आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग्रही असा, आक्रमक नव्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या गुणदोषांबद्दल जाणीव असणारी, स्वत:च्या मर्यादांचं भान असणारी, स्पष्ट बोलणारी माणसं आग्रही व्यक्तिमत्त्व या प्रकारात येतात. मात्र, या स्वभाववैशिष्ट्याच्या पुरेशा माहितीअभावी त्यांना सरसकट आक्रमक समजलं जातं, जे पूर्णत: चुकीचं आहे. आग्रही व्यक्तिमत्त्वाची माणसं स्वत:च्या मतांवर ठाम असतात आणि असं ठाम असणं नेहमीच आत्मसन्मानानं जगण्याची वाट दाखवतं.

 

आग्रही व्यक्तिमत्त्व असणारी माणसं स्वत:चं योग्य मूल्यमापन करू शकतात. ही समज त्यांना येते कुठून तर निरीक्षणातून. स्वत:शी, स्वत:च्या मनाशी विधायक संवाद केल्यानं ती जाण येते. त्यातूनच स्वत:च्या गुणदोषांची जबाबदारी घेण्याची त्यांच्या मनाची तयारी असते. समोरच्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण या जगात परिपूर्ण कुणीच नसतं. माणूस आहे म्हणजे चुका होण्याची शक्यता आहे हे त्यांना कळतं. होकारार्थी स्वभाव प्रकाराची माणसं हे जाणतात की, अशा पद्धतीनं वागण्यासाठी नम्रपणा हवा. ही अपूर्णता स्वीकारण्याची इच्छा आणि प्रेरणा वाढवली तर हे जमू शकतं. याबाबतची त्यांची दृष्टी तयार असते. 

 

स्वनियंत्रण आणि भावनिक स्थैर्य हे आग्रही, खंबीर व्यक्तिमत्त्वाचे चांगले लक्षण आहे. त्यामुळेच त्यांची वृत्ती शांत आणि संयमी असते. आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. त्यामुळे भावना व्यक्त करणं आवश्यक आहे हे त्यांना समजतं. त्यांना राग येत नाही, दु:ख होत नाही, काळजी वाटत नाही असं नसतं पण त्यांना हे ठाऊक असतं की, त्यांनी भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर भावना चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होऊ शकतात. म्हणूनच इतरांशी वागताना ते त्यांच्या भावनांबद्दल सहअनुभूतीने वागतात. दुसऱ्यांचे दोष दाखवून त्यांना टोमणे मारणं, त्यांचं शोषण करणं करणं किंवा आगीत तेल ओतणं हे प्रकार ते करत नाहीत. स्वत:च्या आयुष्याच्या केंद्रस्थानी स्वत:ला आणायला ते लोकांना मदत करतात. 

 

रोजच्या आयुष्यात बरेचसे प्रश्न विसंवादामुळे जसे निर्माण होतात तसेच योग्य संवाद झाला तर त्यांची व्यवस्थित उकलही होते. जेव्हा विचारांचं, मतांचं आदानप्रदान नीट होतं तेव्हा समस्या सुटू शकतात. खंबीर, आग्रही, व्यक्तिमत्त्वाची माणसं साधेपणानं, स्पष्ट आणि खरं बोलून आपल्या भावना व्यक्त करतात. एवढंच नव्हे तर इतरांच्या भावना आणि विचारही ते तितक्याच शांतपणे ऐकायला तयार असतात. खरं म्हणजे संवादाचं मोल जाणून ते आपल्या संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारात सकारात्मक बदल कसा करता येईल, सुधारणा कशी करता येईल यासाठी वेळ देतात. स्वत:चं संवाद कौशल्य विकसित करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. 

 

या अॅसर्टिव्ह पर्सनॅलिटीचं अर्थात खंबीर व्यक्तिमत्त्वाचं दिसून येणारं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मर्यादा आखून कशा घ्यायच्या हे त्यांना जमतं. दुसऱ्यांबरोबरचं आपलं नातं नेहमी छानच असतं असं नाही. काही वेळा अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात ज्यांच्या मनात दुसऱ्यांना त्रास देणं, कडवटपणे वागणं, शोषण करणं, असे विचार असतात. हे जास्त काळ सहन न करता, ‘पुरे असं वागणं’ हे समोरच्याला कधी अन कसं सांगायचं हे अशा व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना समजतं आणि जमतंही. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि काही परिस्थितीत लक्ष्मणरेषा स्पष्टपणे आखायलाच हवी, हे यांना बरोबर कळतं. समोरच्या व्यक्तीशी वाद न घालता, न भांडताही ते नाही म्हणू शकतात. दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि इच्छांनुसार नेहमीच जगता येत नाही, असं ते ठणकावून सांगतात. त्या वाटण्यातून त्यांना अपराधीपणाची भावना वगैरे येत नाही. दुसऱ्यांकडून येणारा नकार किंवा मतभेद यांनी ते विचलित होत नाहीत. नीट सांभाळून घेतात. 

 

आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आग्रही व्यक्तिमत्त्व असताना आपण आक्रमकतेकडे तर झुकत चाललो नाही नं याची काळजी घ्यायलाच हवी. आग्रही असणं रोजच्या आयुष्यात बऱ्याचदा उपयोगाचं ठरतं पण स्पष्ट विषयाला धरून बोलणं म्हणजे दुसऱ्याला दुखावणं नव्हे. आताच जग स्पर्धेचं आहे म्हणून स्वत:चं मत आग्रहाने मांडलं नाही तर लोक मान्य करत नाहीत, शिवाय माणसं वेगवेगळ्या स्वभावाची असतात. पण हे करतांना आपण दुसऱ्याला दुखावणारी भाषा वापरायची नाही. आग्रही माणसं नम्र पण खंबीर भाषा वापरतात तर आक्रमक माणसं गर्विष्ठ असतात, आणि उद्धटपणे बोलतात. आपण कोणत्या प्रकारात बसायचं ते आपण ठरवायचं. आपलं मत गोड शब्दात मांडलं पण खंबीरपणे, तर ते लोकांना पटतं शिवाय आपल्यावर ते लादलं जात नाही. आणि आपण आपल्यासाठी जे योग्य आणि चांगलं आहे त्याची निवड करू शकतो. याबद्दल इतरांनाही खात्री वाटते. 

 

हे खरं असलं तरी आग्रहीऐवजी आक्रमकतेकडे झुकल्याने कधीकधी अशा स्वभावाच्या व्यक्तींच्याबाबत धोके किंवा तोटे होऊ शकतात. या व्यक्ती आपलं मत स्पष्टपणे मांडण्याच्या नादात जे बोलतात तो इतरांना उद्धटपणाही वाटू शकतो. काही वेळा त्यांचं बोलणंवागणं अतिआत्मविश्वासातून आलेलं आहे असं समजून झुगारलंही जाऊ शकतं. तर कधीकधी चक्क जे बोललं जातं त्याच्या नेमकं प्रतिकूल किंवा उलट सिद्ध होतं. त्यातूनच अशा व्यक्ती लोकांना आगाऊ वाटू शकतात. म्हणून खंबीर आणि आग्रहीपणे वागताना दोघांच्याही गरजा पूर्ण होतील असा प्रयत्न केला तर समोरच्यालाही समाधान मिळेल. त्यातून तुम्हाला आत्मविश्वास तर मिळेलच पण त्याचबरोबर इतरांनाही तुमच्याशी वागता-बोलताना दडपण राहणार नाही. आपलं बोलणं, वागणं, स्वार्थी, मदत न करणारं, उद्धट न वाटता आदरयुक्त असलं तर मित्र, सहकारी, जीवनाच्या जोडीदाराशी संबंध सकारात्मकतेचे होत जातील. 

 

आग्रही व्यक्तिमत्त्व किंवा आग्रही स्वभाव हे सरावानं येणारं कौशल्य आहे. हे येण्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये कोणते बदल करणं आवश्यक आहे याचा विचार करायला हवा. जर काम करताना, दुसऱ्याशी बोलताना, विचार मांडताना, तुम्हाला दडपण जाणवत असेल, निराश वाटत असेल तर स्वत:ला हिंमत करून नाही म्हणायला शिकवा. खंबीरपणे बोलाच. वेळप्रसंगी जवळच्यांची मदत घ्या. सुरुवातीला सोप्या प्रसंगात असे वागायला शिका. ह्याच्यासाठी शांतपणे ऐकून घेणं, नम्र नि उदारपणे वागणं, ‘मी’ या शब्दाचा वाक्यात स्पष्ट उल्लेख करणं, सहजपणे वागणं-बोलणं या गोष्टी अशा आग्रहीपणासाठी उपयुक्त ठरतात. अखेरीस अॅसर्टिव्ह आणि अॅग्रेसिव्ह पर्सनॅलिटीमधला तोल सांभाळायला शिकलो तर खूप समस्या दूर होऊ शकतील. आणि हे लक्षात असू द्या की, Being assertive and standing up for yourself doesn’t mean fighting. It is the right treated with respect.

बातम्या आणखी आहेत...