आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पान खायो सैंया हमारो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणावाराच्या ऐसपैस जेवणाइतकंच मानाचं असतं ते त्या जेवणानंतरचं पान. पूर्वी घराघरातून दिसणारी चंची आणि पानदानं हल्ली फारशी दिसत नसली तरी पानाचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. याच पानाची ही एक आठवण...


“पान खायो सैंया हमारो सावली सुरतिया होंठ लाल लाल” अशी लडिवाळपणे पान खाणाऱ्या आपल्या सैयाचे वर्णन करणारी नायिका आपल्याला आवर्जून पान खाताना आठवतेच. तसेच खई के पान बनारसवाला म्हणत बनारसच्या पानाचं कौतुक करणारा नायकसुद्धा डोळ्यासमोर तरळतो. वेलदोडा आणि जायफळ घातलेली खमंग पुरणाची पोळी साजूक तुपात आकंठ बुडवून खाल्ल्यानंतर एक गोड सुस्ती अंगभर पसरते आणि मग आवर्जूून आठवतो पानाचा विडा. खरं तर साग्रसंगीत जेवणानंतर अगदी टप्प्याने येणारा तेवढाच साग्रसंगीत पदार्थ म्हणजे पान. 


आमच्या शेजारी एक आजी राहायच्या. त्यांच्याजवळ अनेक खण असलेली एक छोटीशी चंची होती, त्या चंचीत पान खाण्याचे सर्व साहित्य असायचे. चुन्याची छोटीशी डबी, कात, सुपारी, वगैरे. निर्विकार चेहरा करून बसलेली आजी दुपारी वा संध्याकाळी बाहेरच्या कट्ट्यावर बसून चंची काढायची, छोट्याशा पानाच्या तुकड्यावर पाहिजे ते साहित्य टाकून  छोटंसं पान गालामध्ये ठेवून सभोवार नजर फिरवत बसायची. जणू काही सारा परिसर ती त्या पानासोबत चघळत असे. आम्ही लहान मुलं अगदी कुतूहलाने निरीक्षण करत असायचो. आजीचं रोजचं पान खाणं बघून त्या चंचीबद्दल एक कमालीचं आकर्षण त्या वेळी माझ्या मनामध्ये निर्माण झालं होतं. मी कित्येकदा आईला म्हणायचे, मी मोठी झाल्यावर  अशी चंची शिवणार, त्यात पान ठेवणार आणि रोज पान खाणार. आजीचं ते छोटंसं पान मोठं गूढ आणि कुतूहलमिश्रित वाटायचं. आमच्या विदर्भामध्ये तर प्रत्येक घरी पानपुडा असतो. घरात येणाऱ्या व्यक्तीसमोर पानपुडा ठेवतातच. ओवा, सुपारी अशा अनेक घटकांनी हा पानपुडा सजलेला असतो. तिथे प्रत्येक घरामध्ये सुपारी कतरण्यासाठी अडकित्ता आवर्जून ठेवतात. असा सरंजाम जवळपास सर्वच घरात असतो.


पण पानाबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटतं की, पान कुठे खावं, कसं खावं, कुणी खावं यावर  प्रतिष्ठा अवलंबलेली दिसून येते. पान खाण्याबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आताही आहेत. पानाचा तोबरा भरून लाल ओठ रंगवून पटकन कुठंही पिचकारी मारणारं पान ओंगळवाणं वाटतं. अशा वेळी हिंदी किंवा मराठी चित्रपटांमधला लाल ओठ केलेला विकृत खलनायक आठवतो. तेच दुपारचं जेवण आटोपून ओसरीतल्या बंगळीवर शांतपणे पान चघळत हळुवार झोका घेणारे प्रौढ गृहस्थ पाहिले की, त्या पानामध्ये एक सौजन्य, सात्त्विकता, घरंदाज बाज दिसतो.  देवीलाही अतिशय सन्मानाने पानांपासून बनवलेला तांबूल ठेवतात. देवीला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्यानंतर जेव्हा तांबूलाचा प्रसाद वाटला जातो तेव्हा तर त्या पानांमध्ये एक दैवी शक्ती व पावित्र्य अनुभवता येते.


पान खाण्यामध्येसुद्धा स्त्री आणि पुरुष असा भेद आजही कसा काय आहे, याबद्दल जरा कोडंच पडलेलं असतं. यावरून माझ्या लहानपणीचा प्रसंग आठवतो. वडिलांचे कुणीतरी मित्र आलेले होते, त्यांच्यासोबत वडील गप्पा करत दाराबाहेर उभे होते. मी नुकतंच घरात पान खाल्लेलं. एकंदरीत तोबराच भरलेला. पान खाऊन अगदी तोऱ्यात मी बाहेर निघाले आणि कुठेतरी फिरून आले. वडिलांनी मला बघितलं पण तेव्हा मला काही बोलले नाही. नंतर मात्र घरी आल्यानंतर मला चांगलंच फैलावर घेतलं. पानाचा तोबरा भरून बाहेर फिरतेस का यावरून. मी गांगरून गेले, नक्की का रागावले हे कळलं नाही. पण काही दिवस पानाची उगाच भीती वाटत राहिली. मी त्या वेळी खूप निष्पाप, अजाण. कितीतरी दिवस ही घटना माझ्या डोक्यातून गेली नाही. नंतर जसं मला कळायला लागलं तसं जाणवलं की, पान खाण्याशी लिंगभेदाचा घनिष्ठ संबंध आहे. एखाद्या स्त्रीने पान खात खात बाहेर फिरणं, ही न पचणारीच गोष्ट हे माझ्या लक्षात आलं. पान खाण्यात रसिकतेचाही प्रश्न असतोच. दिलेलं पान कचाकचा चावून पटकन गिळून टाकणं जरा बटबटीतच वाटतं. पण पान गालात ठेवून त्याचा थोडा थोडा भाग हळुवारपणे  दाताखाली आणून जिभेवर रेंगाळवत नंतर आनंदाने त्याचा रसास्वाद घेणं म्हणजे पानातील रसिकता. दोन मित्र आवर्जून पानाच्या टपरीवर भेटून पान खात मजेशीर गप्पा करताना दिसतील, पण अशी मुभा स्त्रियांना मिळालेली मला तरी आढळली नाही. घराबाहेर पडून पान खाऊन ओठ रंगवलेल्या स्त्रीकडे नकारात्मकतेनच बघितलं जातं. साधं कात, चुना, सुपारी, वेलदोडा, लवंग, बडीशेप असं घरात लावलेल्या सोज्ज्वळ पानाची चव वेगळीच. पण कधीतरी घरच्या पुरुषांनी घरातल्या सर्वांसाठी आणलेले मसाले पानसुद्धा लज्जतदारच. बाळंतीण स्त्रीला आवर्जून रोज साधा घरातला विडा दिला जातो तो त्याच्या औषधी गुणांमुळे. 


मस्त जेवणानंतर किंवा मधुर चहानंतर अशा तलम मुलायम पानाचा रसास्वाद घ्यावाच. याची अनुभूती तंतोतंत  सांगता येणार नाही, ती स्वत:च रसिकतेने अनुभवावी. म्हणून घ्या पान आणि खाऊन बघा पानाची मजा. तुम्हीही  गुणगुणायला लागाल, पान खायो सैंया हमारो...

- स्वाती साखरकर कराळे, सोलापूर
swatinakashtra14@gmail.com

बातम्या आणखी आहेत...