आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्माबद्दल जाहीरपणे सवाल, जवाब हाेऊ द्या; स्वामी अग्निवेश यांचे मोहन भागवत यांना जाहीर अाव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘हिंदू धर्मातल्या कुप्रथा दूर करण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी मी संन्यासी झालो. तेव्हापासून हिंदू समाजाची सेवा करत आहे. वेद-उपनिषदांचाच आधार घेऊन बोलत आहे. तरी मी हिंदूविरोधी कसा ठरतो? हिंदू धर्माचे मूल्य काय या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी माझ्याशी जाहीर वादविवाद करावा,’ असे आव्हान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी पुण्यातील कार्यक्रमातून दिले.  


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने ‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषद’  पुण्यात सुरू झाली. या वेळी अग्निवेश बोलत होते. ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बागवे, सचिव मिलिंद देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. अग्निवेश यांच्यावर यापूर्वी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिषदेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ‘हिंदू धर्म मानवतावादी आहे की हिंसेचे समर्थन करणारा आहे, याबद्दल समोरासमोर येऊन सवाल-जवाब होऊ द्या. मी प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या. तुम्ही प्रश्न विचारा मी उत्तर देतो. मोहन भागवतांनी शिकागोत भाषण करण्याऐवजी पुण्यात येऊन वादविवाद करावा,’ असे अग्निवेश म्हणाले. 


देशात दहशतवादाचे वातावरण आहे. लोक भयग्रस्त झाले आहेत. ज्यांना सत्ता दिली तेच द्वेष पसरवत आहेत. सरकारच्या धोरणांची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी घाबरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘माणसाला माणसाचा दर्जा न देणाऱ्या धर्माला ‘धर्म’ म्हणता येत नाही. धर्म आपसात फूट पाडत नाही. या देशाला संवादाची परंपरा आहे. मात्र समोरासमोर बसून संवाद करण्याऐवजी त्या लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली. प्रश्न विचारण्याची ताकद हवी. मतभेद असायला हवेत पण वादविवादही करता यायला हवेत. हिंसेचे राजकारण करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यावे’, असे आवाहनही अग्निवेश यांनी केले. 

 

मानव धर्म हाच खरा हिंदू धर्म  
‘वेदांमध्ये मनुष्य धर्म हाच खरा हिंदू धर्म आहे. मात्र त्याला काही जण हिंसक वळण देत आहेत. अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्यानंतरही माझ्यावर हल्ला झाला. दहशतवादाचे हे नवे रूप आहे. यामागे कोण होते हे आपण ओळखले पाहिजे. त्यांच्या विरोधात वैचारिक आंदोलन केले पाहिजे. या लढाईत सगळे एकत्र आलो नाही तर सत्ताधारी एकेकाला संपवतील,’ असे स्वामी अग्निवेश म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...