आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Swapnil Kumbhojkar Writes About Leopard In Divya Marathi Diwali Ank

हेिडंग : सहोदर!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ना जंगल का, ना जमीन का... अशी कमनशिबी अवस्था वाट्याला आलेला एकमेव वन्यप्राणी म्हणजे, बिबट्या. वाघ-सिंहाच्या रांगेतला खरा हा वन्यजीव, पण जंगलच्या विश्वात त्यांच्यापेक्षा कमी मान असलेला. किंबहुना, त्यांच्या वर्चस्वामुळे जंगलाबाहेर फेकला गेलेला. पण जंगलाबाहेरच्या मनुष्यवस्तीतही त्याची गणना-रक्ताला चटावलेला नरभक्षक अशीच. त्यामुळे इथेही तो नकोसा आणि बदनाम. बऱ्याचदा गैरसमजांचा बळी ठरलेला. कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलेला. पण त्याची जगण्याची, टिकून राहण्याची इर्षा इतकी दुर्दम्य की तो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही हवामानात तग धरून राहिलेला. हाच लाजाळू स्वभावाचा, कायम स्वत:ला लपवत फिरणारा बिबट्या माझ्या पी.एचडी  प्रबंधाचा विषय आणि हाच माझा सहोदरही...

 

या वर्षीं जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातल्या विंचूरदळवी गावात पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले. मे महिन्यात मुंबई-गोरेगावातल्या आरे कॉलनीत पोलिसांच्या व्यायामशाळेत बिबट्या घुसला. एकच घबराट पसरली. लखनौच्या गजबजलेल्या वस्तीत बिबट्या घुसला आणि लाठ्याकाठ्या घेऊन येणारे लोक पाहताच जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटला... त्या आधी कधीतरी २०१५ मध्ये पं. बंगालातल्या पुरुलिया गावात बिबट्या शिरला. अडीच-तीन हजार लोक त्याच्या पाठी लागले. जसा तो सापडला. त्याला दगड-लोखंडी सळ्यांचा वापर करून ठार केले गेले. त्याचे पंजे, शेपटी कापली गेली. त्याचं लाठ्या-काठ्यांनी चेचलेलं धड एखाद्या ट्रॉफीसारखं झाडाला टांगलं गेलं. बिबट्या आणि माणसामधल्या संघर्षाच्या एका पाठोपाठ एक घटना घडताहेत. त्या नेमकं काय सुचित करताहेत? बिबट्या हा रक्ताला चटावलेला हिंस्र प्राणी आहे, की बिबट्या स्वत:ला मानवी वस्तीत सामावून घेण्यासाठी धडपडतोय? सहजीवनाची हाक देतोय? 

 

माणसाचे मन ही एक अजब गोष्ट आहे. जगातली कोणतीही शक्ती या मनाला आडकाठी आणू शकत नाही. ते कुणी ताब्यात घेण्याची तर बातच दूर. ज्याला गाठायचेय, जिथवर पोहोचायचेय, खळाळत हे मन तिथवर पोहोचतेच. माझ्याही मनाचा किस्सा हा असा भन्नाट आहे. म्हणजे, मी शिकत होतो, बी.ई.चा अभ्यासक्रम. त्यात मला चांगली गतीसुद्धा होती. पण  मन मात्र धाव घेत होते, निसर्गाकडे. मी स्वत:च्या धुंदीत वावरणारा बर्डर किंवा बर्ड वॉचर (याला अलीकडे ट्विचर्स -Twitchers- असेही म्हणतात.) बनलो होतो. बी.ई. करत असतानाच आम्ही मित्रमित्र मिळून शाळेतल्या मुलांसाठी नेचर कॅम्प भरवत होतो. पक्षी निरीक्षणाचे हे वेड माझ्यात  त्या काळी इतके भिनले होते की, त्या वेडापायी मी तहान-भूक विसरून १९९४ पासून भारतातली जवळपास सगळी अभयारण्य पालथी घालण्याचा सपाटा लावला होता.


एकीकडे पक्षी निरीक्षणाच्या वेडाने झपाटले असताना यशावकाश मी बी.ई. पूर्ण केले. क्रेन, बॉयलर्सच्या विश्वात शिरलो. व्यावसायिक वाटाघाटींसाठी वेगवेगळ्या शहरांत भटकू लागलो. पण, निसर्गाचा चस्का लागलेला, तो थोडेच कमी होणार होता. म्हणून मग मी काय आयडिया करायचो, यंत्रतंत्राची बोलणी आटोपली की, परतीच्या वाटेवर असताना सरळ घरी न येता, अभयारण्याची वाट धरायचो. म्हणजे, दिल्लीला गेलो की, परतताना भरतपूर सँक्च्युरीत मुक्काम ठोकायचो. औरंगाबादला गेलो की, जायकवाडी परिसरात  तळ ठोकायचो.     मनसोक्त भटकायचो. फोटोग्राफी करायचो. जंगलाचा मोहक गंध रंध्रारंध्रांत भिनला की, मन शांत-तृप्त होऊन जायचे.


याच दरम्यान कधी तरी विलास मनोहरांचे वन्यप्राण्यांवर लिहिलेले "नेगल' नावाचे पुस्तक वाचन आले आणि मी बिबट्यामय होऊन गेलो.  या ओघात हेमलकसा इथल्या डॉ. प्रकाश आमटेंचा प्रकल्प पाहायला जाणे होऊ लागले. यामागे अर्थातच   डॉ. बाबा आमटे, त्यांच्यावर पोटतिडिकीने लिहिणारे पु.ल. देशपांडे असा सगळा प्रभाव होता. हेमलकसाला गेलो की,जंगली प्राण्यांसाठी डॉ.आमटेंनी उभारलेल्या पुनर्वसन केंद्रात हमखास जाणे होई. का कोण जाणे, पण त्यातला बिबट्या मला सर्वाधिक आकर्षून घेई. हेमलकसाला गेलो की, तासनतास बिबट्यासोबत घालवू लागलो. इतर वेळी जंगलात गेल्यावरही वाघ-सिंहांपेक्षा मला बिब‌ट्याला बघण्याची आस लागलेली असे. असे करता करता आम्ही मित्र मि‌ळून पर्यटकांना कान्हा, मदुमलाई आदी जंगलांच्या सफरी घडवायला सुुरवात केली. त्यासाठी स्वत:ची "डॅफोडिल्स' नावाची कंपनी स्थापन केली. ‘इको टुरिझम’ आणि ‘सोशल टुरिझम’ असा कंपनीचा उद्देश निश्चित केला. म्हणजे नागझिरामध्ये गेलो की, सोबतचे सगळे वाघासाठी जीव टाकत. ताडोबामध्ये गेलो की, टायगर सफारीसाठी सोबतच्या लोकांची चढाओढ लागे.  माझ्या मनाची मात्र वेगळीच भानगड होती. या मनाला बिब‌ट्याचे विलक्षण आकर्षण होते.   सहा वर्ष अशा टूर मी नेल्या. जवळपास १२०० हून अधिक पर्यटकांना वेगळ्या विश्वाचे दर्शन घडवले. 


२००७ मध्ये दिशा बदलणारे वळण आयुष्यात आले. हे वळण मला संवर्धनाच्या क्षेत्राकडे घेऊन गेले. द.आफ्रिका हा वन्यजीवांनी समृद्ध असा देश आहे. या देशातच नव्हे, तर जगभरात ज्या अभयारण्याचा लौकिक आहे, त्या ‘क्रुगर नॅशनल पार्क’तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अभ्यासवर्गात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. हा कोर्स मी आनंदाने पूर्ण केला. या अनुभवाच्या बळावर वाइल्ड लाइफ प्रोजेक्ट हाती घेण्यास प्रारंभ केला. त्यासाठी द.आफ्रिका, केनिया, टांझानिया, पेरू, कॅनडा आदी देशातल्या जंगलांमध्ये भटकंती केली. कॅनडात असताना हडनस बे परिसरातल्या पोलर बेअरवर संशोधनात गुंतलो. त्यानंतर नामिबियातल्या न्यॉयरास (Neuras) गावी बिबट्याशी संबंधित संशोधनाची संधी चालून आली. मी त्यावर अक्षरश: झडप घातली. तिथे नानकुसे (N/a'an ku se Foundation) नावाची वनजीव संवर्धन संस्था आहे. या संस्थेत ‘ह्युमन-अॅनिमल कॉन्फ्लिक्ट’ या विषयावरच्या प्रकल्पात संशोधन सहाय्यक म्हणून मी काम केले. या कामाचा केंद्रबिंदू होता, माझा लाडका बिबट्या! या बिबट्याचं संवर्धन व्हावे, त्याच्यात आणि स्थानिकांमध्ये संघर्ष उद्भवू नये, त्याचे अस्तित्व टिकून राहावे, या उद्देशाने आम्ही बिबट्यांचा माग काढणे, त्यांना रेडिओ कॉलर बसवणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती घडवून आणणे, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना भरपाई देणे आदी उपक्रम हाती घेतले. म्हटले तर हे काम खूप अवघड होते. याचे एक कारण, न्यॉयरासचा १४ हजार हेक्टरहून मोठा अतिविशाल परिसर . एरवीसुद्धा नामिबिया हा  अत्यल्प लोकसंख्येचा मंगोलियानंतरचा जगातला दुसरा देश. म्हणजे, प्रत्येक ५० कि.मी. अंतरानंतर तुम्हाला दुसरा माणूस सापडावा, इतकी इथली जनवस्ती विरळ. इथे बिबट्या-चित्ता यांचा मुक्त वावर. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे बंदुका-रायफली. शिकारीची भलीमोठी परंपरा. पण, ही आव्हाने आम्ही पेलली. 
नानकुसेमध्ये असताना एकदा तर असं घडलं, की रात्री दहा वाजता एका शेतकऱ्याचा आमच्या रिसर्च सेंटरमध्ये फोन आला. त्याच्या शेतातल्या बकऱ्यांच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. बिबट्या बकऱ्यांचा फडशा पाडणार हे त्याला दिसत होतं. त्यामुळे तुम्ही जर लौकरात लौकर आला नाही तर मी बिबट्याला मारणार असं तो सारखं म्हणत होता. पण आम्ही त्याला आवरलं. समजावलं. म्हटलं काहीही झालं तरी बिबट्याला तू मारू नकोस. मग तयारीनिशी  आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा दीड तास उलटून गेला होता. पण शेतकरी शांतचित्ताने अडकलेल्या बिबट्यावर नजर ठेवून होता. आम्ही  सावधपणे त्या बिबट्याला बेशुद्ध केलं, त्याच्या मानेभोवती रेडिओ कॉलर लावली. शेतकऱ्याला म्हणालो, आता यापुढे तू फोन करून बोलवून घेण्याची गरजच नाही. बिबट्या तुझ्या शेतात शिरण्यापूर्वीच आम्हाला त्याचा ठावठिकाणा लागेल. तू काही म्हणण्याआधीच आम्ही बिबट्याला पकडू. त्या शेतकऱ्याने आमचं म्हणणं मानलं. मुख्य म्हणजे, संवर्धनाचं महत्व त्याला पटलं. पुढे त्या संशोधनादरम्यान दोन बिबटे आणि एक चित्ता यांना पकडून पुन्हा जंगलात सोडून देण्यात आम्हाला यश आलं. हा  लक्षात राहणारा अनुभव होता आणि संवर्धनाच्या प्रक्रियेतला महत्वाचा धडासुद्धा.


२०१४-१५ मध्ये अॅमेझॉनच्या जंगलात वकारी जातीच्या माकडांवरच्या संशोधन प्रकल्पात सहभागी झालो. ते मी केलेच, पण मला तिथे असलेल्या जग्वारवरही संशोधन करण्याचे माझ्या मनाने घेतले. त्याकडे माझा अधिक ओढा राहिला. अॅमेझॉनच्या जंगलातलं वास्तव्य हा तर न संपणारा असा थरारपटच होता, माझ्यासाठी. म्हणजे, कधी काय घडेल कधी परिस्थिती ओढवेल याचा कधी नसे. एकदा जंगलात पाऊस सुरु झाला. तो तब्बल तीन दिवस थांबलाच नाही.  एकदा आम्ही पुण्यातल्या विद्या व्हॅली शाळेतल्या मुलांसाठी आम्ही वेबिनार ठेवला होता. उद्देश ,मुलांना अॅमेझॉनच्या वातावरणाचा प्रत्यक्ष अंदाज यावा, तिथलं पर्यावरण कळावं, हा होता. वेबिनारची पुण्यातल्या शाळेची वेळ संध्याकाळ सहाची होती. तेव्हा तिकडे सकाळचे ६ वाजणार होते. परंतु आम्ही जिथे वस्ती करून होतो, तिथून रिसर्च सेंटरपासून मेन स्टेशनचं अंतर जवळपास ७० किमी अंतरावर होतं. त्यामुळे सोबतचे तीन-चार शास्रज्ञ आणि मी असे सगळे पहाटे चारलाच  बोटीने निघालो. निघालो, तर जंगलात धो धो पाऊस सुरु झालेला. मग काय आम्ही तसेच भिजत राहिलो. पण त्यात आम्हाला सेंटवर पोहोचायला अर्धा तास उशीर झाला. इकडे  लाइव्ह अॅमेझॉन जंगल बघायला आलेली शाळेतली मुलं कंटाळली. पण जेव्हा त्यांनी आम्हाला भिजलेल्या अवस्थेत पाहिलं, ती एकदम उत्साहात आली. मग पुढे आमच्यात छानसा परस्पर संवाद रंगला. अॅमेझॉनचा निसर्ग, अॅमेझॉनमधलं वाइल्ड लाइफ याबद्दल एेकून मुलं हरखून गेली. 


म्हणजे,सुरुवात निसर्ग भ्रमंतीने झाली. मग वन्य प्राण्यांकडे वळलो. त्यानंतर फोटोग्राफीचा छंद जडला. मग शोध मोहिमा हाती घेतल्या. आता वेळ संवर्धनाची होती.  त्यासाठी २०१७ हे वर्ष मी राखून ठेवले होते. त्या वर्षांत कुठलाही उद्योग मागे लावून न घेता, माझ्या लाडक्या नि लाजाळू स्वभावाच्या बिबट्यावर थेट पी.एचडी. करायची, हे पक्के केले. विषय ठरला. "ह्युमन-लेपर्ड को एक्झिस्टन्स ऑर कॉनफ्लिक्ट?' वेेडेपणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले...

 

आपण करतो एक आणि घडते भलतेच. हा अनुभव मला संशोधनाचे तपशील गोळा करताना आणि जागा निश्चिती करताना आला. म्हणजे, भारतात परतल्यानंतर मी बिबट्यावर संशोधन करायचे हे निश्चित केले. त्यासाठी जिथे बिबट्यांचा अधिवास आहे, अशा उत्तरांचल, राजस्थान आणि दक्षिणेतल्या काही जंगलांचा अभ्यास केला. त्यातल्या कर्नाटकातल्या दांडेली नॅशनल पार्कमध्ये संशोधनासाठी जमवाजमवही करून आलो. पण त्याच दरम्यान कधी तरी फेसबूकवर जयपूरजवळच्या झालाना गावाजवळच्या जंगलात भटकणाऱ्याच नव्हे तर घरात, मंदिरात, रस्त्यात दिसणाऱ्या बिबट्यांचे फोटो बघितले. त्यावरची वर्णने वाचत गेलो. माझे कुतूहल चाळवण्यासाठी तेवढे पुरसे होते. हे बिबटेे काही वेगळ्याच निष्कर्षाकडे इशारे करत होते.  योगायोगाने पुण्यातल्या ‘इला फाऊण्डेशन’चे काही मित्र आणि मी झालाना गावी जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो. आश्चर्याचे एकापाठोपाठ एक धक्के आम्हाला बसत गेले. पहिले आश्चर्य म्हणजे, झालाना हे ३० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जयपूरपासून अवघ्या तीन कि.मीवरचे गाव. विमान जयपूर एअरपोर्टवर उतरताना ते तुम्हाला सहज दिसते. दुसरे आश्चर्य म्हणजे, गेलो त्या ट्रिपमध्ये तीन ते चार दिवसांच्या कालावधीत आम्हाला चक्क ११ बिबटे नजरेस पडले. नंतर कधीही गेलो तेव्हा २-३ बिबटे सहज नजरेस पडत गेले. बरे, हे केवळ जंगलात नव्हे, तर फोटोत जसे पाहिले होते, तसे ते गावातल्या वाटांवर, मंदिरात, घरातही दिसत होते. आमच्या हेही ध्यानात येत होते, इथे बिबटे लोकवस्तीत येताहेत म्हणून गावकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताण-तणाव दिसत नव्हता की त्यामुळे रक्तरंजित संघर्ष उफाळून येत होता. जणू झालाना आणि बिबट्यामध्ये अलौकिक असे सहजीवन आकारास आले आहे.


या तुलनेत अगदी सहज म्हणून विकिपीडियावर उत्तराखंडची परिस्थिती तपासा. तुमच्या लक्षात येईल, की इथल्या गावांमध्ये बिबट्या आणि माणसामधला संघर्ष इतका तीव्र झालेला आहे की, वर्षभरात साधारण ३००-५०० माणसे यात बळी जातात. मग व्यावसायिक शिकारी बोलवून एकतर बिबट्यांना जेरबंद केले जाते किंवा गोळ्या घालून ठार तरी मारले जाते. आपल्या महाराष्ट्रातही मुंबई, जुन्नर आदी भागात बिबटे जंगलात खाद्य मिळाले नाही की, मनुष्यवस्त्यांमध्ये शिरतात. तसे ते शिरले की, संघर्ष (यावर विद्या अत्रेय यांनी खूप लक्षवेधी असे संशोधनही केले आहे.)अटळ असतो. त्यात अनेकदा बिबटे जखमी होतात, बळीही जातात.  पण झालानात नेमके उलटे चित्र दिसते. बिबटे ग्रामीण लोकजीवनात सहज मिसळून गेलेले दिसतात. इथे त्यांच्यावर कोणी हल्ला करत नाही, की बिबटे एकेकटा माणूस पाहून त्याचा बळी घेत नाहीत. म्हणूनच गेल्या १५० वर्षांत इथल्या बिबट्यांनी माणसावर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही.  त्या अर्थाने ही "वन ऑफ ए क्लासिक केस ऑफ को एक्झिस्टन्स' आहे.  


बिबट्या हा अनेकांसाठी दहशतीचा, भीतीचा आणि हाती सापडलाच, तर अद्दल घडवण्याचा विषय आहे. माझ्यासाठी मात्र हा आता शोध-संशोधनाचा आणि प्रबंध लेखनाचा विषय झालेला आहे. त्यासाठीच मी राजस्थानातल्या झालानाच्या जंगलात त्याचा माग काढतो आहे...
 त्याच झालानातल्या जंगलातली १७ मार्चची  अशीच एक संध्याकाळ. काही तासांपूर्वीच एका बिबट्याने नीलगायीचा एक बछडा मारला होता. आम्ही त्या परिसराच्या निरीक्षणात गुंतलो होतो. तेवढ्यात, शेजारच्या गावातील एका घरात बिबट्या घुसल्याचे सांगणारा फोन आला. माहिती मिळताच आम्ही ताबडतोब फैयाजभाईंच्या घरी पोचलो. तीन माजली घर होते आणि मागे अर्धा एकर शेत. त्यात गहू लावलेला. पण बिबट्या अजून तिथवर आलेला नव्हता. मधल्या वेळेत आजूबाजूच्या जागेचे निरीक्षण केल्यावर आम्हाला लक्षात आले,  की बिबट्या त्यांच्या शेतात आरामात राहात आला आहे. शेजारच्या एका वापरात नसलेल्या घराचा त्याने जणू डाइनिंग हॉल केला आहे. कुत्रे, तितर, खार यांचे सांगाडे तिथे विखुरलेले आहेत. खाऊन झालं, की इकडच्या शेतात आराम, हा त्याचा बहुदा दिनक्रम गेले दोन महिने सुरु  आहे. निरीक्षणानंतर   आम्ही, वन  विभागाला बिबट्याची माहिती कळविल्यावर  तत्परतेने पिंजरा लावला गेला. बिबट्याला पकडले गेले आणि  जंगलात नेऊन सोडले गेले. 
इथे महत्वाचा मुद्दा हा की, जीवाला धोका असूनसुद्धा, बिबट्याला मारणे, हुसकून लावणे, जायबंदी करणे, हा विचार मनात न आणता फैयाजभाईंच्या कुटुंबाने रीतसर वन विभागाची मदत घेतली. बिबट्याचा जीव वाचवला!


माझ्या अभ्यासक्षेत्राच्या जवळच एक मंदिर आहे. पंडित रामकिशोरजी तिथले पुजारी आहेत. गेली ३० वर्षे ते तिथे राहात आहेत. बिबटे नियमितपणे  मंदिराच्या आवारात येत असतात. संध्याकाळी, रात्री, पहाटे केव्हाही दर्शन देऊन जातात. त्यामुळे आता रामकिशोरजी, येणारे भक्त यांना या बिबट्याची चांगलीच सवय झाली आहे. इतकेच नव्हे तर गावातल्या काही तरुण मुलांना हाताशी धरून, पंडितजींनी छोटी छोटी पाण्याची कुंडे तयार केली आहेत. मोर, नीलगाय, कोल्हे, तरस, लंगूर माकडे, इतर पक्षी आणि बिबटे या पाण्याचा लाभ घेत असतात. गंमत म्हणजे, या मंदिरात बिबट्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. गावातली भाविक मंडळी त्यांचीसुद्धा मनोभावे पूजा करत आहेत. याचा अर्थ बिबट्याचा गावकऱ्यांनी केवळ स्वीकारच केलेला, नाहीतर त्याला दैवताचा मान दिलेला आहे. झालानातल्या गावकऱ्यांसाठी बिबट्या देवासमान बनला आहे.
बिबट्या हा जगात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे. भारतामध्ये आढळणारी प्रजाती ही  Panthera pardus fusca म्हणून ओळखली जाते. माणसाच्या जास्तीत जास्त संपर्कात येणारा आणि म्हणूनच माणसाशी जुळवून घेण्याची विलक्षण क्षमता असलेला असा हा प्राणी आहे. वाढत्या शहरीकरणाशी याने अत्यंत कमी वेळात नुसतेच जुळवून घेतलेले नाही, तर आपण इथे जगायला लायक आहोत, हे सिद्धही केले आहे. परंतु एकीकडे औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या यामुळे बिबटे आणि मनुष्य यांचा संपर्क आणि त्यातून संघर्ष हा वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातले जुन्नर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम या भागात संघर्षाचे प्रमाण मोठे आहे. गेल्या ३० वर्षात ११०० हून अधिक माणसे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.  या घटनांमुळे मनुष्य हा बिबट्याला आपला शत्रू समजू लागला आहे. 


जयपूरजवळचा झालाना वन  परिक्षेत्र हा याला सणसणीत अपवाद  ठरला आहे. जयपूर शहराच्या मध्यभागी २९ वर्ग की.मी.चे हे नुकतेच घोषित झालेले हे अभयारण्य आहे. साधारणत:  ५० हजाराच्या वर  लोकसंख्या इथल्या अभयारण्याच्या आजूबाजूला असलेल्या १८ खेड्यांमध्ये / वस्त्यांमध्ये राहते आहे. बिबट्याचे अस्तित्व ही यांच्या दैनंदिन जीवनातली एक अविभाज्य आणि नैसर्गिक घटना आहे. इथे घरात, देवळात, शेतात, वस्त्यांमध्ये, बिबटे मुक्तपणे  संचार करतात. गावातली कुत्री, डुकरे हे इथल्या बिबट्यांचे मुख्य अन्न आहे. जंगलात चरायला जाणाऱ्या बकऱ्या, गाय / म्हशींची गोऱ्हे यांच्यावर पण अधून मधून हल्ला होत असतो. हा सर्व प्रदेश जेव्हा अभयारण्य म्हणून घोषित झाला, तेव्हा अपरिहार्यपणे  लोकांच्या मुक्त संचारावर बंदी आली. काही नियम आले. माझ्या संशोधनाचा एक भाग म्हणून आम्ही या खेडेगावातल्या लोकांचा सर्व्हे केला. बिबट्याचे अस्तित्व, त्यामुळे निर्माण होणारी भीती, मनुष्यवस्तीवरचे हल्ले, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली माणसे, बिबट्याविषयीचा माणसांचा दृष्टिकोन, वन विभागाबद्दल असलेली / नसलेली कटुता, बिबट्या संवर्धनाचे महत्व, इत्यादी गोष्टींचा यात वेध घेतला. ज्यांना आम्ही भेटलो, त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले, कामगार, रंगारी, ड्रायव्हर, चहावाले, ठेलेवाले, गवळी असा हा कष्टकरी वर्ग आहे. बिबट्यांबद्दल त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक प्रेमाची भावना आहे. आपल्यासारखाच तो एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा आपल्या इतकाच अधिकार आहे. जंगलामध्ये खाद्य उपलब्ध नसेल, तेव्हाच तो मनुष्य वस्ती मध्ये येतो, या वास्तवाची त्यांना पूर्ण जाणीव आहे. नुसतीच जाणीव नाही, तर त्यांनी ही एक नैसर्गिक साखळी आहे, हे ही मान्य केले आहे. त्यामुळे कोणीही बिबट्याला हुसकून लावण्यासाठी मांसामध्ये विष कालवत  नाही, फटाके वाजवून त्यांना पळवून लावत नाही, काठ्या घेऊन झोडपत नाही की, दगडाने ठेचून मारत नाही. मनुष्यवस्तीच्या नजीक येऊनही बिबट्याची इथे शिकार होत नाही. इथल्या ८७% लोकांना बिबट्याचे अस्तित्व महत्वाचे वाटते, कारण त्यामुळे जंगलाचा ऱ्हास  होत नाही, असे समजूतदार उत्तर ते देतात. याचाच, अर्थ बिबट्या हा जैवसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे त्याचं अस्तित्व टिकून राहणे म्हणजे, निसर्ग अबाधित राहणे आणि पर्यायाने माणूस सुरक्षित असणे आहे. याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच राजस्थान वनविभाग ज्या काही उपाय योजना राबवते आहे. त्याला ९५% लोकांचा पाठिंबा आहे. झालानाचे जंगल वाचवणे, महत्वाचे  आहे, हा  १००% लोकांचा आग्रह आहे.


नुकत्याच घोषित झालेल्या या अभयारण्याची धुरा जी. वी. रेड्डी या अतिशय कार्यक्षम अधिकाऱ्याच्या हातात आली आहे. रेड्डी यांनी लोकांच्या सहभागातून रणथंबोर व्याघ्र प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे. शास्त्रीय पद्धतीने वन सरंक्षण आणि व्यवस्थापन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, लोक सहभाग आणि उत्तम सांघिक कार्यामुळे झालानामधील बिबट्याची संख्या वाढायला नक्कीच मदत होत आहे. एवढ्या छोट्या परिक्षेत्रामध्ये सध्या अंदाजे २२ ते २५ बिबटे नांदत आहेत.


मी आणि माझे सहकारी, या बिबट्यांचा शास्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करत आहोत. माझे सहकारी हे याच खेड्यांमध्ये राहणारे तरुण आहेत. लहानपणापासून ते बिबट्याच्या सान्निध्यात वाढलेले आहेत. त्यांचे ज्ञान हे माझ्या शोध कार्यासाठीच नव्हे, तर झालानाच्या बिबट्याच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. फैयाजभाई, पंडित रामकिशोर दासजी, राज गुर्जर, शुभम सैनी, दयाळ गुर्जर, अभिषेक गुर्जर, दिनेश डाबी  हे या समाजाचे सजग प्रातिनिधी आहेत. प्रगल्भ दृष्टिकोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीमुळे, बिबट्यांबद्दल असलेल्या प्रेमामुळे इथे मनुष्य आणि बिबट्यामध्ये सहजीवन आकारास आले आहे. किंबहुना, बिबट्याने दिलेल्या सहजीवनाच्या हाकेला मिळालेली ही एक सौहार्दपूर्ण साद आहे...

 

 मात्र, आणखी १५-२० वर्षंानी म्हणजेच २०३० पर्यंतच कदाचित ही परिस्थिती बदलणार आहे. कारण, तोवर वाढलेल्या लोकसंख्येमुळे एकूणच वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण होणार, हे उघड आहे. बिबट्या हा वन्यजीव साखळीतला अग्रघटक आहे. तो टिकून राहाणे हे निसर्गाचा समतोल कायम राहण्यासाठी अनन्यासाधारण महत्वाचे आहे. अशा प्रसंगी  त्यावेळच्या संभाव्य संघर्षाचा अदमास घेता आताच उपाययोजना आखणे त्यासाठी संशोधन करणे अतिव महत्वाचे आहे. ही तातडीची स्थिती राजस्थान सरकारच्या पुरेपूर ध्यानी आलेली आहे. झालानामधला बिबट्या-माणसामधला सौहार्दबंध मजबूत आहेच, हा भाग आहेच, पण राजस्थानातल्या अरावली पर्वताच्या पूर्वेकडच्या जंगलांमध्येसुद्धा बिबट्याची संख्या लक्षणीय आहे. ती केवळ लक्षणीयच नाही, तर ती सुदृढ म्हणता येईल, अशीही आहे, हे हेरून राजस्थान सरकारने "प्रोजेक्ट टायगर'च्या धर्तीवर "प्रोजेक्ट लेपर्ड' ही महत्वाकांक्षी मोहीम सुरु केली आहे. त्यासाठी सात जागा निश्चित केल्या आहेत. त्यातली एक जागा अर्थातच झालानाची  आहे. झालानाचा प्रकल्प ज्याला ‘फ्लॅगशिप’ म्हणतात तसा प्राधान्य-प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. वन्यजीव संवर्धनात रस असलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी या मोहिमेत वैयक्तिक स्वरुपाचे लक्षही पुरवले आहे. 
ही माझ्यादृष्टीने मोठीच घटना आहे. आम्ही चार वर्ष हा प्रकल्प राबवणार आहोत.  या चार वर्षांत आम्ही  बिबट्याच्या बदलत्या जीवनशैलीचा,  गुणसूत्रांच्या वैशिष्ट्यांचा वेध घेणार आहोत. त्यातून बिबट्याचा जिन पूल अर्थात अनुवंशिक तपशील आकारास येण्यास मोठाच हातभार लागणार आहे. बिबट्यांचा होणारा संकर, उद्भवणारे आजार यांचा उलगडा होण्यासही यामुळे मदत होणार आहे. याशिवाय त्याचे खाद्य, त्याच्या सवयी, त्याच्या निवाऱ्याच्या जागा, प्रजननानाच्या जागा बिबटे मनुष्य वस्तीत येऊन हल्ले का करतात, प्रजननासाठी अमूक जागाच का निवडतात, जंगलात त्यांचा वावर कसा असतो, जंगलात असताना कोणाकोणाशी त्याला संघर्ष करावा या सगळ्याचा सखोल अभ्यास आम्ही करणार आहोत. त्यासाठी लाइव्ह फिल्ड ड्रोन्स, थर्मल कॅमेरे, निरीक्षणासाठीचे टॉवर्स उभारले जाणार आहेत. ही संयमाची परीक्षा पाहणारी मोहीम असणार आहे. एकाच वेळी पी.एचडी.चा अभ्यास आणि ‘प्रोजेक्ट लेपर्ड’ ही मोहीम अशा दोन पातळ्यांवर मी वावरणार आहे. या संशोधनात माझे गाइड आहेत, प्रो. रुवेन योसेफ (Reuven Yosef). इस्रायल-नेगेव्ह मधल्या बेन गुरियन युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक आहेत. योसेफ जगप्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आहेत. गंमत ही आहे की, त्यांचा जन्म भारतातला आहे. पुणे, जोधपूर असे त्यांचे वास्तव्य राहिलेले आहे.भारतामधल्या निसर्ग संवर्धनाबद्दल त्यांना प्रचंड कळकळ आणि प्रेम आहे.  या घडीला तब्बल ६१ देशांसाठी ते या घडीला वन्यजीव संवर्धनाचे वेगगेवळ्या स्वरुपाचे काम करत आहेत. संवर्धनाच्या क्षेत्रातला मानाचा "रोलेक्स अवॉर्ड फॉर एन्टरप्राइज' हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मानही त्यांच्या नावावर जमा आहे. झालाना प्रकल्पात  अशा एका दिग्गजाचे मार्गदर्शन लाभणे,ही वैयक्तिकरित्या अत्यंत समाधान देणारी गोष्ट आहे. या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य झालाना वाइल्ड लाइफ रिसर्च फाऊण्डेशन (JWRF) या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. 

 

माणूस हा नंबर  एकचा  कांगावेखोर प्राणी आहे. म्हणजे, काय तर आपला हिंस्रपणा अत्यंत चलाखीने लपवून त्याला इतर प्राण्यांतले वैगुण्य जगापुढे आणण्यात भलता रस आहे. बिबट्या मनुष्य वस्तीत शिरल्याच्या घटना सातत्याने घडतात. ते वास्तवच आहे. पण वर्तमानपत्रात या घटनांचे वर्णन कसे येते? एक तर बिबट्याला सरसकट ‘नरभक्षक’ घोषित केले जाते आणि पिंजऱ्यात जेरबंद त्याच्या रक्ताळलेल्या, हिंस्र चेहऱ्याचे पुन्ह:पुन्हा दर्शन घडवले जाते. पण मी हे अनुभवाने सांगतो, की, बिबट्या हे एक लाजाळूचे झाड आहे! जसे एखादे अंतर्मुख स्वभावाचे माणूस अनोळखी माणसासमोर बुजून जाते, शक्यतो कुणाच्या नजरेस येणार नाही, अशा पद्धतीने वागते, जंगलात ही तऱ्हा बिबट्याची असते. तो कायम स्वत:ला लपवत भटकत असतो. कुणी अनोळखी समोर आले की, झाडीत लपून बसतो. अर्थात, लाजाळू असला तरीही जैव साखळीत बिबट्याचे स्थान अगदी वरचे. वाघाच्या बरोबरीचे. पण जिथे वाघांचा अधिवास असतो, तिथे बिबटे जंगलाच्या सीमेकडे ढकलले जातात.वर्चस्वाच्या लढाईत वाघ त्यांना हाकलून लावतात. अशा परिस्थितीत मनुष्यवस्तीकडे जाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो. म्हणजे, एका बाजूला जंगलातून बाहेर पडण्याची तयार होत गेलेली स्थिती आणि दुसऱ्या बाजूला मनुष्य वस्ती या कात्रीत बिबटे सापडले आहेत. 


एकोणीसावे शतक आणि विसाव्या शतकाचे प्रारंभाचे दशक या काळात लोकसंख्या मर्यादित होती. जंगलांवर अतिक्रमण व्हायचे होते. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या भटकंतीचे मार्गही मोकळेढाकळे होते. उदाहरणार्थ बांधवगडचा वन्य प्राणी काझिरंगापर्यंत मजल दलमजल करत, सहज जात असे. हे ओपन कॅरिडॉर कालांतराने आक्रसत गेले.अधिवास नष्ट झाल्यामुळे  जंगलांतल्या प्राण्यांमध्ये खाद्यासाठी स्पर्धा वाढत गेली. त्यातला एक संघर्ष वाघ आणि बिबट्यांमध्ये झाला. ऐंशीच्या दशकात ‘प्रोजेक्ट टायगर’सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले. ते महत्वाचे होतेच, पण त्याचा एक परिणाम असा झाला की, जिथे वाघांची संख्या वाढली, तिथे तिथे बिबटे परिघाबाहेर फेकले गेले. अशा परिस्थितीत मनुष्यवस्तीकडे जाण्यावाचून त्यांना पर्याय राहिला नाही.  बिबटे हे उंदिर, घूस, मोर, तीतर, साळिंंदर, डुकरं, कोंबड्या, कुत्री अशा सगळ्या प्रकारच्या प्राण्यांना मारून आपला निर्वाह करतात. अनेकदा बिबटे शिकार झालेल्या प्राण्यांचे मांस झाडांवर उंच जागी नेऊन ठेवतात. बघणाऱ्याला हा त्यांचा भलताच राजेशाही थाट वाटतो. मात्र, प्रत्यक्षात वाघाच्या किंवा अन्या प्राणांच्या  (उदा.तरस) भीतीतून आलेली ती प्रतिक्रिया असते. मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर त्यांचे लक्ष्य भटकी कुत्री असतात. त्याचे टिकून राहणे त्यावर अवलंबून असते. माणसांवर होणारे हल्ले हे अस्तित्वाच्या भीतीतून झालेले असतात. लाठ्या-काठ्या घेतलेली माणसे पाहिल्यावर बिबट्याने बचावासाठी हिंसक होणे निर्सगनियमनाला धरूनच असते. 


पण याही वास्तवाकडे आपण माणसे साफ दुर्लक्ष करतो. हेसुद्धा नाकारतो की, वन्यप्राण्यांमध्ये बिबट्याइतका उक्रांत होत गेलेला, परिस्थितीशी जुळवून घेतलेला दुसरा प्राणी नाही. त्याने परिस्थितीशी जुळवून घेतल्याचा ठसठशीत पुरावा आपल्याला जयपूरनजीकच्या झालाना गावात पाहायला मिळतो. इतर वस्तीमधल्या लोकांनी याच प्रकारचे शहाणपण जपले तर तिथेही बिबट्या रोजच्या जगण्याचा एक भाग बनू शकतो, हा परस्पर संदेशही मिळतो. 

 

बिबट्या जगायला हवा आहे. त्याचे अस्तित्व टिकायला हवे आहे. फोटोंसाठी थरारक पोज मिळते म्हणून नव्हे तर जंगलसंपदा अबाधित राहावी म्हणून त्याचे असणे खूप महत्वाचे आहे. बिबट्या अस्तित्वात असणे ही जंगल सुदृढ असल्याचे लक्षण आहे. एका बाजूला माणूस-बिबट्या यातला संघर्ष टिपेला पोहोचलेला असला, तरीही आजच्या घडीला बिबट्यांची संख्या वाढतीच राहिलेली आहे. नियोजनबद्ध ‘प्रोजेक्ट लेपर्ड’मुळे यात आणखीही सुधार होण्याची शक्यता आहे. पण म्हणजे बिबट्यांची संवर्धनाची गरज नाहीए का? तर तसेही नाही. कारण, बिबट्याची दहा पिल्ले जन्मली तर त्यातली सरासरी ९ पिल्ले मरतात. जगते एक. याचा अर्थ बिबट्यांचा मृत्यूदरही मोठा आहे. अलीकडच्या काळात मनुष्यवस्तीत येण्याने, रात्री महामार्गावर ओलांडताना गाड्यांच्या धडकेने मरण पावणाऱ्या बिबट्यांचीही त्यात भर पडली आहे. अशा बिकट समयी त्याचे जंगलात नसणे जंगलांवरच्या अतिक्रमणाला मोकळे रान देणारे आहे. एकदा का जंगले माणसाच्या ताब्यात गेली, की त्यांचा ऱ्हास ठरलेला आहे. हा सरळसरळ आत्मघात आहे. तो टाळण्याचा एक मार्ग बिबट्याचे संवर्धन हा आहे. संवर्धनासाठी संशोधन अपरिहार्य आहे. हीच अपरिहार्यता संशोधन-संवर्धन या नात्याने माझे जगणे समृद्ध करीत चालली आहे... 

(लेखक  वन्यजीव संशोधक-संवर्धक आहेत. संपर्क :   ९८२२९७९८६६)