतात कि ‘मैं भूख में भले ही अपने जिस्म को खा लूं /पर अपनी आत्मा बचाए रखूंगा' आणि याच मुळे अंबिका दत्त यांची कविता त्यांच्या समकालीन लेखकांपासून त्यांना अधिक उंचीवर घेऊन जाते.


अंबिकादत्त यांच्यासाठी कविता ही सृजनात्मक आविष्काराच्याही पलीकडे काही तरी आहे. त्याच्यासाठी लागणारी जोखीम हा कवी स्वीकारतो आहे. ‘इसका क्या करूं' या कवितेत ते लिहितात - सच जान सका / जितना भी जीवन में / उतना ही कहने में / कितना जोखिम है. अर्थात, या देशात खरे बोलणाऱ्यांच्या वाट्याला एखाद्या इंद्रायणीचा डोह किंवा बंदुकीच्या गोळ्या येण्याचा फार मोठा इतिहास आहे. कवी पुढे सांगतो - क्या करूं, डरूं? / न कह कर डरता रहूँ / या कह कर मरूँ. आणि अगदी याच वेळी कवी मात्र आपल्या लिहिण्या बोलण्याची जोखीम स्वीकारून सत्याच्या बाजूने उभा राहताना दिसतोय.


अंबिकादत्त यांच्यासाठी या फक्त कवितेच्या ओळीच उरत नाहीत, तर जगण्यासाठीची आचारसंहिता बनते. मात्र, भल्यामोठ्या वैचारिक वादांची पार्श्वभूमी लाभलेल्या या देशात अलीकडे लिहिणाऱ्या-बोलणाऱ्यांसाठी कमालीची असहिष्णूता बाळगली जातेय. त्यातूनच प्रा. कलबुर्गींचा निर्घृण खून केला जातो आहे. हा काळ लेखकांसाठी परीक्षा पाहणाराच होता. त्या वेळेस अंबिका दत्त लिहितात की - मैं आत्मग्लानि से भर गया हूं... आपली भूमिका सांगताना, ते म्हणाले की ‘मेरे जीवन में अपनी रचनाकार बिरादरी की स्वस्ति से अधिक मूल्यवान कुछ भी नहीं है. नि त्यातूनच त्यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला. त्यांच्यासाठी हा निषेधाचा मार्ग होता. पण या निषेधासोबतच त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून या विकृतींविरुद्धचा लढा उत्तोरोत्तर अधिकच तीव्र केलेला आहे.


अंबिकादत्त यांची कविता फक्त त्यांच्याच परिघापुरती मर्यादित राहत नाही. ती कवी राहतो, त्या राजस्थान किंवा एखाद्या प्रदेशाची कविता वाटत नाही. ती सार्वत्रिक होत जाते. ती आपलाच भवताल आपल्यासमोर उभा करून, ‘यह समय मामुली नहीं है' ही चेतावणी देते. ती हळहळू आजच्या काळाचा आगाज बनत जाते. अंधारून आलेल्या काळात प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग बनू पाहते. ही कविता जशी ग्रामीण जगण्यातली सहजता आपल्यासमोर उभी करते, अगदी तसेच हजारो वर्षांपासून दबलेल्या पीडितांच्या आशा-आकांक्षानाही मुखर करतेय. ती राजकीय व्यंगांसोबतच ‘नुगरै' च्या माध्यमातून समाज म्हणून आपल्यालाही आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडते . ‘कविता अपने अंतर से आती खुशबू है' असं लिहिणारा कवी इथे त्याच्याच शब्दांत त्याच्या कवितेचं मर्म उलगडतोय. ‘कविता हमें खींचती है / सरलता की ओर' असं सहज सुंदर लिहिणाऱ्या, अंबिका दत्त चतुर्वेदी या कवीची कविता आपण वाचायलाच हवी,अशी आहे.


- सुशीलकुमार शिंदे
लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

X