आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतर्मुखी, बहिर्मुखी आणि उभयमुखी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत:च्याच कोषात राहणाऱ्या, लाजऱ्या-बुजऱ्या, अतिसंवेदनशील अशा अंतर्मुख माणसांच्या आणि समाजाभिमुख, तीव्र प्रतिक्रिया देणाऱ्या, स्वकेंद्री पण त्याच वेळी मित्रांत रमणाऱ्या बहिर्मुख व्यक्तिमत्त्वाच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल...
 
 
संगीत १३-१४ वर्षांचाच असला तरी मित्रांच्या कोणत्याही कार्यक्रमात तो नेहमी पुढे असायचा. काही ठरवायचं असेल तर आपलं म्हणणं न भिता मांडायचा. त्याचा स्वभाव अगदी मोकळा होता. संगीत बरोबर असला की, सगळे मित्र निश्चिंत असायचे. नातेवाइइकांतही तो धीट म्हणून ओळखला जायचा. जसजसा तो मोठा होत गेला त्याच्या कॉलेजमध्ये आणि नंतर नोकरीच्या जागीही तो विविध गोष्टींवर चर्चा करताना निर्भीडपणे बोलायचा. सगळ्यांमध्ये मिसळणं त्याला आवडायचं. त्याच्याप्रमाणे आपणही व्हावं असं इतरांना वाटावं असं त्याचं व्यक्तिमत्त्व.
 
 
पर्ण ही अतिशय गोड मुलगी. नृत्य आणि मानसशास्त्र या दोन्हींचं शिक्षण घेऊन नृत्याचे शिकवणी वर्ग घेणारी. मात्र तिला स्वत:ला समुपदेशक म्हणून काम करता येत नाही. बोलण्यापेक्षा ती लेखन करते. खूपच कमी बोलते. इतकी गुणी पण स्वत:विषयी बोलणार नाही. लोकांत फारशी मिसळत नाही. सणसमारंभात जाणं तिला संकोचाचं वाटतं. एकटं राहायला तिला आवडतं. चिंतन करणं, नवनवीन विषयाचं वाचन करणं तिला मनापासून आवडतं. मात्र तिच्या या एकलकोंड्या स्वभावाची घरच्यांना काळजी वाटते. 
 
 
संगीत हा बहिर्मुख किंवा एक्स्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्वाचा नमुना आहे. तर पर्ण ही अंतर्मुख किंवा इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्वाची आहे. बहिर्मुख व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशा वाटतात तर अंतर्मुख व्यक्तींबद्दल लोक फारसे उत्सुक नसतात. अशा नेमक्या विरुद्ध व्यक्तिमत्त्वाची माणसं एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार म्हणून एकत्र आले तर विसंवाद निर्माण होतो. त्यांना एकमेकांच्या सोबत राहायचे असेल तर समुपदेशनाची गरज असते. कारण हा दोन व्यक्तिमत्त्वातील फरक आहे हे समजावून घ्यावं लागतं. प्रयत्नाने स्वभावात थोडाफार बदल होईल मात्र पूर्ण बदलणं घडत नसतं. 
 
 
अंतर्मुख माणसं लाजरी, शांत, अतिसंवेदनशील असतात. समाजापासून लांब राहाणं ती पसंत करतात. ती स्वत:च्याच कोषात राहतात. तर बहिर्मुख व्यक्तींचा स्वभाव हाच मुळी समाजाभिमुख असल्यानं त्यांचं वागणं, त्यांच्या प्रतिक्रिया बऱ्याच तीव्र असतात. लोकांचं लक्ष जावं, त्यांच्या लक्षात यावं अशी ही माणसं असतात. बहिर्मुख माणसं स्वकेंद्री, मित्रांत खूप रमणारी, लोकांचं अतिशय आवडतं नेतृत्व म्हणून असणारी, अशी प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत असतात. पण ही सारी ठरावीक साच्याची लक्षणे असतात. माणसं अगदी तंतोतंत तशी नसली तरी मोठ्या प्रमाणात हा पर्सनॅलिटी ट्रेट त्यांच्यात दिसून येतो. यांच्यात आणखी एक विशेष व्यक्तिमत्त्व असते ते म्हणजे अॅम्बिव्हर्ट म्हणजे उभयमुखी. हे व्यक्तिमत्त्व अंतर्मुख आणि बहिर्मुखचा सुरेख संगम असतो. कार्ल जुंग या मानसशास्त्रज्ञानं म्हटलं आहे की, वेगवेगळ्या प्रसंगात माणसं अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणं दाखवत असतात. 
 
 
पर्णसारखी मुलं-मुली शाळेत, कॉलेजात स्वत:तली ऊर्जा घेऊन स्वत:तच रमतात. आपल्या मनातलं सांगणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. मग ती अबोल, शांत, राहाणं पसंत करतात. अशा विवाहित स्त्रिया सासरी किंवा नवऱ्याबरोबर मोजकंच बोलतात. सहनशील वाटतात. अंतर्मुख माणसं ऑफिसमध्ये काम करताना लोकांशी संवाद करण्यासाठी मेसेज किंवा ई-मेलचा उपयोग करतात. समोरासमोर बोलणं टाळतात. ती फार मोठी सार्वजनिक प्रवक्ती नसतात. थोडेसे अंतर राखूनच ती वागतात. खूप माणसांच्या गर्दीत ती आक्रसल्यासारखी होतात. त्यातली चांगली बाजू अशी आहे की, ती चांगली विचारवंत असू शकतात. कारण ती बोलण्यापेक्षा जास्त ऐकतात. बोलण्याआधी विचार करतात. संवादापेक्षा लिखाणातून आपण अधिक चांगलं व्यक्त होऊ असं त्यांना वाटतं. आपले विचार लेखनातून ती अधिक ठामपणे मांडतात. अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाची माणसं भोवतालची माणसं अचूक वाचू शकतात. त्यांच्यातले बारकावे टिपतात. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकण्याच्या स्वभावामुळे ती खूप माहिती मिळवतात आणि त्यातून निर्माण होतं त्यांच्यातील नवनिर्मितीचं कारंजं. त्यामुळे अंतर्मुख व्यक्ती या वेगळ्या अर्थानं अनमोल असतात. 
 
 
संगीतसारखे बहिर्मुखी व्यक्तिमत्त्व असणारे लोक अंतर्मुखी लोकांपेक्षा निराळे असतात. ते इन्ट्रोव्हर्ट लोकांपेक्षा जास्त हुशार किंवा स्मार्ट असतात असं नाही तर त्यांचे मेंदू वेगळ्या पद्धतीनं बनलेले असतात. जेव्हा त्यांना एखादा स्टिम्युलस दिला जातो तेव्हा त्यांचा प्रतिसाद फार पटकन येतो. अगदी झटकन उडी मारल्यासारखा. बहिर्मुखी व्यक्तिमत्त्वाच्या लोकांना आयुष्यात रिस्क आणि रिवॉर्ड घ्यायला आवडतं. डोपामाइन हा जो न्यूरो ट्रान्समीटर मेंदूला नियंत्रित करतो त्यातूनच त्यांची ही धोका पत्करण्याची वृत्ती दिसून येते. जी त्यांना करिअरच्या मार्गावर पुढे जाण्याचा उत्साह देते. वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठाचे संशोधन सांगते की जी,  माणसं जास्त एक्स्ट्रोव्हर्ट  असतात ती जास्त आनंदी राहतात. त्यांचा मूडही सकारात्मक असतो. समाजाभिमुख फुलपाखरं असं त्यांना म्हणायला हरकत नाही. या व्यक्ती समाजात मिसळायला आवडणाऱ्या, बडबड्या, अतिउत्साही, सकारात्मक असतात. आपण आपली मुलं, आपल्या घरातली माणसं कशी आहेत हे याच्यावरून ओळखता येतं. मग जुळवून घेणं सोप जातं. हे लोक जणू उत्साहानं थबथबलेले असतात. नवनव्या माणसांना भेटायला त्यांना आवडतं. विविध सामाजिक कार्यात सहभागी झाल्यानं ते जणू नवीन रुप धारण करतात. त्यांचा उत्साह ओसंडून वहात असतो. 
 
 
व्यक्तिमत्त्वातील सगळ्यात टोकाचे स्वभाव म्हणजे बहिर्मुख आणि अंतर्मुख स्वभाव. काही माणसं अती एक्स्ट्रोव्हर्ट तर काही अति इन्ट्रोव्हर्ट असू शकतात. पण बव्हंशी लोक या दोघांच्या मधले असतात. एक चांगलं व्यक्तिमत्त्व तेच असतं जे यां दोघांमधील चांगले गुण घेऊन वागते. म्हणून अशा लोकात राहून प्रेरणा घ्यावी. एकटं राहून वाचन, चिंतन, मनन करावं. गटचर्चेत सहभागी होऊन त्यात मन रमवावं. कधी एकेकाशी बोलून आनंद घ्यावा, मित्रमंडळ वाढवावं पण नातंही घटट् असावं. गरज असेल तेव्हा जास्त बोलावं, कमी बोलावं, आणि जास्त ऐकावंही. बदलाला सकारात्मकतेनं सामोरं जावं. पुर्ण एकाग्रतेने अधिक वेळ काम करावं. आवश्यकता असेल तेव्हा कधी मोकळं तर कधी अंतर ठेवून वागावं. सर्वांना मदत करावी. निर्णय विचार करून परंतु वेगाने घ्यावेत. मीटिंगमधे आपल्या कल्पना जरूर मांडाव्यात. जर तुमच्या सहवासातली माणसं अशी व्यक्त-अव्यक्त होणारी असतील तर प्रथम त्यांचा स्वभाव जाणून घ्या. आणि त्यांच्याशी वागताना तसं वागा. मात्र स्वत: उभयमुखी बनण्याचा प्रयत्न करा.
 
- डॉ. स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...