आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- फेब्रुवारी, मार्च महिन्यात ऊस गाळप केलेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप बिलाची रक्कम अदा केली नसल्याने साखर आयुक्तांनी जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांवर जमीन महसूल अधिनियमानुसार (आरआरसी) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण यापैकी भीमा व सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या वसुली आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाच सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. कारखान्यांची मालमत्ता जप्त करून उसाचे थकीत बिल द्यावे, असा हा आदेश होता. पुणे येथील बैठकीत सर्वच कारखान्यांनी ५ सप्टेंबरपर्यंत एफआरपीनुसार ऊस बिल अदा करण्याचे आदेश दिल्याचे कारण पुढे करीत दोन्ही कारखान्यांच्या वसुली आदेशाला स्थगिती देण्यात आली.
उसाचे गाळप करून सहा महिने लोटले असतानाही जिल्ह्यातील १८ हून अधिक कारखान्यांनी एफआरपीनुसार ऊस बिले अदा केली नाहीत. यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल कारखान्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे एकीकडे शेतकरी संघटना, प्रहार संघटना ऊस बिलासाठी आक्रमक झाले आहेत. एफआरपी न दिल्याने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना, मकाई सहकारी साखर कारखाना, मातोश्री लक्ष्मी शुगर व विठ्ठल रिफाईंड या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी जमीन महसूल अधिनियमानुसार थकीत ऊस बिल वसुलीचे आदेश दिले. यानंतर आठवडाभरातच सहकारमंत्री देशमुख यांनी सिद्धेश्वर व भीमा कारखान्याच्या वसुलीस ५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. ५ सप्टेंबरपर्यंत बिल अदा न केल्यास ही स्थगिती आपोआप रद्द होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
तीन कारखान्यांवर आरआरसीचे आदेश...
पहिल्या टप्प्यात भीमा व सिद्धेश्वर कारखान्यावर आरआरसी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात विठ्ठल रिफाईंड १५.१४ कोटी, मातोश्री लक्ष्मी शुगर ९.४१ कोटी व मकाई सहकारी ७.३२ कोटी रुपये थकीत असल्याने आरआरसीनुसार वसुली करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गोकुळ शुगर्सचा पत्ता चुकला...
जिल्ह्यातील चार कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांना दिले. मात्र यामध्ये गोकुळ शुगर्सचा पत्ता माढा तालुक्यातील नमूद करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा कारखाना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने साखर अायुक्तांना पत्र पाठवून कारखान्याच्या पत्त्याबाबत विचारणा केली आहे. सुधारित आदेश येताच गोकुळ शुगर्सवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सिद्धेश्वर, भीमा कारखान्यांवरील आरआरसी कारवाईस सहकारमंत्री यांच्या स्थगितीचे पत्र मिळाले आहे. यामुळे आरआरसी कारवाई थांबवली आहे. मकाई, मातोश्री शुगर व विठ्ठल रिफाईंड या तीन कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
- दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.