आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्व'च्या शोधातला अभिनेता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास गुण दडलेले असतात, काहीजण स्वतःला ओळखण्यासाठी वाट मोकळी करून देत नाहीत. याउलट काही जण जे जे काही शक्य असेल त्यात स्वतःला पारखून घेतात आणि रोज स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न करतात. रेगे चित्रपटातून मराठी चित्रपटक्षेत्रात पदार्पण करणारा आरोह वेलणकर याच प्रकारचा.


पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात आरोहचं बालपण गेलं. लहानपणापासूनच वेगवेगळ्या माध्यमांतल्या प्रयोगांमध्ये आरोहचा सहभाग असायचा. मग ते पथनाट्य असो किंवा शिक्षकांच्या नकला करणं, किंवा सिनेमातले संवाद म्हणून दाखवणं, त्याच्या कलागुणांना वाव मिळत होता. शालेय शिक्षणादरम्यान आरोहने संगीताचे धडेसुद्धा गिरवले आहेत. इतकंच नाही तर एलिमेंट्री, इंटरमिजिएट या चित्रकलेच्या परीक्षासुद्धा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्या आहेत.शाळेत, महाविद्यालयात असताना वेगवेगळ्या मैदानी खेळांतही त्याने आपली चुणूक दाखवली, ज्यात क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ, बेसबॉल, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या खेळांचा उल्लेख करता येईल. एकूणच जिथे जिथे आपल्याला सहभागी होता येईल त्या प्रत्येक गोष्टीत सहभागी होणारा असा हा ‘स्पोर्टिंग कलाकार.’


खरं तर अभिनय क्षेत्रात करिअर करायचं असं ठरवून काहीच केलं नव्हतं, अपघातानेच या क्षेत्रात आलो.इंजिनिअरिंग क्षेत्रातसुद्धा ठरवून आलो नाही. पण लहानपणापासून गणित, विज्ञान हे आवडते विषय त्यामुळे या दोन्ही विषयात नेहमी उत्तम गुण असायचे. तुलनेत भाषा विषय रटाळ वाटायचे. नाटकाविषयी सांगायचं तर पहिलं नाटकसुद्धा एमआयटीमध्ये इंजीनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना पाहिलं. मेकॅनिकल इंजीनिअरिंग करत असताना कल्चरल ग्रूपमध्ये ओपनिंग आहे असं कळलं आणि तिथून महाविद्यालयीन अभिनयाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर नाटकाची किंबहुना अभिनयाची प्रचंड गोडी लागली आणि शिक्षण घेत असतानाच स्वतःला अभिनयाकडे वाहून घेतलं. एकीकडे अभियांत्रिकीचा अभ्यास आणि दुसरीकडे नाटकाच्या तालमी, अशा दोन गोष्टी समांतर सुरू होत्या. इंजीनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर कॅम्पसमधून मिळालेल्या उत्तम पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवत पुन्हा एकदा नाटकात भाग घेण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. एमई करत असताना वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच दरम्यान अभिनयासाठीची बरीच बक्षिसं मिळाली. यामध्ये पुरुषोत्तम करंडक - २०११, पुरुषोत्तम महाकरंडक - २०११, उत्तुंग करंडक, सवाई करंडक-२०१२, असे मानाचे पुरस्कार आहेत. यासह सवाई अभिनेता तसंच पारंगत सन्मान - २०१०, २०११, २०१२ अशी हॅट‌्ट्रिक करत एक वेगळा इतिहास त्याने रचला. कदाचित यामुळेच उत्तम अभिनय होतोय यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर २०१२-२०१३मध्ये ‘रेगे’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. २०१४मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटातल्या भूमिकेसाठी अभिनयासाठीची बरीच पारितोषिकं त्याला मिळाली. त्यानंतर अभिनय क्षेत्रातच काहीतरी करायचं हे निश्चित झालं, असं आरोह सांगतो. रेगे या चित्रपटामुळे ‘आरोह वेलणकर’ हे नाव सर्वपरिचित झालं आणि मोठ्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. सर्वोत्तम पदार्पणासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार -२०१५’, ‘झी-महाराष्ट्राचा फेवरेट कोण - चित्रपट पदार्पण पुरस्कार-२०१४’ असे मानाचे पुरस्कार त्याच्या उत्तम अभिनयाची पोचपावती देतात.


आरोह चित्रकला, मैदानी खेळ, यातही अभिनयाइतकाच रमतो. जेव्हा चित्रीकरणामधून मोकळा वेळ मिळतो तेव्हा वडलांना त्यांच्या उद्योगाच्या कामात मदत करणं, किंवा अभियांत्रिकीसंबंधित काम करणं, सामाजिक काम असं बरंच काही सुरू असतं. सध्या आरोह अभिनय क्षेत्रात कार्यरत असला तरीही कला आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींची उत्तम सांगड त्याने घातली आहे. आरोहने सांगितल्यानुसार तो स्वतःला कायम शोधत आलाय, एखादी गोष्ट ठरवून तो कधीच करत नाही. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला आजमावून पाहण्याची मजाच काही वेगळी आहे, असं आरोहला वाटतं. ज्या ज्या संधी मिळतायत त्यांचा वापर करत आपल्यातलं कौशल्य तिथे पुरेपूर वापरायचं, या धोरणाने आरोहची वाटचाल सुरू आहे. 


छंदांविषयी बोलताना आरोह सांगतो की, कविता करणं, टाइल पेंटिंग, वस्तुचित्र, लँडस्केप, अमूर्त ड्रॉइंग करणं हे माझे काही आवडीचे छंद. सामाजिक कार्यातही त्याचा आवर्जून सहभाग असतो. आरोह वेगवेगळी नाटकं, कविता, वर्तमानपत्रं आवर्जून वाचतो. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना आपल्याला माहीत असायलाच हव्यात, असं त्याला वाटतं.


आरोह सांगतो की, एक चांगला कलाकार म्हणून ओळख असली तरी एक चांगला माणूस आणि कलाकार अशी ओळख अभिनयक्षेत्रात निर्माण करायची आहे. कोणत्याही प्रकारचे अभिनय प्रशिक्षण न घेता, अभिनय क्षेत्रातली कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कुणाचं मार्गदर्शन नसताना स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या बळावर आणि जिद्द, मेहनत घेत या क्षेत्रात आरोहने घट्ट पाय रोवलेत.
सुवर्णा क्षेमकल्याणी, मुंबई
suvarna.kshemkalyani@gmail.com

बातम्या आणखी आहेत...