आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दभ्रमाचा समर्थ वारसदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोद्दार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतली पदवी घेऊन सीएपर्यंतचं शिक्षण झालेला, पण मनाने कलाकार असणारा सत्यजित पाध्ये रमतो तो बोलक्या बाहुल्यांमध्ये. कधी शब्दभ्रमकार (व्हेंट्रिलॉक्विस्ट), तर कधी बाहुलीकार (पपेटियर) म्हणून प्रेक्षकांच्या मनाचा सहज ठाव घेतो. रामदास आणि अपर्णा या आईवडिलांकडून शब्दभ्रमकलेचा वारसा घेऊन आलेल्या सत्यजितशी केलेली बातचीत.


शब्दभ्रमकला अर्थात बोलक्या बाहुल्यांचा खेळ करण्याची आवड कधीपासून लागली?
>घरात या कलेची परंपरा असल्यामुळे अगदी लहानपणापासून ही कला आवडत होती. खरं तर तेव्हाच ठरवलं होतं की, मोठं झाल्यावर यातच काही तरी करायचं. मला आठवतंय, माझ्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम मी  सातवीत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात केला होता आणि तिथे माझे आईबाबाच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा मी ५ मिनिटांचा कार्यक्रम केला होता. आईबाबांसमोर हे सादर करताना खूप मजा आली. त्यानंतर बाबांनी मला रियाज करायला सांगितला आणि पाचसहा वर्षं बाबांकडून या कलेविषयीचं रीतसर प्रशिक्षण घेतलं, आवश्यक रियाझ केला. मग हळूहळू बाबांसोबत कार्यक्रम करायला सुरुवात झाली. १९९४मध्ये बाबा आणि मी मिळून ‘गुड नाइट बेबी डायनो’ हे भरत दाभोळकर यांनी दिग्दर्शित केलेलं इंग्रजी नाटक केलं होतं, ज्यामध्ये मी फक्त पपेट ऑपरेटर म्हणून काम केलं. मी प्रेक्षकांना दिसत नव्हतो पण मी करतोय त्या हालचाली पपेटच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होत्या.

 

शब्दभ्रमकलेचा रियाझ नेमका कसा करतात?
>जसा शास्त्रीय संगीताचा नियमित रियाझ करावा लागतो तसच या शब्दभ्रमकलेचाही करावा लागतो. व्हेंट्रिलॉक्विझममध्ये आवाज काढण्याचा रियाझ करावा लागतो, कारण या कलेत श्वासावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. व्हेंट्रिलॉक्विझम हा मूळ लॅटिन शब्द आहे, यात पोटातल्या स्नायूंना दाब देऊन तो आवाज पोटातून वर येतो आणि फेकला जातो. त्यामुळे हा आवाज नक्की कसा काढला जातो, श्वासावर किती आणि कसं नियंत्रण ठेवायचंय याचा नियमित रियाझ करावा लागतो.

 

पूर्ण वेळ शब्दभ्रमकलेसाठी द्यावा हे कधी ठरवलं? 
>आपण शब्दभ्रमकलेत काही तरी करणार आहोत हे माझं निश्चित होतं पण माझ्या वडिलांप्रमाणे मलाही तितकंच यश मिळेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आधी तुमच्याकडे एक पक्का शैक्षणिक पाया तयार असेल तर तुम्हाला जगात वावरण्याचा एक आत्मविश्वास मिळतो. शिवाय माझे काकासुद्धा सीए असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने मी परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच दरम्यान इंडियाज गाॅट टॅलेंट या रिअॅलिटी शोमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मग काही दिवस या क्षेत्रात कामसुद्धा केलं पण सीए ची नोकरी सांभाळून शब्दभ्रमकलेचे प्रयोग करणं तितकंसं शक्य होत नव्हतं. त्यामुळे मग काही दिवसांनी पूर्ण वेळ याच कलेला द्यायचा हा निर्णय घेतला. 

 

अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, तो कसा होता अनुभव?
>एका वर्षी नवरात्र उत्सवात फोन आला. कौन बनेगा करोडपतीसारख्या कार्यक्रमातून हा कलाप्रकार लोकांपर्यंत पोहोचवता यावा अशी त्यांची इच्छा होती. मग त्यानुसार दोन दिवस कार्यक्रमात शब्दभ्रमकला दाखवण्यात आली ज्यात एका एपिसोडमध्ये मी अभिताभ यांच्यासोबत सोलो व्हेंट्रिलॉक्विझम सादर केलं आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये विष्णुदास भावे यांच्याकडच्या १५० वर्ष जुन्या बाहुल्यांचा वापर करून एक वेगळा प्रयोग केला होता.

 

या बाहुल्या (पपेट्स) कुठे तयार केल्या जातात?
>परदेशात शब्दभ्रमकार (व्हेंट्रिलॉक्विस्ट) आणि बाहुलीकार (पपेटियर) वेगवेगळे असतात आणि पपेटमेकर किंवा बाहुल्या बनवणारासुद्धा वेगळा असतो. यापैकी शब्दभ्रमकार प्रेक्षकांना दिसत असतो. पण पपेटियर लोकांना दिसत नाही तर तिथे फक्त ती बाहुली दिसते. तिथेही बाहुलीकाराचा कस लागतो कारण तुम्हाला वेगवेगळ्या पोझमध्ये स्वतःला सावरून परफॉर्म करावं लागतं. परदेशात या तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत पण भारतात गरजेनुसार या तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीला कराव्या लागतात. त्यामुळे इथे बाहुली तयार करण्यापासून शब्दभ्रम किंवा बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग सगळं आम्ही स्वतःच करतो. गरज ही शोधांची जननी आहे या उक्तीप्रमाणे हे होत गेलं. आमच्याकडे सध्या अडीच हजारांहून जास्त बाहुल्या आहेत. दर वेळी गरज लागेल त्या त्या पात्रानुसार बाहुल्या नव्याने तयार कराव्या लागतात. कधी काही खराब झालं तर तुमच्याकडे बॅकअप पपेट डिझाइन असणं गरजेचं असतं. बाहुल्या तयार करताना आधी क्ले वर्क होतं, मग पीओपी मोल्डिंग, मग कास्टिंग अशा पद्धतीने काम केलं जातं.

 

एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान राखून सादरीकरण करावं लागतं, यात नेमकं काय आव्हान असतं?
>पाहताना ही कला तितकीशी कठीण वाटत नसली तरी सादरीकरण करताना यात बऱ्याच गोष्टींचं भान असावं लागतं. उदा. या कलेसाठी वापरलं जाणारं तंत्र, कार्यक्रमासाठीची पटकथा, विनोदी अभिनयशैली, आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आवाजात बोलण्याची सवय या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकाच वेळी एकत्रित जुळवून आणता येणं हेच तुमचं कौशल्य म्हणता येईल. याशिवाय तुमच्या ओठाच्या होणाऱ्या बारीकसारीक हालचालीसुद्धा समोरच्याला कळतात त्यातही ओष्ठव्यंजनं वापरताना खूप काळजीपूर्वक वापर करून जणू आपल्या हातातलं पपेटच बोलतंय ही जाणीव प्रेक्षकांना होणं महत्त्वाचं असतं.

 

आजवर कोणकोणत्या माध्यमातून या बोलक्या बाहुल्या मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर पाहायला मिळाल्यात?
>झपाटलेला या मराठीत चित्रपटातला ‘तात्या विंचू’ खूप लोकप्रिय होता. कौन बनेगा करोडपती, बिग बॉस, पिझ्झा हट जाहिराती, तसंच बद्रीनाथ की दुल्हनिया चित्रपटातल्या एका गाण्यात आणि अशा अनेक माध्यमांमधून या बाहुल्या तुम्ही पहिल्या असतील. याशिवाय अर्धवटराव आणि आवडाबाई या बाहुल्या जगप्रसिद्ध असून अर्धवटरावांनी आता वयाची शंभरी गाठली आहे.

 

या कलेचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था भारतात आहेत का? शब्दभ्रमकलेचा वारसा टिकून राहावा यासाठी काय करणं अपेक्षित आहे?
>या कलेचं प्रशिक्षण देणारी पाध्ये परिवारातर्फे काढलेली संस्था अाहे, पण त्याव्यतिरिक्त संस्था नाहीयेत. आमच्याकडे परंपरागत पद्धतीने ही कला सादर होतेय, तिथेच याचं जतन होतंय आणि पुढच्या पिढीपर्यंत ही कला पोहोचतेय. या कलेला, बोलक्या बाहुल्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात सरकारकडून काही मदत मिळाली तर पर्यटकांसाठीसुद्धा हे एक आकर्षणाचं माध्यम ठरेल. 

 

या कलेला भारतात तसंच भारताबाहेर मिळणारा प्रतिसाद कसा आहे?
>पूर्वीपेक्षा नक्कीच या कलेला समाजात प्रतिष्ठा मिळतेय. या कलेविषयी लोकांना माहिती झालीये, लोकांचा प्रतिसाद वाढलाय पण जेव्हा इतर देशांशी तुलनात्मक विचार केला जातो तेव्हा तिथल्यापेक्षा इथे जागरूकता कमी असल्याचं जाणवतं. आपल्याकडे बोलक्या बाहुल्यांचा खेळ हा फक्त लहान मुलांपुरताच मर्यादित असतो असाही समज आहे. त्यामुळे जर भारत आणि इतर देशांशी तुलना केली तर भारतात या कलेविषयीच्या दृष्टिकोनात बदल व्हायला हवा. ही एक परंपरा असून ती वृद्धिंगत होत जावी अशा हेतूने समाजात विचार होणं गरजेचं आहे ते अजूनही अपेक्षेनुसार होत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...