आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अस्‍वस्‍थ संघर्षपर्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अस्वस्थ आसाममधल्या बोडो समूहाचा इतिहास हा संघर्षाचाच राहिलेला आहे. हा संघर्ष अस्मितेचा आहे, भूमीवर टिकून राहण्याच्या अस्तित्वासाठीचा आहे. त्यातून आकारास आलेल्या उद्ध्वस्त जगण्याला अनिलकुमार बोरो यांनी अवकाश मिळवून दिलाय... ही अवकाशमुक्तीच आशेचे किरण पेरणारी आहे...


अवघ्या काही शतकांची लिखित परंपरा असतानाही आज बोडो साहित्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली जात आहे. आजूबाजूचा हिंसक परिवेश, सांस्कृतिक वर्चस्वासाठीचे निरंतर लढे नि अनेकांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक हे सारेच या भागातील लोकांसाठी नेहमीच असंतोषाचे कारण राहिलेले आहे. सोबतच शासनदरबारी आढळणारी अनास्था समूहाला अंधाऱ्या कोपऱ्यात ढकलणारी ठरली आहे. यासाठी आपण सध्या आसाममध्ये सुरू असलेल्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा' प्रातिनिधिक उदाहरण म्हणून विचार करू शकतो. पर्यायाने इथला सामान्य नागरिक नेहमीच दहशतग्रस्त राहिलेला आहे. म्हणूनही तो कमालीचा साशंक आहे नि तितकाच अस्वस्थही आहे. अशा या जनमानसाची लोकभावना शब्दबद्ध करणाऱ्या काही मोजक्या साहित्यिकांपैकी बोडो भाषेतील एक सशक्त साहित्यिक म्हणून अनिल कुमार बोरो हे परिचित आहेत.

 

अनिल कुमार यांच्या लक्षवेधी साहित्यनिर्मितीत चार कवितासंग्रह, चार समीक्षाग्रंथ, काही संपादने व वेळोवेळी केलेल्या भाषांतरांचा समावेश आहे. ‘सिफुंग नि देणखव' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ‘डेल्फिनी ओणथाई मडवाई' अर्थात ‘डेल्फी आणि इतर कविता' या संग्रहाचे त्यांनी स्वतःच इंग्रजीत भाषांतर केलेले आहे. त्यांचे बोडो साहित्याचा इतिहास सांगणारे एक महत्त्वाचे पुस्तक २०१३ च्या दरम्यान साहित्य अकादमीने प्रकाशित केले. ‘अ हिस्टरी ऑफ बोडो लिटरेचर' या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी बोडो समूहाच्या आदिम इतिहासाचा रोचक परामर्श घेतलेला आहे. एकेकाळी उत्तर ईशान्य भारतात प्रभावशाली असलेल्या बोडो समाजाचे झालेले स्थलांतर, नि त्यातूनच ब्रह्मपुत्रेच्या काठावर विकसित झालेल्या बोडो संस्कृतीचा बहुस्तरीय वेध त्यांनी घेतलेला आहे. रजनीकांत हजारिका या विचारवंताच्या मते, बोडो समूह हा त्या ईशान्य भारतातील आदिम समूह असून त्यांचा संबंध थेट बाणा राजवटीशी जोडला जातो. आजमितीस आसामसोबतच त्रिपुरा व नागालँडमध्ये राहणाऱ्या बोडो भाषकांची संख्या जवळजवळ ३५ लाखांच्या अासपास आहे. मग या स्थलांतरातून बोडो लोकसाहित्यातील विविधांगी पैलू कसे विकसित होत गेले, याची नोंद अनिल बोरो यांनी सविस्तर घेतलेली आहे. सोबतच रामायण, महाभारत ते अलीकडच्या काळात मिशनऱ्यांचा पडलेला बोडो समूहावरील प्रभाव इत्यादी गोष्टी या पुस्तकातून वाचायला मिळतात. मौखिक परंपरेचा परामर्श घेत, ‘बिबर’ या बोडोतील पहिल्या मासिकापासून ते समकालीन साहित्यातील गुणवैशिष्ट्यांसह हे पुस्तक आपणाला माहिती पुरवते. सुरुवातीला लिहिण्यासाठी रोमन लिपी वापरणाऱ्या बोडो भाषेने कालांतराने बंगाली, अासामी करत देवनागरी लिपी स्वीकारली, हेही या पुस्तकातून मांडलेले आहे.

 

अनिल बोरो यांच्या कवितेतून आपणाला बोडो समूहाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारे दमन समजून येते. भाषा, संस्कृती नि परंपरा नाकारल्या गेल्याच्या दबावातून आजूबाजूला पसरणारी हिंसा कवी हतबलपणे पाहतोय. कवीला जाणवतेय की, जशी दिल्ली आसामला सापत्नभावाची वागणूक  देतेय, त्याचीच तर पुनरावृत्ती आसाम, बोडो भाषकांशी करते आहे. हे सांस्कृतिक स्तरावरील दमन कवीला अधिकच अस्वस्थ करते आहे. जेव्हा कोणताही बहुसंख्य समाज संस्कृती वर्चस्वासाठी एखाद्या प्राचीन परंपरेचे सोयीस्कररीत्या दमन करतो किंवा त्यांच्यावर दुय्यमत्व लादतो. तेव्हा सामान्य माणसांच्या मनात एक असंतोष असतो. हा मनातला असंतोष त्यांना लढण्यासाठी, संघर्षासाठी प्रवृत्त करत जातो. आसाममध्ये बोडो भाषिकांसाठी बोडोलँडच्या मागणीला मनमनांतली खदखद इंधन पुरवत आली आहे. एकेकाळी स्वायत्त असलेली त्यांची परंपरा हा शासकीय पातळीवरचा दुजाभाव ठामपणे नाकारतेय. त्याविरोधातला  आवाज साहित्यातून, संगीतातून किंवा वेगवेगळ्या कलाप्रकारांतून प्रखरपणे उमटू लागलाय. हजारो वर्षांच्या मौखिक परंपरेतून आलेल्या संस्कृतिरचिताला ते या लढ्यासाठीचा आधार मानताहेत. म्हणूनच कवी सांगतो, की ‘हे दगडी देवते, तुला आमच्या वैभवशाली भूतकाळाच्या गोष्टी या जगाला सांगाव्याच लागतील...’ एकंदरीतच अनिल बोरो यांच्यासहित समकालीन लेखकांचे भरणपोषण हे या भाषेतील मौखिक परंपरेवर झालेले आहे. म्हणूनच अवघ्या काही शतकांची लिखित परंपरा असूनही बोडो साहित्य हे देशातील महत्त्वाच्या साहित्यकृतींमध्ये गणले जात आहे. आजूबाजूच्या हिंसक घटनांनी व्यथित झालेल्या अनिल बोरो यांच्या ‘शांततेचा पक्षी' या कवितेचा विचार इथे करायला हवा. कवी सांगतो की, हा शांततेचा पक्षी येऊ द्यात माझ्याकडे / या स्फोटाच्या काळ्याकुट्ट धुरातून / होऊ द्यात हवा थोडी मोकळी / प्राण्याच्या या क्रूर निर्दयी हत्यांनंतर / अशाही वेळी उमलू देत निरागस हास्य / लेकरांच्या ओठावर / उगवू दे उद्यासाठीचा सूर्य. याच कवितेत, या हिंसक वातावरणात माणूसपण हरवलेल्या लोकांना कवी पाहतो आहे नि या पिढीसाठीचा हा स्थित्यंतराचा काळ आहे, याचीही कवीला जाणीव आहे. माणसाचे यंत्र  होणे किंवा माणसाचे रूपांतर निर्दयी जनावरात होणे, एका भयाण काळाची चाहूल आहे, असे कवी सांगतोय.

 

अनिल बोरो यांच्या कवितेत आपणाला बोडो भाषिकांच्या भावभावनेचा एक विस्तृत पट पाहायला मिळतो. आजूबाजूची हिंसा, संघर्ष, आंदोलने नि त्यातून निर्माण झालेल्या दहशतगर्द जगाचे शतखंडित चित्रण या कवितांमध्ये डोकावत राहते. कवीच्या मते, या साऱ्या घाबरवून सोडणाऱ्या गदारोळात कविता ही एकमेव आश्वासक गोष्ट कवीकडे असते, जी त्याला अंतिम सत्याकडे घेऊन जाणारी असते. घुसमटीतून येणाऱ्या एकाकी जगण्यात, जो काही अवकाश उरतो, तो अवकाश कवीच्या मते कवितेनेच व्यापून घेतलेला आहे. ती जशी त्याच्यासाठी निषेधाचे माध्यम आहे, अगदी तसेच जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जासुद्धा. कवी सांगतोय की, त्याचे  स्वतःचे असे एक आभाळ आहे. कवितेचे आभाळ. ती स्वत:सहित आसपासच्या जगण्याचा परिवेश आपल्या पोटात सहजच घेतेय. आणि शेवटी अंतिम सत्याकडे घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणून कवी कवितेकडे पाहतो आहे. हे कवितेचे आभाळच जगण्यासाठी आवश्यक असलेलं स्वातंत्र्य मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असेही ठामपणे सांगतोय.

 

आजूबाजूचे तरुण बोडोलँडच्या मागणीसाठी हिंसक झालेल्या  घटना कवी कैक दशके पाहतोय. त्यांना त्यांची ओळख हवी आहेय. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुय्यमत्व नकोय, नि तरीही कवीला त्यांचा हिंसक मार्ग मात्र मान्य नाहीये. त्यांची हिंसक आंदोलने कवी ठामपणे नाकारतोय. त्यांच्या बहिऱ्या कानांत, हे स्फोटाचे आवाज नि मरणाऱ्यांच्या आरोळ्या पोहोचत नाहीयेत याची कवीला खंत आहे. नि तरीही तो आशावादी राहतो आहे. या तरुण पिढ्या कधीना कधी हिंसेचा मार्ग सोडून आपली मागणी संविधानिक पद्धतीने करतील, यावर त्याचा विश्वास आहे. पुन्हा या भागात शांतता नांदायला लागेल. माणूस पुन्हा नव्याने निसर्गासोबत सहजीवन सुरू करेल, असे तो कवितेतून सांगतो आहे.

 

अशाच प्रकारची मांडणी त्याच्या ‘आग लागलेलं जंगल' या कवितेत पाहायला मिळते. एकेकाळी जो भूभाग सिफुंग व खामसारख्या लोकनृत्याने नि लोकगीतांनी रोमांचित झाला होता. तो भूभाग गोळीबारांच्या नि स्फोटांच्या आवाजाने हादरून गेला आहे. कोणी तरी आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याला ओरबाडले आहे. अशा भूतकाळ पुसण्याच्या विकृत उद्योगाने कवी व्यथित झालाय. कवी सांगतोय, आता या भूभागांवर यांनी इमारती उभारल्यात. नि त्यांच्या राजधान्यासुद्धा यातूनच तर निर्माण झाल्यात. ही कोणताही विचार न करता ओरबडण्याची, हिसकावण्याची रानटी वृत्ती सार्वत्रिक होते आहे, याची कवी जाणीव करून देतोय. जंगलाला गिळंकृत केलेल्या या आगीचे भक्ष्य उद्या कदाचित आपणही असणार आहोत याची चेतावणी देतो आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांनी आपला आसपास असताना, त्याच्याकडे आपणाला दुर्लक्ष्य करून चालणार नाही, असे कळकळीने सांगतोय. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे निश्चित नाही, पण या प्रश्नाला भिडण्याचे धारिष्ट्य नि दृष्टी मला माझी कविता देते आहे, असे कवीचे प्रांजळ म्हणणे आहे.

 

ते सांगतात की, आपण आपण ज्या काळात राहतोय, त्या काळात, एकाच वेळी आजूबाजूला एकापेक्षा अधिक आवाज आहेत. नि त्यात ‘डॅमोक्रॅटिक फॅब्रिक’ची पूर्णतः उणीव आहे. त्यातील अधिक सशक्त नि प्रभावशाली आवाज नेहमीच इतरांना  मोडीत काढत आलेला आहे. तेव्हा मी ज्या समूहाचे, भाषेचे प्रतिनिधित्व  करतो, तिच्या दुःखाच्या दमनाच्या गोष्टी शब्दांकित करणे, ही माझी जबादारीच आहे. हे दबलेले आवाज अधिक मुखर व्हावेत, लोकमुखी व्हावेत,अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत. हेच तर साहित्यनिर्मितीचे प्रयोजन आहे.
एकंदरीत अनिल बोरो यांची कविता जशी निसर्गासोबतच्या सहजीवनाची आहे तशीच गेल्या काही दशकांतील एका अस्वस्थ संघर्षपर्वाची ही आहे. आपली भाषा, संस्कृती नि परंपरेसाठी कोणत्याही स्तराला जाऊन लढणाऱ्या बोडो समूहाला समजून घेण्यासाठी या कवीला निश्चितच वाचायला हवे.  


लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

shinde.sushilkumar10@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...