आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींशी संबंधावरून निलंबित प्रा. सेन यांना हवेत निवृत्तीचे लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नक्षल कारवायांमधील सक्रिय सहभागाच्या अाराेपामुळे अटकेत असलेल्या प्रा. शोमा सेन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अर्ज पाठवून निवृत्ती लाभ देण्याची मागणी केली आहे. प्रा. सेन ११ जुलै रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. मात्र, ६ जून रोजी त्यांना अटक झाल्याने १४ जून रोजी निलंबित करण्यात आले होते.   विशेष म्हणजे या प्रकरणानंतर अजूनपर्यंत विद्यापीठाने त्यांची साधीअंतर्गत चौकशी केलेली नाही.

  
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभागप्रमुख असलेल्या प्रा. डॉ. शोमा सेन यांना पुणे पोलिसांनी ६ जून २०१८ रोजी अटक केली. प्रा. सेन यांच्यावर नक्षलवादी कारवायांमधील सहभाग, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देणे, देशविरोधी कारस्थान करणे असे आरोप आहेत. याप्रकरणी सेन यांच्यासह  एकूण ५ लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता.   


प्रा. सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र, विद्यापीठातील दबाव गट सक्रिय झाल्यामुळे प्रो. सेन यांचे निलंबन थोपवून धरण्यात आले होते. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण सचिवांनी नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना फोन करून या प्रकरणाचा तपशील मागितला. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन कुलगुरूंनी १४ जून रोजी प्रो. सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रा. सेन यांच्या चौकशीसाठी विद्यापीठाने अंतर्गत समितीही स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी केवळ सेन यांच्याविरोधात लावलेली कलमे व झालेली कारवाई याचीच माहिती दिली आहे.    


अद्याप चौकशी पूर्ण नाही
पोलिसांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय आरोपपत्रदेखील विद्यापीठाला मिळालेले नाही. अशा स्थितीत चौकशी समिती स्थापन करणे योग्य होणार नसल्याचा दावा दबाव गटांकडून करण्यात आला. त्यामुळे अजूनपर्यंत विद्यापीठाने प्रा. सेन यांनी अंतर्गत चौकशी केलेली नाही.  दरम्यान प्रा. सेन यांनी  निवृत्तीनंतरचे लाभ मिळावे व निवृत्तिवेतन सुरू करण्यात यावे यासाठी कारागृहातून विद्यापीठाकडे अर्ज पाठवला आहे.   

 

अाता सहसंचालकच घेतील अंतिम निर्णय
यासंदर्भात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शोमा सेन यांचा अर्ज विद्यापीठाकडे आल्याचे मान्य केले. मात्र, विद्यापीठाने त्यांना अद्याप ‘एनओसी’ दिलेली नाही. हा अर्ज उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. शोमा सेन यांना निवृत्तीपूर्वी निलंबित करण्यात आले होते. याची सविस्तर माहिती आम्ही सहसंचालकांना दिलेली आहे. आता तेच याबाबत निर्णय घेतील, असे कुलगुरूंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...