अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात / अमेरिकेतील स्वामीनारायण मंदिरात तोडफोड; देवाच्या मूर्तीचे विद्रूपीकरण, काळा पेन्ट लावला

दिव्य मराठी वेब टीम

Jan 31,2019 10:54:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील केनटुकी प्रांतात समाजकंटकांनी एका हिंदू मंदिरात घुसून तोडफोड केली. यावेळी मंदिरातील देवाच्या मूर्तींवर काळा स्प्रे पेन्ट लावण्यात आला. तसेच मुख्य दालनात असलेल्या खुर्च्या सुद्धा चाकूने फाडण्यात आल्या आहेत. ही घटना अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार, रविवारी रात्री उशीरा प्रसिद्ध स्वामीनारायण मंदिरात घडली. हे मंदिर केनटुकीतील लुइसविले शहरात आहे. या घटनेची माहिती मंगळवारी सकाळी समोर आली आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, समाजकंटकांनी मंदिरात रात्री उशीरा घुसून तेथील भिंतींवर काळे स्प्रे पेन्ट लावले. विचित्र पेन्टिंग करून आक्षेपार्ह मजकूर सुद्धा लिहिला. यासोबतच, मंदिरातील देवाच्या मूर्तीवर काळा पेन्ट लावला. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले तेव्हा खुर्च्या, खिडक्या सुद्धा तोडलेल्या होत्या. मुख्य दालनात सर्वत्र फक्त काचा आणि खिडक्यांचे तुकडे पडले होते.

लुइसविलेचे मेयर ग्रेग फिशर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच या शहरात राहणाऱ्या हिंदू बांधवांच्या आपण पाठीशी असून समाजकंटकांना पकडनू योग्य शिक्षा दिला जाईल असे आश्वस्त केले. एवढेच नव्हे, तर त्यांनी या मंदिराचा दौरा करून हिंदू समुदायाच्या नेत्यांची भेट सुद्धा घेतली आहे. स्वामीनारायण मंदिराचे पदाधिकारी राज पटेल यांनीही या घटनेचा निषेध केला. सोबतच, आरोपी कुठल्याही धर्माचे असो त्यांना असे करणे मुळीच शोभत नाही. त्यांनी मंदिरात जे काही लिहिले, त्यातून त्यांच्या मनात दुसऱ्या धर्मांबद्दल किती द्वेष आहे हे स्पष्ट होत असल्याचे सुद्धा ते पुढे म्हणाले.


अमेरिकेत हिंदू मंदिरावर झालेला हा पहिला हल्ला नाही. यापूर्वी एप्रिल 2015 मध्ये टेक्सास प्रांतात एका मंदिराची तोडफोड करून स्प्रे पेन्ट करण्यात आला होता. त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा केन्ट आणि सिएटल येथे मंदिरांचे विद्रूपीकरण करण्यात आले होते. तेव्हा सुद्धा समाजकंटकांनी मंदिराच्या भिंतींवर धर्मद्वेषी वाक्य लिहिले होते.

X
COMMENT