आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गातच संशयास्पद मृत्यू, व्हिसेरा राखीव अभिनव विद्यालयात घडलेला प्रकार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : अभिनव विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी, शाळेने संपूर्ण माहिती द्यावी, अशी मागणी मृत विद्यार्थ्याच्या कुटंुबीयांनी केली आहे. ओम नारायण कोळी (वय १६, रा.दिनकरनगर, आसोदा रोड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.    ओम हा अभिनव शाळेत दहावीत होता. तो मंगळवारी शाळेत गेला. दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर जाऊ लागले; परंतु ओमला ग्लानी आल्याने तो बेंचवर काेसळून बेशुद्ध झाला होता. ही घटना वर्गातील काही विद्यार्थ्यांनी पाहून शिक्षकांना कळवली. यानंतर शिक्षक, शिपायांनी मिळून त्याला शाळेच्या जवळच असलेल्या एका रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्याचे सांगितले. शिक्षक संतोष सपकाळे यांनी ओम याला बेशुद्धावस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात आणले. डॉ. नितीन विसपुते यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोेलिस ठाण्यात  अकस्मात मृत्यूची नोंद झाली.    रुग्णालयात तणाव, कुटुंबीयांचा आक्रोश  घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विद्यार्थ्याचा शाळेतच मृत्यू झाल्याने शाळा प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर आेम याच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे कुटंुबीय, नातेवाइकांनी आक्रोश केला. तसेच शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनाही दु:ख अनावर झाले होते. ओम हा कोळी दांपत्याचा मोठा मुलगा होता. त्याचे वडील नारायण कोळी हे वाहनचालकाचे काम करतात. तर आई मनीषा गृहिणी असून, लहान भाऊ यश हा सहावीच्या वर्गात शिक्षण घेतो आहे.    व्हिसेरा राखीव, घटनेची कसून चौकशी व्हावी  ओम याचा शाळेतच मृत्यू झाला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबद्दल कोणालाही काहीच समजू शकले नाही. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे, यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना संशयास्पद असून, शाळा प्रशासनाने संपूर्ण माहिती कुटंुबीयांना दिली पाहिजे. त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे काय, याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनेची चौकशी करावी, अशी मागणी ओमचे काका सुनील कोळी यांनी केली आहे.   

बातम्या आणखी आहेत...