आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीला काँग्रेसकडून सांगली, वर्ध्याची अपेक्षा; अशोक चव्हाणांची एक दिवस थांबण्याची विनंती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले (जि. कोल्हापूर) मतदारसंघ साेडला आहे, तर स्वाभिमानीने दावा केलेल्या बुलडाणा मतदारसंघात मात्र उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून वर्धा किंवा सांगलीची जागा साेडण्याची आशा शेट्टी यांना आहे. जर दुसरी जागा मिळाली तरच स्वाभिमानी संघटना आघाडीत असेल, अन्यथा स्वतंत्र जागा लढवणार असल्याचा इशारा यापूर्वीच शेट्टींनी दिला आहे.  


स्वाभिमानी पक्षाने हातकणंगले, वर्धा अन् बुलडाणा अशा तीन मतदारसंघांची मागणी आघाडीकडे केली होती. यापैकी हातकणंगलेमधून राजू शेट्टी विद्यमान खासदारही आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला होता. राष्ट्रवादीने तो स्वाभिमानीला सोडण्यात येत असल्याचे आज जाहीर केले. बुलडाण्यामधून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर इच्छुक होते. मात्र, तेथे राष्ट्रवादीने राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शेट्टी यांचे निकटवर्तीय तुपकर यांचा पत्ता आपोआप कट झाला आहे.  


 वर्धा येथून स्वाभिमानीचे सुबोध माेहिते इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. येथून काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी तयारी केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस बहुतेक सांगली मतदारसंघ स्वाभिमानीला देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. 


एक दिवस वाट पाहणार  - स्वाभिमानीने काँग्रेसला तीन जागांसंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपूनही दोन दिवस उलटले आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा फोन आला होता. आणखी एक दिवस थांबा, आम्ही सकारात्मक निर्णय करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे एक दिवस आम्ही थांबायचे ठरवले आहे. सांगली किंवा वर्धा यापैकी एक जागा आम्हाला सोडली जाईल, असे अपेक्षित असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्यामुळे एक दिवसानंतर काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

बातम्या आणखी आहेत...