Home | Reviews | Movie Review | Take care, good night movie review

Movie review: वेब 'जाळ्या'चे नागडे सत्य- ‘टेक केअर गुड नाईट’

चंद्रकांत शिंदे | Update - Aug 30, 2018, 06:36 PM IST

वेबजाळ्याच्या क्षेत्रात जवळ-जवळ प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन शोध लागत असतात.

 • Take care, good night movie review
  क्रिटिक रेटिंग 3
  स्टार कास्ट सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर, संस्कृती बालगुडे, जयवंत वाडकर
  लेखक/दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी
  प्रोड्यूसर हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर
  जोनर क्राइम ड्रामा

  एन्टटेन्मेंट डेस्क: वेबजाळ्याच्या क्षेत्रात जवळ-जवळ प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन शोध लागत असतात. माणसाचे आयुष्य सुलभ आणि सुखद व्हावे, कामे पटापट व्हावीत यासाठी शोध लावले जातात. यातूनच आधुनिक स्मार्ट फोन, आर्टिफिशियल इंटेलिजंटची निर्मिती झाली. आता तर गुगल होम आणि अमेझॉन इको घराघराची शोभा वाढवत आहेत. या उपकरणांना आदेश दिल्यास घराची लाईट लावण्यापासून ओव्हन सुरु करण्यापर्यंत आणि आवडते गाणे लावण्यापासून ते आवडता चित्रपट सुरु करण्यापर्यंतच सगळी कामे ही उपकरणे करतात. स्मार्टफोनमुळे तर बँकेचे व्यवहार आणि ऑनलाईन खरेदी खूपच सोपी झाली आहे. परंतु जसे नवीन तंत्रज्ञान येते तसाच त्याचा गैरवापर करणा-यांचीही संख्या वाढते. त्यातूनच मग क्रेडिट कार्डचे फ्रॉड होतात आणि अनेकांना लाखो रुपयांचा चूना लागतो.

  ऑनलाईन फ्रॉड ही आजच्या काळातील सगळ्यात मोठी समस्या आहे. याबाबत पोलीस जागरुक राहाण्याचे आवाहन करतात, बँकेचा, मोबाईलचा पासवर्ड कोणाला देऊ नका असे सांगतात परंतु त्याचा अजूनही काहीही उपयोग होताना दिसत नाही. आणि हीच बाब लक्षात घेऊन टीसीजीएन (टेक केअर गुड नाईट) हे आजच्या तरुण पिढीच्या मोबाईल भाषेतील शब्द घेतलेल्या चित्रपटात अत्यंत टोकदारपणे दाखवलेले आहे .

  कंपनीत आलेले नवीन तंत्रज्ञान शिकण्याऐवजी व्हीआरएस घेणारा अविनाश (सचिन खेडेकर) आणि त्याची पत्नी आसावरी (इरावती हर्षे) यांची ही कथा. व्हीआरएसमधून आलेल्या पैशांची योग्यरित्या गुंतवणूक करण्याची योजना आखतात. परदेशात असलेल्या मुलाचे समीरचे (अभय महाजन) शिक्षण आणि मुलगी सानिका (पर्ण पेठे) हिचे शिक्षण आणि लग्न या पैशातून करण्याची या जोडप्याची इच्छा असते. व्हीआरएसमधून मिळालेल्या पैशातून अनेक वर्ष जपलेले यूरोप फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १५ दिवस यूरोपला जातात. यूरोपवरून परत आल्यावर त्यांना समजते की, त्यांच्या खात्यातील ५० लाख रुपये परदेशातील खात्यांमध्ये वळवण्यात आलेले आहेत. हे ऐकताच दोघांच्याही पायाखालील वाळू सरकते. या पैसे अपहाराचा धक्का बसला असतानाच आणखी एक बॉम्ब या कुटुंबावर पडतो आणि संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त होते. मुलगी सानिकाचे नको त्या अवस्थेतील व्हीडियो इंटरनेटवर अपलोड होतात.

  हताश झालेला अविनाश सायबर क्राईमकडे तक्रार करतो आणि नंतर मुलगी सानिका आणि पत्नीच्या मदतीने काही माहिती गोळा करून इन्स्पेक्टर पवार (महेश मांजरेकर)ला देतो आणि शेवटी सायबर गुन्हेगार पकडला जातो. हा संपूर्ण प्रवास म्हणजेच टीसीजीएन.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

 • Take care, good night movie review

  आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड आपण किती सहजपणे दुस-यांच्या हातात देतो ते या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले आहे. यासोबतच मुलांशी कसे वागावे, त्यांना कितपत स्वातंत्र्य द्यावे, त्यांना कितपत धाकात ठेवावे त्यावरही हा चित्रपट भाष्य करतो परंतु निर्णय पालकांनी स्वतःच घ्यावा असे सूतोवाचही हा चित्रपट करतो.

   

   

 • Take care, good night movie review

  सचिन खेडेकर, इरावती हर्षे आणि पर्ण पेठेने खूपच चांगले काम केले आहे. महेश मांजरेकरने पवार इन्स्पेक्टरचे बेअरिंग छान पकडलेले आहे. जयंत वाडकरने हवालदारची छोटीशी भूमिका लक्षात राहील अशी साकारली आहे. तर सायबर क्रिमिनल म्हणून आदिनाथ कोठारेने चांगले काम केले आहे. विद्याधर जोशीने अविनाशच्या मित्राची मोहनची भूमिका साकारली आहे.

  लेखक-दिग्दर्शक गिरीश जयंत जोशीने चित्रपटाचे दिग्दर्शन उत्कृष्ट म्हणता येणार नाही परंतु चांगले केले आहे. काही ठिकाणी संवादांचीच रचना जास्त केली आहे असे वाटते. अत्यंत छोटा जीव असलेले हे कथानक म्हणावे तसे फुलवता आलेले नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. मात्र आज फसवुकीच्या ज्या घटना घडत आहेत त्या हा चित्रपट पाहून काही प्रमाणात तरी कमी होतील अशी अपेक्षा आहे. चित्रपट पाहताना छोट्या पडद्यावरील क्राईम पेट्रोल या मालिकेची सतत आठवण येत राहते. हेच दिग्दर्शकाचे अपयश म्हणावे लागेल.

   

  एकंदरीत चित्रपट एकदा पाहाण्यास हरकत नाही.

Trending