आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sushilkumar Shinde's Popularity Disappears; Concern For Coalition For Aspiring Candidate For Sena

सुशीलकुमार शिंदेंच्या लोकप्रियतेला ओहोटी; सेनेच्या इच्छुक उमेदवाराला युती होण्याची चिंता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर म्हटले की ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय सुशीलकुमार शिंदे यांचे नाव येते. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकांतील पराभव आणि २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्यमधून ३१ हजारांच्या पिछाडीने शिंदे कुटुंबीयांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसत आहे. यंदा पुन्हा युतीकडून जात व इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाण्याची धास्ती शिंदेंच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना आहे. २०१४ च्या विधानसभेतील शिवसेना व भाजपच्या मतांची बेरीज प्रणिती शिंदेंपेक्षा अधिक आहे.  त्यामुळे यंदा काेणत्याही स्थितीत युती व्हावी, या इच्छेसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार महेश काेठे यांनी ‘देव पाण्यात’ ठेवले आहेत.
 

गेल्या निवडणुकीत एमआयएमचे तौफिक शेख ३७ हजार मते घेत दुसऱ्या स्थानी होते. मात्र सध्या खून प्रकरणात ते तुरुंगात आहेत. यामुळे एमआयएममध्ये या जागेवरून प्रश्न आहेच. विडी कामगार व कष्टकऱ्यांमध्ये माकपचे नरसय्या आडम यांचा प्रभाव आहे. गेल्या वेळी मात्र ते १३,९०४ मते घेऊन पाचव्या क्रमांकावर हाेते. यंदाही आडम मास्तर रिंगणात असतील. 
 

विधानसभा-लोकसभा निवडणुकांत शिंदे कुटुंबीयांचा घटता जनाधार
प्रणिती शिंदे २००९ मध्ये ३३ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१४ मध्ये ४६९०७ मते घेत ९७६९ मतांनी विजयी झाल्या. म्हणजेच २०१४ मध्ये त्यांच्या मताधिक्यात प्रचंड घट झाली. इतकेच नव्हे तर २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना मध्य मतदारसंघात तब्बल ३१ हजारांची पिछाडी आहे. घटत चाललेले मताधिक्य हा शिंदे कुटुंबीयांसाठी चिंतेचा विषय आहे.
 

मतदानात घट, मात्र कार्यालयात गर्दी कायम
शिंंदेंच्या मतदानात घट होत असली तरी त्यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी कायम आहे. प्रणिती या प्रत्येकाला भेटून आवश्यक मदतीस तत्पर असल्याचे दिसले. मतदारसंघात यूपीएससी- एमपीएससी केंद्र, विद्यार्थ्यांचे प्रश्न, विडी कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे प्रश्न सोडवल्याचा दावा त्यांनी केला.
 

पद्मशाली समाजाच्या मतांवर शिवसेनेचे लक्ष
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार महेश कोठे गतवेळी ३३,३९४ मते घेत तिसऱ्या, तर भाजपच्या मोहिनी पत्की २३,३१९ मतांसह चौथ्या स्थानी होत्या. कोठे पद्मशाली समाजाचे असल्यामुळे समाजातली एकगठ्ठा मतांसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
 

मुस्लिम, मोची, दलित मतांवर गणिते अवलंबून
मतदारसंघात २०१४ मध्ये २ लाख ७८ हजार मतदार होते. यात  मुस्लिम व पद्मशाली तेलगू भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. मुस्लिम ७० ते ८० हजार, तर पद्मशाली ६० ते ७० हजार, मोची ४० हजार, तर दलितांची मते ३० हजारांपर्यंत आहेत.
 

रोजगार, घरकुल, रस्ते हे प्रश्न चर्चेचे ठरणार
येथे यंत्रमाग कामगार, विडी कामगार व असंघटित कामगार आदींची ६० ते ७० हजार लोकसंख्या आहे. त्यांच्या रोजगाराची समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था हाही मोठा मुद्दा आहे. लघु उद्योगांना वीजदरात सवलत मिळावी, अशी मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...