आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड - देगलूर येथील तहसीलदार अरविंद बोळंगे यांना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमाराला वाळूमाफियांनी मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बुधवारी देगलूर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वत्र वाळू माफियांचे थैमान सुरू आहे. अनेक नदी घाटांवर वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. देगलूर येथे बंद करण्यात आलेल्या वाळू घाटावरही अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. तहसीलदार बोळंगे यांना बंद पडलेल्या वाळू घाटावर उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. वाळू घेऊन जाणारा टेम्पो जुन्या पेट्रोल पंपावर उभा असल्याची माहिती मिळाली. रात्री अकराच्या सुमाराला ते अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी निघाले. देगलुरातील जुन्या पेट्रोल पंपाजवळ ते उभे असताना वाळू माफिया सिद्दी बाबा सिद्दी खाजा व शेख अहेमद हे दोघे तेथे पोहोचले. त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांनाही तेथे बोलावून घेतले. त्यानंतर तेथे जमलेल्या लोकांनी बोळंगे यांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. त्यानंतर त्यांना वाहनासह जाळून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तेवढ्यात पोलिस कुमक तेथे पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
दोन जणांना अटक
देगलूर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी शेख अहेमद, सिद्दी बाबा सिद्दी खाजा या दोन जणांना अटक केली. पोलिसांनी वाळू घेऊन जाणारा टेम्पो (क्रमांक एमएच २६ एडी ७६८२) जप्त केला. या घटनेनंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. जिल्ह्यातील गोदावरी नदीसह अनेक नदीघाटावर सध्या अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल व पोलिस प्रशासनाचे या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच वाळू माफियांची हिम्मत वाढत चालली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.