Political / आजपासून पावसाळी अधिवेशन : सहाच नव्हे, सर्वच दीड डझन भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा -धनंजय मुंडेंची मागणी

हे त्यांचे अखेरचे अधिवेशन ठरेल व जनता पुढील निवडणुकीत त्यांना सत्तेपासून दूर करेल

विशेष प्रतिनिधी

Jun 17,2019 09:32:29 AM IST

मुंबई - फडणवीस सरकार आभासी असून जनतेला आभास दाखवून फसवत आहे. हे त्यांचे अखेरचे अधिवेशन ठरेल व जनता पुढील निवडणुकीत त्यांना सत्तेपासून दूर करेल, अशी टीका विरोधी पक्षनेत्यांनी केली. केवळ ६ मंत्र्यांवर कारवाई करून चालणार नाही तर अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. भ्रष्टाचार व अकार्यक्षमतेमुळे ६ मंत्री वगळण्यात आले आहेत. परंतु केवळ ६ मंत्र्यांना वगळून चालणार नाही तर भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकायला हवे. प्रकाश मेहतांसारख्या १२०० कोटी रुपयांचा एफएसआय घोटाळा केलेल्या मंत्र्याला केवळ वगळून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी २५ हजार रुपये द्या : मुंडे
धनंजय मुंडे म्हणाले, ५ वर्षांत कसलाही विकास झाला नसून या सरकारने केवळ विकासाचा आभास निर्माण केला. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्र्यांनी एसी केबिनमध्ये बसून दुष्काळाचा आढावा घेतला, तर शिवसेना पक्षप्रमुखांनी विदेशी दौऱ्यावर सुट्टी घालवली. दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणी व पूर्वमशागतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत, सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आल्याने बेरोजगार तरुणांना भत्ता दिला पाहिजे, अशी मागणीही मुंडे यांनी या वेळी केली.

कर्जावर १२ ते १३ टक्के व्याज घेऊन लूट : पवार
राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळालीच नाही, उलट १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारून त्यांची लूटमार सुरू आहे. आघाडी सरकारने ० ते २ टक्के दराने पीक कर्जपुरवठा केला. परंतु सध्या दुष्काळामुळे कर्ज फेडणे शक्य न झालेल्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे आवश्यक होते. कर्जमाफी मिळाली नाही तरी ० ते २ टक्के व्याज हा त्यांचा हक्क होता. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या पुनर्गठित कर्जावर १२ ते १३ टक्के दराने व्याज आकारत आहे. यातून आत्महत्या वाढण्याची भीती असून त्याचे पापही याच सरकारचे असेल.

बहुमतात असूनही भाजप फोडाफोडी करतेय : पवार
भाजप सरकारला लोकसभेला बहुमत मिळूनही अन्य पक्षातील नेत्यांची गरज का भासते, असा प्रश्न अजित पवारांनी केला. विरोधी पक्षनेत्यांना सरकार फोडते व मंत्री बनवते. कुठल्या रस्त्याने राजकारण चाललेय? नेत्यांनी पक्षावर निष्ठा ठेवावी. संस्थांची चौकशी होऊ नये म्हणून ते सत्तेत सहभागी होतात, असा टोलाही त्यांनी विखे पाटील यांचे नाव न घेता लगावला.

X
COMMENT