Accident / अहमदाबादच्या अॅम्युझमेंट पार्कमध्ये झुलता पाळणा तुटला; ६० फुटांच्या उंचीवरून ३१ लोक पडले, २ ठार, ४१ जण जखमी

दीड महिन्यात पाळण्याबाबतची ही दुसरी घटना, साबरमती येथे हायड्रॉलिक राइड नादुरुस्त झाल्याने २९ जण २१ मीटरच्या उंचीवर अडकले होते

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 15,2019 09:49:30 AM IST

अहमदाबाद - अहमदाबादमध्ये रविवारी सायंकाळी एका अॅम्युझमेंट पार्कमधील झुलता पाळणा तुटल्याने त्यात बसलेल्या दोन लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत १७ जण जखमी झाले असून त्यापैकी १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. पाळण्याचा मुख्य शाफ्ट मध्यभागी तुटल्याने त्यात बसलेले ३१ जण सुमारे ६० फूट उंचीवरून खाली पडले. पोलिसांनी पाळण्याच्या संचालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात कांकरिया लेक फ्रंट येथील अॅम्युझमेंट पार्कमध्ये घडला.


डिस्कव्हरी नावाचा हा पाळणा घड्याळाच्या लंबकाप्रमाणे फिरतो. त्यात ३२ लोक बसू शकतात. अहमदाबाद महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी एम. एफ. दस्तूर यांनी सांगितले की, पाळण्याचा मुख्य शाफ्ट कसा तुटला याचे कारण फॉरेन्सिक लॅबच्या चौकशीत कळेल. या भागात पाळणे ऑपरेट करण्यासाठी महापालिकेने खासगी कंत्राटदारांना कंत्राट दिले आहे. पालिका आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल केला जाईल. जबाबदार लोकांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. अहमदाबादमध्ये दीड महिन्यात पाळण्यावर झालेला हा दुसरा अपघात आहे. २ जूनला साबरमती रिव्हर फ्रंट येथील हायड्रॉलिक राइड नादुरुस्त झाल्याने २९ जण सुमारे २१ मीटरच्या उंचीवर अडकले होते.

X
COMMENT