आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- भाजपच्या एका आमदाराने काल तारे तोडले, ही हीन वृत्तीची माणसे आहेत. मग ते परिचारक, छिंदम असोत वा काल तारे तोडलेले राम कदम असोत, माता-भगिनींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. एवढेच नव्हे तर यापुढे कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देता कामा नये. आपण राजकारण जर साफ करणार नसू आणि कोणाही वाल्यांना घेऊन वाल्मीकी करणार असू तर आपण त्या वाल्मीकी ऋषींचा अपमान करीत आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या वतीने रंगशारदा येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षांतर्गत आढावा घेण्यात आला. राज्यात शिवसेनेची स्थिती काय आहे, जनतेचे मत काय आहे, आपण स्वबळावर लढताना काय अडचणी येऊ शकतात, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांना म्हणाले, भाजपने वाल्याचा वाल्मीकी करून जे नवीन रामायण रचण्याचे ठरवले आहे. त्यावरून भाजपने “बेटी भगाओ’ मोहीम सुरू केली आहे की काय, असे वाटत आहे. भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून राम कदम यांच्यावर योग्य कारवाई करावी. शहरी नक्षलवादाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, दहशतवाद्यांना धर्म नसतो, मग तुम्ही शहरी नक्सलवाद, हिंदू अतिरेकी असे शब्दप्रयोग कसे करता? खरे पुरावे सादर करा. हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदूंना असे प्रकार करावे लागत असतील तर ते दुर्दैवी असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
महामंडळांसाठी दीड वर्षापूर्वीच यादी दिली
सत्ता साेडण्याच्या गोष्टी करीत असताना महामंडळे कशी स्वीकारली, असे विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, दीड-दोन वर्षांपूर्वी यादी दिली होती. आता आम्हाला काहीही नको. अाघाडीच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली होती तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर कधी पडणार, असा प्रश्न केला नव्हता. आम्ही सत्तेत राहून जनतेच्या भल्यासाठी विरोधी पक्षापेक्षा जास्त कणखर भूमिका मांडत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
हार्दिकने उपोषण सोडावे
ठाकरे म्हणाले, ‘गुजरातमध्येही आरक्षणाचा मुद्दा आहे. हार्दिकने पटेलने समाजाच्या आरक्षणासाठी १२ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मी त्याला फोन करून सांगितले की, तू लढवय्या आहेस, उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांच्यासमोर उपोषण करतो त्यांना संवेदना असली पाहिजे, उपोषण सोड. तू बाळासाहेबांना आदर्श मानतोस, बाळासाहेबांचा अशा उपोषणावर विश्वास नाही त्यामुळे तू उपोषण मागे घे. समाजाला तुझी गरज आहे,’ हे सांगतानाच पाकिस्तानबद्दल बोलण्यापेक्षा तरुणांशी संवाद साधून प्रश्न सोडवा’, असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.