आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण कसे आहोत बरं?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे सात-आठ प्रकार आपण पाहिले, ते व्यक्तिमत्त्व प्रकार आणि त्यांची गुणवैशिष्ट्यं तपासून पाहताना आपल्या भोवतालच्या माणसांपैकी कोण असं आहे, याचा शोध घेतला, आज आपण कसे आहोत हे तपासून पाहिलं तर नक्कीच रंजक आणि विचार करायला लावणारं असं काही सापडेल. 


हा असा वागतो. ती तशी वागते. जरा रिझनेबल वागलं तर कशाला घरात आपापसात भांडण होतील? अशा प्रकारची वाक्यं बऱ्याच वेळा तक्रारीच्या स्वरूपात ऐकायला येतात. दुसरा कसा वागतो, त्याचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, असं म्हणणाऱ्या आपल्या स्वतःबद्दल आज बोलूया. आतापर्यंत माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे सात-आठ प्रकार आपण पाहिले, ते व्यक्तिमत्त्व प्रकार आणि त्यांची गुणवैशिष्ट्यं तपासून पाहताना आपल्या भोवतालच्या माणसांपैकी कोण असं आहे, याचा शोध घेतला, आज आपण कसे आहोत हे तपासून पाहिलं तर नक्कीच रंजक आणि विचार करायला लावणारं असं काही सापडेल. कृती, वृत्ती आणि वागणं यावरून आपलं व्यक्तिमत्त्व ठरतं. म्हणून
१. मी कसा आहे हे स्वतःलाच विचारा. स्वतःचे वर्णन करा. 
२. मी लहान असताना मला कोणत्या गोष्टींनी आनंद वाटायचा?
३. आता मोठं झाल्यावर मला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो?
४. मला आयुष्यात सगळ्यात मोठी कोणती गोष्ट साध्य करायची आहे?
५. माझे सर्वात मोठे स्वप्न कोणते आहे? 
६. मला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स समजायला मदत करेल. सोळा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी कुठल्या तरी एका विशिष्ट प्रकारात तुम्ही स्वतःला अचूक बसवू शकाल असे नाही पण व्यक्तिमत्त्वाचा भर कोणत्या प्रकाराकडे आहे हे नक्कीच कळेल. आपण त्रयस्थ, आक्रमक, अलिप्त, अंतर्मुख, बहिर्मुख, अस्थिर, भिडस्त, लबाड, ढोंगी, प्रामाणिक यांपैकी कशात बसतो हे ठरवता येतं किंवा या स्वभाववैशिष्ट्यांमधील कोणती वैशिष्ट्यं आपल्यात आहेत याबाबत स्वतः डोकावून पाहता येतं. आपल्यापैकी बहुतेक लोक सकारात्मक असतात; म्हणजेच ते १. प्रामाणिक असतात, स्वतः केलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतात, ही गोष्ट आवडण्यासारखी असते. २. एखाद्या गोष्टीला मान्य करणे, त्याबरोबर अनुकूलता दाखवणे हे व्यक्तिमत्त्व प्रकार असले तर इतरांशी जुळवून घ्यायला मदत होते. ३. मनाचा निश्चय, काम करण्यासाठी मनाचा प्रवास पुढे घेऊन जाणे यातूनही त्यांना आयुष्य जगणं सोपं होतं. ४. दुसऱ्याबद्दलची अनुकंपा, दया वाटणं, दुसऱ्याला समजून घेणं हे व्यक्तिमत्त्व इतरांशी उत्तम नातं जोडू शकतं. ५. संयम हा गुण म्हणून आणि व्यक्तिमत्त्व विशेष म्हणूनही खूप छान असतो. ६. कठीण परिस्थितीतही हिमतीने निर्णय घेणाऱ्या व्यक्ती या सकारात्मक व्यक्ती असतात. ७. प्रामाणिकपणे या व्यक्ती लोकांचा विश्वास जिंकतात.


वर सांगितलेले व्यक्तिमत्त्व विशेष असतील तर तुम्ही सकारात्मक व्यक्तिमत्त्व प्रकाराच्या बऱ्याच जवळ आहात. असं असलं तरी आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही नकारात्मक स्वभाव विशेषही असतात किंवा ते आहेत म्हणून तुमचं सकारात्मक असणं उठून दिसतं. दोन परस्परविरुद्ध व्यक्तिमत्त्वांमुळे हा समतोल साधला जातो, असंही माणसं म्हणतात. शेरेबाजीचा भाग सोडला तरी नकारात्मक व्यक्तिमत्त्व प्रकाराच्या व्यक्तींची वैशिष्ट्य जाणून घेऊन आपण कोणत्या बाजूला झुकतो हे पाहणं रंजक ठरतं. नकारात्मक व्यक्तिमत्त्वाची माणसं कशी असतात?
१. त्यांच्यात जबाबदारी टाळण्याच्या दृष्टीने खोटं बोलण्याची वृत्ती असते, हे खेदाने सांगावं लागतं.
२. अडेलतट्टू आणि स्वार्थी असणारी ही माणसं दुसऱ्यांच्या गरजा भागवल्या जाऊ नयेत यासाठी अडवणूक करत असतात.
३. कामं करायची नसल्याने अनेक कारणं सांगणारे आणि अत्यंत आळशी असे हे लोक त्यांच्या या स्वभावामुळे लोकांपासून दूर फेकले जातात.
४. संतापी स्वभाव आणि कोणाबद्दल सहानुभूती नसल्याने ते लोकांशी जोडले जात नाहीत.
५. काही झालं की लगेच राग येणाऱ्या या व्यक्तींपासून माणसं तोंड फिरवतात. 
६. नकारात्मक व्यक्तिमत्त्व प्रकाराच्या माणसात अप्रामाणिकता, लोकांची पाठ वळली की लगेच त्यांची निंदा करणे, स्वतःच्या फायद्यासाठी इतरांच्या पाठीत खंजीर खुपसणे म्हणजेच विश्वासघात करणं, हा भाग असतो, जो खूप धोकादायक आहे. 


आपल्यात जर ही नकारात्मक व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आढळत असतील तर ती कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायलाच हवेत कारण शेवटी आपलं व्यक्तिमत्त्व दुसरं कोणी नाही तर आपणच घडवत असतो. आपण ज्या कृती करतो आणि निर्णय घेतो ते आपल्या स्वभावानुसारच. आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी तसे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. आपले व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलू शकत नाही हे खरं पण काही जाणीवपूर्वक आणि निश्चयपूर्वक उचललेली पावलं आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू नक्कीच बदलू शकतात आणि आपण समतोल राखू शकतो. या बदलासाठी छंद खूप उपयोगी ठरतात. खेळल्याने संघभावना तर कलेमुळे शांत संयमीपण, कार्यकर्ता म्हणून काम केल्याने मदतीची वृत्ती येऊ शकते. अगदी नुसत्या पुस्तक वाचनानेसुद्धा तुमच्या कल्पनांची क्षितिजे विस्तारतात आणि त्यातून स्वतःला पुढे जाण्यास तुम्ही प्रेरणा देऊ शकता. 


तुमचं व्यक्तिमत्त्व दुसऱ्यांना नक्कीच प्रेरणा देत असतं, त्यांच्यावर परिणाम करत असतं. आपण कसे आहोत हे शोधण्याचा प्रवास खरंच आवश्यक आहे. आपल्यात काय चांगला बदल करता येईल, ते नियोजन करून लिहून काढता येईल. एखादी चुकीची सवय बदलली तरी ती आश्वासक सुरुवात आहे. आपण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाची चिकित्सा करत असताना त्यांच्याकडे बोट दाखवतो पण त्याच वेळेला आपल्याकडे असणारी चार बोटे आपणही स्वतःबद्दल विचार करायला हवा असं सांगत नाहीत का? असं म्हणतात की, आरशात आपलं सुंदर प्रतिबिंब पाहून आपण खूश होत असलो तरी सुंदर दिसण्याने डोळे आकर्षून घेतात, पण व्यक्तिमत्त्व हृदयाला भिडतं.

- स्वाती गानू, पुणे
ganooswati@gmail.com

बातम्या आणखी आहेत...