उस्मानाबाद / पूजा मोरे यांना उस्मानाबादेत ताब्यात घेऊन सोडूनही दिले; पंतप्रधानांच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे सावधगिरी

मोरे यांचा मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनीही धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे

प्रतिनिधी

Sep 07,2019 09:39:00 AM IST

उस्मानाबाद - जालना येथील महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री गो बॅक अशा घोषणा देत ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना पुरुष पोलिसांनी पूजा मोरे यांना ताब्यात घेतले होते. मोरे यांचा मुख्यमंत्र्यांसह पोलिसांनीही धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी (दि.७) औरंगाबाद येथे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादेत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात नेले. त्यांच्या अटकेचे वृत्त माध्यमांतून उमटताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने दखल घेत पोलिसांना दूरध्वनी केल्याने रात्री पूजा यांची सुटका करण्यात आली.


शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेद्वारे विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा २५ ऑगस्ट रोजी दिला होता. या इशाऱ्यानंतर आठवडाभरातच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जालना येथे अाली होती. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा माेरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी त्यांना जालना पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या पूजा मोरे या १६ सप्टेंंबर रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथे काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी उस्मानाबादेत आल्या होत्या. या वेळी स्थानिक गुन्हे शाखा व आनंदनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आनंदनगर पोलिस ठाण्यात नेले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, शरद पवारांनी पोलिसांच्या या कृतीवर आक्षेप घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दूरध्वनी करताच पूजा यांची रात्री सुटका केली.

X
COMMENT