Home | International | Other Country | sweden gothenburg caswagan railway station job

बिनकामाचा कर्मचारी नियुक्त होणार!

वृत्तसंस्था | Update - Mar 09, 2019, 11:48 AM IST

बेरोजगारीच्या या काळात शीर्षक वाचून विचित्र वाटेल. परंतु स्वीडनमध्ये अशा प्रकारची नोकरी देऊ करण्यात आली आहे

 • sweden gothenburg caswagan railway station job

  गोथेनबर्ग - बेरोजगारीच्या या काळात शीर्षक वाचून विचित्र वाटेल. परंतु स्वीडनमध्ये अशा प्रकारची नोकरी देऊ करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यानंतर उमेदवाराला खरोखरच काहीही काम करायचे नाही, अशी मुख्य अट आहे. तुम्ही ड्युटीवर असतानाही काहीही करण्यास स्वतंत्र असाल. पगारही आकर्षक आहे. तोही सुमारे १.६२ लाख रुपये. त्यासाठी उमेदवाराला ड्युटीच्या वेळेत केवळ फ्लोरसेंट दिवे चालू व बंद करावे लागतील.


  स्वीडनच्या गोथेनबर्गच्या कोर्सवॅगन रेल्वे स्थानकावर ही नियुक्ती केली जाणार आहे. २०२५ मध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ड्युटीवर असताना हा कर्मचारी चित्रपट पाहू शकतो किंवा त्याला वाटेल ती गोष्ट करता येईल. ही अनोखी भरती सायमन गोल्डन व जॅकब सेनेबी यांनी करण्याचे जाहीर केले आहे. त्याला या कलाकार द्वयींनी ‘इटर्नल एम्प्लॉयमेंट’ असे नाव दिले आहेत. ही नोकरी मिळवण्यासाठी पात्रता काय ? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर आहे- विशेष कोणतीही नाही.


  जगभरातील लोक या पदासाठी अर्ज करू शकतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती २०२६ मध्ये होईल.
  कारण तोपर्यंत नियोजित रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होईल व प्रत्यक्षात येथे काम सुरू होऊ शकेल. काम नसल्यामुळे नियुक्त कर्मचाऱ्यास कंटाळवाणे वाटू शकेल, असे नियोक्त्यांना वाटते. म्हणूूनच असा कर्मचारी आपल्या प्रतिभेचा वापर इच्छेनुसार करू शकतो. परंतु ही नोकरी अशा उमेदवारासाठी निश्चितपणे शब्दश: आरामाची ठरेल, असा विश्वास हे कलाकार व्यक्त करतात.


  स्थानकाच्या डिझाइनसाठी झाली स्पर्धा, पुरस्कारातून वेतन
  स्वीडनच्या सरकारने गोथेनबर्ग शहरात दोन नवीन रेल्वे स्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सायमन गोल्डन व जॅकब सेनेबी विजेते ठरले होते. सरकारकडून त्यांना ४.५० कोटी (६० लाख स्वीडिश क्रोन) रुपये पुरस्काराच्या स्वरूपात मिळाले होते. या रकमेची गुंतवणूक केल्यास त्यातून मिळणाऱ्या व्याजातून या कर्मचाऱ्याचे वेतन काढता येऊ शकेल, असे त्यांना वाटते. या कर्मचाऱ्याचे त्यातून १२० वर्षांचे वेतन होईल.

Trending