आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, अकोलेकाटीजवळ मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दयानंद महाविद्यालयात वाणिज्यच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या संयुक्ता रमेश भैरी (वय २१, रा. मार्कंडेय वसाहत, विडी घरकुल) या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी - मार्डी रस्त्यावरील पुलाजवळ ती बेशुद्धावस्थेत आढळली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. हा घातपात आहे की आत्महत्या याचा पोलिस शोध आहेत. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मंगळवारी सकाळी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. 


सोमवारी सकाळी सात वाजता कॉलेजला जात असल्याचे सांगून संयुक्ता घराबाहेर पडली. तिच्या अंगात गणवेश होता. मृतदेह अकोलेकाटी फाट्याजवळील रस्त्यापासून आत पाचशे मीटरवर एका पुलाजवळ पडला होता. नान्नजच्या पोलिसपाटलांनी माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी संयुक्ताच्या गणवेशावरून आमच्याशी संपर्क साधला. त्यानंतर घटनेचा उलगडा झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यू कशामुळे झाला हे उघड होईल. संयुक्ताला दहावी व बारावीत ६५ टक्क्यांंपेक्षा अधिक गुण मिळाले होते. तिची छोटी बहीण बारावी तर एक भाऊ नववीत शिकत आहे. वडील कापड दुकानात काम करतात. आई विडी कामगार आहे. 


सर्व शक्यता गृहीत धरून तपास
सगळ्या शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे, असे सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, शासकीय रुग्णालयात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली. तपासाबाबत सूचनाही दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...