Home | Magazine | Rasik | sushilkumar shinde's article on baster

बस्तर समजून घेतांना

सुशीलकुमार शिंदे | Update - Nov 11, 2018, 06:40 AM IST

आदिवासी लोकांच्या नैतिकतेचा आणि सांस्कृतिक लोकपरंपरेचासुद्धा खासा दस्तऐवज राहिलेला आहे.

 • sushilkumar shinde's article on baster

  दुर्दैवाने बस्तर म्हणजे फक्त नक्षली जिल्हा इथपर्यंतच आपली समज मर्यादित राहते. मग बॉम्ब, बंदुकांच्या हिंसाग्रस्त परिवेशाच्याही पलीकडेही एक समृद्ध विश्व या भूमीत काही हजार वर्षांपासून नांदत आलेलं आहे, याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. या समृद्ध परंपरेची आणि बस्तरची अस्सल ओळख लोकपरंपरा आणि लोककथांच्या माध्यमातून देशभर करून देणारे महत्त्वाचे कवी म्हणून हरिहर वैष्णव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते...

  कित्येक वर्षांपासून मागास आणि नक्षली म्हणून हिणवलेला बस्तर जिल्हा हा येथील आदिवासी लोकांच्या नैतिकतेचा आणि सांस्कृतिक लोकपरंपरेचासुद्धा खासा दस्तऐवज राहिलेला आहे. एका आदिवासी समूहाची भाषा म्हणून हल्बी ही बस्तरच्या दंडकारण्यात नेहमीच एक महत्वाची भाषा मानली जाते. हजारो वर्षांची मौखिक परंपरा लाभलेली ही भाषा लोककथा आणि वैविध्यपूर्वक लोकसंगीतामुळे अधिकच समृद्ध बनली. या भाषेत महाकाव्यं ठरावीत असे ‘जगार' साहित्य आढळून येते. ज्याची तुलना जगातील काही महत्वाच्या महाकाव्यांशी करता येईल असे अभ्यासकांचे मत आहे. लाला जगदलपुरीसारख्या प्रतिभासंपन्न लेखकाने आयुष्यभर याच भाषेत लेखन करून हल्बीला अधिक समृद्ध केले. दुर्दैवाने आपली समज मात्र बस्तर म्हणजे फक्त नक्षली जिल्हा इथपर्यंतच मर्यादित राहते. मग बॉम्ब, बंदुकांच्या हिंसाग्रस्त परिवेशाच्याही पलीकडेही एक समृद्ध विश्व या भूमीत काही हजार वर्षांपासून नांदत आलेलं आहे, याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो. या समृद्ध परंपरेची आणि बस्तरची अस्सल ओळख लोकपरंपरा आणि लोककथांच्या माध्य्मातून देशभर करून देणारे महत्वाचे कवी म्हणून हरिहर वैष्णव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.


  मुळात हल्बी ही भाषा आहे की बोली इथूनच सुरुवात केली जाते. नि मग त्यातूनच एक दुय्यमत्व त्याच्यातून निर्माण झालेल्या साहित्यावर लादले जाते. खरंतर मराठी आणि ओरिया भाषेचा प्रभाव असेलेली हल्बी ही भाषाच आहे असे जगातील अनेक भाषा अभ्यासकांचे मत आहे. तिला स्वतःचे असे व्याकरण आहे. पण हल्बीला बोलीभाषा ठरवणे अन्यायी आहे. अलीकडे हरिहर वैष्णव किंवा सोनसिंह पुजारीसारख्या हल्बीच्या सर्वोत्तम साहित्यिकांनी तिच्या पूर्वपरंपरेला साजेशी साहित्यनिर्मिती केलेली आढळून येते. प्रामुख्याने काव्यलेखन करणाऱ्या हरिहर वैष्णव यांनी तर कथालेखनासोबतच हल्बीतून विपुल लेखन केलेलं आहे. बस्तरच्या लोकजीवनाचा परिचय करून देणारा त्यांचा ‘मोहभंग' हा महत्वपूर्ण कथासंग्रह मानला जातो. यासोबतच त्यांनी ‘चलो चले बस्तर' किंवा ‘बस्तर के तिज त्योहार' अशाप्रकारच्या बालसाहित्याचीही निर्मिती केलेली आहे. हल्बी साहित्याची महती वाढविणारे अनेक लोकसाहित्याचे संकलन आणि संपादन त्यांच्या नावावर आहे. हल्बी भाषेतून प्रसिद्ध होणाऱ्या घूमर या साहित्यपत्रिकेचे बराच काळ त्यांनी संपादन केलेलं आहे. ‘प्रस्तुती' असेल किंवा ‘एवं ककसाड'सारख्या लघु पत्रिका असतील त्यांचेही ते संपादक राहिलेले आहेत. केवळ हल्बी मधून काव्यलेखन करणाऱ्या कवी सोनसिंह पुजारी यांच्या कवितेचा त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.


  हजारो वर्षांपासून सुखदुःखात गायल्या जाणाऱ्या लाखो लोकगीतांचं संकलन करण्यात हरिहर वैष्णव यांनी त्यांचं आयुष्य खर्ची घातलं आहे. लाला जगदलपुरी या हल्बीतील सर्वश्रेष्ठ साहित्यिकासोबत त्यांनी बस्तरच्या मातीत आढळणाऱ्या लोककथांचं ‘बस्तरच्या लोककथा' या नावाने संकलन आणि संपादन केलेलं आहे. लाला जगदलपुरी एका कवितेत लिहितात कि - भारत देस भुईं चो मांटी / कुडई, कुंद, झुईं चो मांटी / जै जै माता बस्तर मांटी / धन धन बस्तर मायँ धरतनी. त्यांच्यासाठी हल्बी साहित्य हा नेहमीच आस्थेचा विषय राहिलेला होता. लाला जगदलपुरी यांच्या साहित्याचा हरिहर वैष्णव यांच्यावर उचित असा प्रभाव आढळून येतो. अलीकडे त्यांचे लाला जगदलपुरी यांच्या साहित्याचा आणि कर्तृत्वाचा परिचय करून देणारे चरित्रात्मक पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. बस्तरच्या परिवेशातील आदिवासी साहित्य प्रचंड विलोभनीय आहे. हल्बीतील मौखिक परंपरेत ते टिकून राहिलेलं आहे. ‘जगार गीत' हे तर फक्त हल्बी भाषेतच नव्हे तर भारतीय साहित्यात महाकाव्य ठरावे इतके प्रचंड आहे. आठे जगार, तिजा जगार, लछमी जगार आणि बाली जगार यांचा यात समावेश होतो. मुळात या चारही ‘जगार साहित्यातील' ओवींची निर्मिती ही काही लाखांच्या घरात आहे.

  तिला आदिवासी जगण्याचा मूलाधार आहे. आणि मुख्यतः हे चारही साहित्य स्त्री केंद्री आहे. स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या काही मोजक्या महाकाव्यात ‘जगार साहित्य' आपणाला आढळून येईल. जगार काव्य गाणारी ‘गुरुमाय' ही सुद्धा केवळ स्त्रीच असते. जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या संख्याने अभावानेच आढळणारे हे हल्बीतील साहित्य संकलन आयुष्य पणाला लावून हरिहर वैष्णव करत आहेत. भारतीय साहित्यातील मौखिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या ‘जगार महाकाव्याची' हरिहर वैष्णव यांनी केलेली अनेक संकलने , संपादने आणि अनुवाद साहित्य अकादमीने प्रकाशित केलेली आहेत.


  राजीव रंजन प्रसाद यांची ‘आमचो बस्तर' ही महत्त्वपूर्ण कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. मूळ हल्बी मधून लिहलेल्या या कादंबरीत आपणाला बस्तरच्या सामान्य माणसाच्या जगण्याचा विस्कटलेला पण विस्तृत असा एक पट दिसून येतो. आजूबाजूला घाबरवून सोडणारी हिंसा, रोजच्या जगण्यासाठीचे संघर्ष आणि दिल्लीदरबारातून दाखविली जाणारी कमालीची अनास्था या कादंबरीतून प्रकर्षाने जाणवत राहते. या कादंबरीच्या माध्यमातून कादंबरीकाराने बरेच प्रश्न डोळे झाकून उभ्या असलेल्या सभ्य समाजासमोर उभे केले आहेत. तिथल्या अवकळेला लेखक आपल्यालाही जबाबदार धरतोय.

  तो विचारतोय की, इतिहास फक्त बाबर अकबर आणि इंग्रजांचाच कसा काय असतो? या देशातला बराच मोठा भूभाग असा अनुल्लेखाने कसा काय मारला जाऊ शकतो? आमच्या पाठ्यपुस्तकात आमचा इतिहास का नाहीये? कादंबरीकार सांगतो की, अगले सौ-पचास साल बाद जब बस्तर का इतिहास लिखा जायेगा तो इसके नायक बदल चुके होंगे? अतीत के इन आदर्शों की स्मृतियों पर लाल खम्बे गड़ चुके होंगे?’ या दुय्यमत्वाची भावनेतून निर्माण होऊ पाहणारा असंतोष बस्तरच्या जनमानसात खदखदताना दिसतोय. गेली कैक दशके आपल्याच रक्तामासाच्या माणसाकडे संशयाने पाहून, गुन्हेगार ठरवून आपण नेमकी कोणती परस्थिती निर्माण केली आहे हे समजून घ्यायचं असेल तर ‘आमचो बस्तर' ही कादंबरी मुळातून वाचायला हवी. हरिहर वैष्णव यांच्या कवितेतून आपणाला बस्तरच्या परिवेशातील समाजमन समजून येते. यासाठी आपण त्यांच्या ‘शुक्र करो' या कवितेचा विचार करायला हवा. ते लिहितात - वह कहता है पानी /और बरसने लगते हैं बादल / उफनने लगती है नदी /ठाठें मारने लगता है सागर / वह कहता है हवा / और बहने लगती है पुरवा / झूमने लगते हैं जंगल /महक जाती है फिज़ाँ /शुक्र करो कि कहा नहीं है उसने/ ग़ुस्सा! त्यांच्या या कवितेतून आपणाला त्यांच्या परिवेशातील असंतोष निश्चितच समजून येईल आणि याला बरीच कारणे आहेत. त्यांचे वेळोवेळी नाकारलेले अधिकार, दिलेलं दुय्यमत्व किंवा संस्कृती संघर्षातून त्यांच्यावर लादलेली गुलामगिरी. कारणे कदाचित बरीच असतील. पण बस्तरच्या घाटीतील समाजमन मात्र अस्वस्थ आहे हे नक्की.

  हाच कवी एका कवितेत लिहतो की - उनकी वर्णमाला में भी /अक्षर तो वही हैं / लेकिन उनसे बनने वाले शब्द / नहीं बन पाते अब भी / "अ" से अक्षर / "आ" से आराम / "प" से पतंग / "भ" से भेलपूरी / "झ" से झकाझक कपड़े / "ब" से बसंत / "ज" से जगमग / और "ह" से हँसी / तो क्या शब्द भी करते रहेंगे पक्षपात? हरिहर वैष्णव यांनी कवितेतून उभे केलेले हे प्रश्न वाचकाला निश्चितच अंतर्मुख करून सोडतात. ज्यांनी हरिहर वैष्णव वाचले आहेत त्यांना निश्चितच बस्तर समजून येतो. बस्तर त्यांच्या कवितेत आहे. त्यांनी लिहलेल्या कथेत तो सामावलेला आहे.

  त्यांनी संकलित केलेल्या हरेक पुस्तकात आपणाला खराखुरा बस्तर आढळून येतो. ती बस्तरची संस्कृती, बस्तरची लोककला, बस्तरचा इतिहास, बस्तरचा माणूस सारं सारं हरिहर वैष्णव यांच्या साहित्यात आढळून येते. त्यांच्या साहित्याने बस्तरला त्याचा खराखुरा चेहरा प्रदान केला आहे. खराखुरा. वास्तवादी. हल्बी भाषेच्या एका अभ्यासकाने नोंदविलेलेच आहे की - ‘बस्तर का ऐसा क्या नहीं है जिसे हरिहर की कलम ने नहीं उकेरा, नहीं सजाया, नहीं संवारा. जिसने हरिहर वैष्णव को जाना उसने ही बस्तर को पूर्ण रूप से जाना.

  - सुशीलकुमार शिंदे

  shinde.sushilkumar10@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ९६१९०५२०८३

 • sushilkumar shinde's article on baster
 • sushilkumar shinde's article on baster

Trending