तेलंगणा / काँग्रेसकडून पैसे घ्या, पण मतदान मलाच करा! एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे वादग्रस्त विधान

तेलंगणातील स्थानिक निवडणुकींच्या सभेत म्हणाले- काँग्रेस, भाजप एकच

वृत्तसंस्था

Jan 14,2020 11:48:00 AM IST

संगारेड्डी - पैसे काँग्रेसकडून घ्या पण मतदान माझ्याच पक्षाला करा असे वादग्रस्त विधान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. तेलंगणातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी संगारेड्डी येथे त्यांची सभा झाली. याच सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यासोबतच, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोप करताना त्यांनी या पक्षांना मतदान करू नका असे आवाहन केले आहे.


संघ भाजपच्या डोक्यात तर काँग्रेसच्या मनात -ओवैसी

"काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये काहीच फरक नाही. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस नेहमीच धर्मनिरपक्षतेवर बोलत असते. परंतु, त्यांचे डोके, मन आणि जीभ एका सूरमध्ये नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या डोक्यात आहे, तर काँग्रेसच्या मनात आहे. जे मनात असते तेच डोक्यात आणि जीभेवर येत असते." ओवैसी पुढे म्हणाले. "22 जानेवारी रोजी महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यामध्ये काँग्रेसच्या लोकांकडे खूप पैसा आहे. त्यांच्याकडून पैसे घ्या. तुम्ही हे माझ्यामुळेच घेत आहात. त्यामुळे, मतदान मात्र मलाच करा. ते पैसे देत असतील तर घ्या. ते जे काही देत असतील ते सगळेच घ्या. मी तर म्हणतो, काँग्रेसने दर वाढवायला हवेत. 2000 रुपये हा काही माझा रेट होऊ शकत नाही. मी त्यापेक्षा जास्त पैशांच्या लायकीचा आहे." असे ओवैसी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले आहे. या निवडणुकीसाठीचे निकाल 25 जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहेत.

X
COMMENT