आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा, धनगर आरक्षण आंदाेलनातील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे, नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडविरोधात झालेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवरील गुन्हेही मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता मराठा, धनगर आरक्षण, कोरेगाव भीमा आणि नेवाळी कल्याण येथील भूमिपुत्रांवरील आंदोलनादरम्यानचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. ‘मराठा आंदोलनातील बहुतांश मोर्चे हे शांततापूर्ण पद्धतीने पार पडले. मात्र, शेवटच्या टप्प्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले, जे घडायला नको होते. हिंसक आंदोलनामुळे आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले. परंतु आंदोलनकर्त्यांनी समाजाच्या हितासाठी आंदोलन केले होते, वैयक्तिक अजेंड्यासाठी नव्हते. त्यामुळे सरकारने दाखल केलेले सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत,’ अशी मागणी राजेंनी केली.नसीम खान यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आणि कोरेगाव भीमा आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे. मंत्री नितीन राऊत यांनीही कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे. भाजप सरकारने हेतुपुरस्सर गुन्हे नोंदवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनीही ठाकरे यांना पत्र पाठवून ज्याप्रमाणे आरे कारशेडसाठी आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले तसेच नेवाळी, कल्याण येथे मालकीची जमीन परत घेण्यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हेही मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे.बातम्या आणखी आहेत...