आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्ती के खतरे उठायें जा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळचं अ. भा. मराठी साहित्यसंमेलन प्रथेप्रमाणे "यथासांग' पार पडलं आणि जणू वावगं काही घडलंच नाही, अशा थाटात साहित्यिकांपासून राजकारणाऱ्यांपर्यंत सारे आपापल्या दिशेला पांगले. परंतु, आयोजकांनी राजकीय दबावातून संमेलनाच्या नियोजित उद्घाटक लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण परत घेऊन केलेल्या अवमानाची सल महाराष्ट्रातल्या सजग वर्गाला लागून राहिली होती.खुद्द सहगल यांच्या उपस्थितीत मुंबईत भरलेल्या निषेध-नाट्यरुपी एकीत ती सल जोरकसपणे व्यक्त झाली.  अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोका पत्करून पुरोगामी महाराष्ट्राची इभ्रत राखणारा हा निर्विघ्न मेळा सत्तेच्या उदारतेचा पुरावा खचितच नव्हता, योजनाबद्ध मुस्कटदाबीला दिलेलं धारदार उत्तर मात्र नक्कीच होतं...

 

वुई मस्ट ऑलवेज टेक साइड्स
न्युट्रॅलिटी हेल्पस् दी ऑप्रेसर
नेव्हर दी व्हिक्टिम...
सायलेन्स एन्करेजेस टॉरमेण्टर
नेव्हर दी टोरमेण्टेड...


नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन-ज्युईश राजकीय भाष्यकार, तत्वज्ञ एलिझर वायझेल यांचं हे वाक्य. याचा साधा अर्थ-आपण नेहमी बाजू घेतली पाहिजे. कारण, निष्पक्षपात शोषणकर्त्यांच्या उपयोगी ठरतो, बळी ठरलेल्यांच्या नव्हे. मौन बाळगणे शोषकांना बळ देते, शोषितांना नव्हे... वायझेलना अपेक्षित मुद्दा, अन्यायाविरोधात निर्भय होऊन उभं ठाकण्याचा पर्यायाने, अभि‌व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार बजावण्याचा आहे. त्यात कसलाही आडपडदा नाही. "अब अभिव्यक्ति के सारे खतरे उठाने ही होंगे, तोड़ने ही होंगे मठ-गढ़ सब' असं म्हणणारे गजानन माधव मुक्तिबोध, "एक आदमी रोटी बेलता है ,एक आदमी रोटी खाता है ,एक तीसरा आदमी भी है, जो न रोटी बेलता है, न रोटी खाता है वह सिर्फ़ रोटी से खेलता है, मैं पूछता हूँ यह तिसरा आदमी कौन है? असा सवाल विचारणारे धुमिल किंवा "मैंने कहा कि आप फासिस्ट हैं, तो उसने कहा की वह शाकाहरी हैं...'असं टोकदारपणे हुकूमशाही व्यवस्थेचं लक्षण सांगणारे देवीप्रसाद मिश्र हे सगळेच एकच भाषा बोलत आलेेत, अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची!


हे काय आहे, प्रतिसंमेलन? सेलिब्रेशन? नव्हे, हे रिअल टाइम निषेधनाट्य आहे.सत्तेपुढे मिंधे नसलेल्या समविचारी लेखक-कवी-कलावंत-प्राध्यापक, शिक्षक-कार्यकर्ता, बिनचेहऱ्याचे वाचक अशा साऱ्यांनी  उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन रचलेलं. या निषेधनाट्याचं नाव-"चला, एकत्र येऊ या'. निषेध कुणाचा? अर्थातच अभिव्यक्तीची मुस्कटदाबी करणाऱ्या आणि अभिव्यक्तीसाठी प्राण धोक्यात घालणाऱ्यांना सुरक्षेच्या नावाखाली जेरबंद करणाऱ्या विद्यमान सत्ताधीशांचा. इथे कुणी अध्यक्ष नाही, स्वागताध्यक्ष नाही, शंभर- दोनशे किलोंचे अजगरी हार-तुरे नाहीत की फुकाचे मानपान नाहीत.  श्रोत्यांमध्ये कोणकोण? आजारपणातून सावरलेले ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ लेखक-प्रकाशक रामदास भटकळ, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी, शफाअत खान, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, कवी गणेश विसपुते "दी वायर'चे संस्थापक-संपादक सिद्धार्थ वरदराजन, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,आणि बरेच. पण त्यात विद्यमान अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे दिसत नाहीत?
रीतसर तिसरी घंटा होते. मिट्ट काळोख भेदत मुंबईतल्या दादर, शिवाजी मंदिरचा रंगमच हलकेच प्रकाशमान होतो, तेव्हा बॅकग्राउंडला क्रांतीरंगातल्या फलकावर मानवी चेहरा, एक बाजूचा डोळा आणि दुसऱ्या बाजूचे ओठ झाकलेला आणि बाजूला "चला,एकत्र येऊ या' - असे जोरकस अक्षरांचे फटकारे. मंचावरचा सारा अवकाश मोकळा, फक्त उजव्या अंगाला तिरप्या प्रकाशरेषेत उजळून निघालेली एक रिकामी खुर्ची. ही रिकामी खुर्ची कुणाची? अर्थातच नयनतारा सहगलांची. यवतमाळच्या साहित्य संमेलनात अपेक्षित असूनही मांडली न गेलेली, म्हणूनच कुणाच्या नजरेसही न पडलेली. ती इथे बंडखोरीचं प्रतीक होऊन अवतरते. घडून गेलेल्या आणि नव्याने घडणाऱ्या नाट्याची जाणीव करून देते. एखाद्या जीवंत व्यक्तिरेखेसारखी. तेवढ्यात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांची चित्तो जेथा भयशून्यो... उच्छो जेथा शिर... ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुकारा करणारी बंगाली कविता वातावरण कापत श्रोत्यांच्या काना-मनांत शिरते. पाठोपाठ दक्षिणेतला संदेश घेऊन टी.एम. कृष्णा रंगमंचावर अवतरतात. हा आजच्या काळातला कर्नाटक संगीतातला आघाडीचा गायक आणि बंडखोर संगीत सुधारकही. तो संगीतातल्या ब्राम्हणी वर्चस्वाला आव्हान देत आहेच, पण संगीतावर दुष्प्रभाव राखून असलेल्या राजकीय-सामाजिक आणि धर्म व्यवस्थेलाही शिंगावरही घेतो आहे. त्याचा आग्रह एकच- संगीत परंपरेची कठोर चिकित्सा होऊ द्या. विरोध-विकासात्मक वैचारिक द्वंद्व घडू द्या.


कृष्णा यांचं इथे असणं हेसुद्धा प्रतिकात्मकच. दीडेक महिन्यांपूर्वी ‘एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया’ने हिंदुत्ववाद्यांच्या भीतीने दिल्लीतला त्यांचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द केलेला. पॅटर्न सेम... प्रस्थापित सत्तेविरोधात कृष्णा आवाज उठवतात, म्हणून सत्तासमर्थक देशभक्तांनी सरकारच्या ताब्यात असलेल्या आयोजकांना धमक्या दिल्या. सत्तेच्या हाती नाड्या असलेल्या आयोजकांनी मुकाट माघार घेतली. मग केजरीवालांच्या दिल्ली सरकारने धाडसाने, त्याच दि‌वशी कार्यक्रम आयोजित केला. कृष्णा त्यात देहभान हरपून गायले. तामीळमध्ये, हिंदीत अगदी विठ्ठलाचा मराठी अभंगही त्यांनी दिल्लीकरांना त्यादिवशी ऐकवला. इथेसुद्धा कृष्णा यांनी बडेजाव न आणता आधी बसवण्णा, मग तामिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांची मदुरो बागान ही कविता आणि सरतेशवटी सुब्रमण्यम भारती यांची अभिव्यक्तीचा जयघोष करणारी संगीतरचना गावून वातावरण भारून टाकले. सांगणे एकच. फार पूर्वी बसवण्णांनी सर्वधर्मसमभावाचा संस्कार पेरला, भारती आणि आताच्या मुरुगन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज बुलंद केला. आता वेळ आपली आहे!


सजग नि संवेदनशील कवी-लेखक-अभिनेता, आपण सत्तेचं नव्हे समाजाचं देणं लागतो, या भावनेनं सार्वजनिक सभा-संमेलनांत आवर्जून उपस्थिती नोंदवणाऱ्या किशोर कदमांनी निषेधनाट्याची सूत्रं हाती घेताना आवाजातल्या अचूक चढ-उतारांसह धुमिलांसह अनेक कवींच्या कविता जीवंत केल्या, हारतुऱ्यांचा आणि पाल्हाळिक स्तुतीवंदनेचा प्रश्नच नसल्याने टाळ्यांचा कडकडाटात वयाची नव्वदी ओलांडलेल्या नयनतारा सहगल,गणेश देवींसह आस्तेकदम रंगमंचावर आल्या. त्यांना सोबत केली, तोवर कार्यकर्त्याच्या रुपात एकदोनदा रंगमंचावर येऊन गेलेल्या दिग्दर्शक-नट अतुल पेठे यांनी. याच रुपात आधी प्रतिथयश नट-दिग्दर्शक अमोल पालेकरही दिसले, नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे, आणि नाट्यसंघटक अशोक मुळ्येसुद्धा दिसले. पडद्यामागे असेच कष्ट संध्या गोखले, माधव पळशीकर, "मुक्त शब्द'चे येशू पाटील अशा कितीतरी जणांनी उपसले. श्रोत्यांनी गच्च भरलेल्या नाट्यगृहात डॉ. देवींनी धीरगंभीर आवाजात सहगल यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. म्हणाले, दुर्धर आजार असूनही हजार मैल पार करून एकटीनेच कुणाच्याही आधाराविना सहगल इथवर आल्यात. आम्हाला नवी आशा मिळाली. हाच आशेचा धागा पकडत वयाच्या नव्वदीत असलेल्या या विदुषीने नमश्कार-आदाब करत, आधी पुरोगामी राज्याचे आभार मानले आणि मग "जय महाराष्ट्र'असा नारा दिला. अर्थातच त्याला दुराभिमानाचा दर्प नव्हता, तर कृतज्ञतेचा गंध होता. म्हणाल्या, हे कुठेच घडलं नाही. माझं न झालेलं भाषण किती ठिकाणी महाराष्ट्रात, भारतात, भारताबाहेर पोहोचलं, वाचलं गेलं. बहोत बहोत शुक्रिया...मग स्वातंत्र्याचा अर्थ सांगत, खंतावल्या सुरात सिनेसृष्टीतल्या कागदी ताऱ्यांना सवाल करत्या झाल्या.  डेहराडून में बैठे मैंने नसिरुद्दीन शाह कि दुखी आवाज सुनी, लेकिन यहाँ के बडे फिल्म स्टार्स को  क्यों सुनाई नही दी? त्यांचा सवाल थेट होता. टोकदार होता. यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या, आणि त्याचमुळे असुरक्षिततेच्या भयाने पछाडलेल्या बड्या सुपरस्टार मंडळींच्या सत्ताशरणेवर बोट ठेवणारा होता. काहीच मिनिटे, पण सहगल खूप पोटतिडिकीने बोलल्या आणि श्रोत्यांचे अभिवादन स्वीकारत निरोप घेत्या झाल्या.


या निषेध नाट्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे प्रकृती अस्वास्थामुळे व्हिलचेअरमध्ये बसूनच विचारमंचावर आल्या. त्यांना सोबत केली, अमोल पालेकरांनी. भावेंनी व्हिलचेअरवरूनच मनोगत व्यक्त केलं. म्हणाल्या, ही नयनतारांप्रती महाराष्ट्राच्या वतीने केली गेलेली क्षमायाचना आहे. नेमकं आणि खरंच होतं ते. प्रत्येकाच्याच मनात तेव्हा एकच प्रश्न उसळी मारून वर आला. आजारी अवस्थेत जर सहगल, नेमाडे, पुष्पा भावे हे दिग्गज इथवर आले, मग डॉ. ढेरे इथे का नाहीत? अमोल पालेकर म्हणाले, यवतमाळमध्ये जुळून न आलेला योग आम्हाला इथे साधायचा होता, आम्ही डॉ. ढेरेंना आमंत्रणही दिलं होतं, पण कार्यबाहुल्यामुळे जमत नसल्याचं त्या म्हणाल्या. खरंच असेल का तसं? मग किमान संदेश पाठवता आला नसता त्यांना? की संमेलनाध्यक्षपदाच्या बेडीने पाय जडावले असतील त्यांचे? सत्ता मग ती साहित्यातली का असेना, पद देताना निषेधाची सूरपट्टी जप्त करून घेते का,आपल्या गळ्यातली?


 ज्येष्ठ नाट्यलेखक, कथाकार  समीक्षक जयंत पवार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते. त्यांच्या आजवरच्या लेखनातून-भाषणांतून त्याचा अनुभव महाराष्ट्राने घेतलेला. त्यांची इथली उपस्थिती नारा अधिक बुलंद करणारी ठरली. त्यांच्या लिखित भाषणाचं अतुल पेठेंनी अत्यंत असोशीने वाचन केलं. तत्पूर्वी पवारांनी नयनतारा सहगल यांच्या आमंत्रणवापसीला कारण ठरलेल्या उन्मादी शक्तींविरोधात सहेतूक निष्क्रिय राहिलेल्या, डॉ. आनंद तेलतुंबडेंसारख्या बुद्धिवादी लेखकावर शहरी नक्षल असा शिक्का मारणाऱ्या आणि लेखक-कलावंतांवर पोलीस संरक्षणात राहण्याची पाळी आणणाऱ्या राज्य सरकारचा तीव्र आणि स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला. स्रोत आणि साधनं, संस्था आणि संघटना यांवरचे  वर्चस्व हे सत्तेच्या राजकारणात उतरलेल्या पक्षांचे एकमात्र ध्येय असते. ते वर्चस्व जाईल या असुरक्षिततेतून तत्कालिन युपीए सरकारने डॉ. विनायक सेन यांसारख्या बुद्धिवादी कार्यकर्त्यास तरुंगात डांबलं.  विद्यमान सरकारही निवडणुकांच्या विद्यार्थी नेत्यापांसून ज्येष्ठ बुद्धिवंतांपर्यंतचे विरोधी आवाज सूत्रबद्धरित्या रोखू पाहतंय, या खुपणाऱ्या वास्तवाकडे त्यांनी लक्षही वेधलं. शत्रू संसदेत नाही, मंत्रालयात नाही, तो आपल्या जवळ, खुर्चीत किंवा तो आपल्या आतच आहे, असं म्हणून त्यांनी उपस्थितांमधल्या प्रत्येकाला झडझडूनही काढलं. जबाबदारीचं भानही दिलंं.  याच एकीच्या मेळ्यात सिद्धार्थ वरदराजन यांनी "दी वायर' वेबपोर्टलच्या मराठी आवृत्तीची घोषणा केली.  प्रस्थापित सत्ता प्रश्न विचारण्यांना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवत असल्याच्या वास्तवाकडे लक्ष वेधून भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर आणणाऱ्या "दी वायर'विरोधात   सत्तासमर्थक व्यावसायिकांनी आजवर ११ हजार ४६० कोटींचे दावे न्यायालयात दाखल  केल्याचं त्यांनी सांगितलं तेव्हा, सत्ताधाऱ्यांचं सटपटलेपण तेवढं उपस्थितांपुढे आलं.  
निषेधनाट्याचं हे अखेरचं सत्र. विचारमंचावर लेखिका-प्राध्यापिका समीना दलवाई, पोलीस संरक्षणात वावरणारे लेखक प्रवीण दशरथ बांदेकर,  कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार, दिग्दर्शक-अभिनेते अमोल पालेकर, गायक-संगीतकार टी.एम. कृष्णा आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पत्रकार अलका धुपकर आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नाट्यलेखक सुनील शानभाग.  साहित्य, संगीत, समाज, नाटक-सिनेमा या परिघात  अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेल्या अंतर्गत आणि बाह्य धोक्यांबाबत सारे मान्यवर थेटपणे बोलले. नाव घेऊन बोलले. संताप होता, चीड होती, खंतही होती. त्यातल्या बांदेकरांना प्रश्न विचारला गेला, तुम्हाला पोलीस संरक्षणात का वावरावं लागतंय? बांदेकर म्हणाले, मला ठावूक नाही. एक दिवस उच्चपदस्थ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश यांचा फोन आला. तुमच्या जीवाला धोका आहे, सांगत त्यांनी पोलीस संरक्षण घ्या असं सांगितलं गेलं. मग कुणी तरी मुद्दा मांडला, सरकारची ही बुद्धिवाद्यांवर पाळत ठेवण्याची नवी पद्धत आहे, त्यावर बांदेकरांच्या पाठीमागे संरक्षणार्थ उभा साध्या वेशातला पोलीसही गालातल्या गालात हसल्यासारखा दिसला. सरकारची चालबाजी तुम्ही बरोब्बर ओळखली, हेच बहुदा त्याला सुचवायचं असावं. आणि बांदेकरांनी ज्यांचा उल्लेख केला ते कृष्णप्रकाश हे तर कला आणि क्रीडा या प्रांतातले बहुमुखी प्रतिभेचे पोलीस अधिकारी. त्यांनी हिंसक झुंडीचा बंदोबस्त करण्यापेक्षा बांदेकरांनाच जेरबंद करावं? दहा-बारा वर्षापूर्वी सांगलीत झालेल्या एका अवचित भेटीच्या वेळी याच कृष्णप्रकाशांनी हरिवंशराय बच्चन यांच्या "मधुशाला' संग्रहातल्या कविता उत्स्फूर्तपणे ऐकवल्याचा सुखद अनुभव माझ्या गाठीशी जमा आहे. असे संवेदनशील मनाचे, लेखक-कलावंतांचे मन जाणणारे कृष्णप्रकाशही  बांदेकरांना संरक्षण घेण्याची विनंती करताना गालातल्या गालात हसले असावेत, बहुदा .


या चर्चेत कलावंतांच्या अभिव्यक्तीचा मुद्दा मांडताना,पालेकरांनी प्री-सेन्सॉरशीपविरोधातल्या त्यांच्या न्यायालयीन लढ्याचा उल्लेख केला.म्हणाले, हिंसक, प्रक्षोभक भाषण करणाऱ्या नेत्यांकडून भाषणाचं स्क्रिप्ट तुम्ही आधीच मागता का, टीव्हीवर चर्चेच्या नावाखाली शाब्दिक हिंसाचार घडवून आणणाऱ्या अर्णब गोस्वामीटाइप लोकांकडून तुम्ही कार्यक्रमाआधी  संहिता मागवता का? याविरोधात प्रेक्षक  का पुढे येत नाही. अभिव्यक्तीची ही लढाई एकट्या अमोल पालेकरांची का राहते, ती अवघ्या समाजाची का होत नाही? या त्यांच्या प्रश्नाने निषेधनाट्याला एक उंची दिली. पुरस्कार वापसीनंतरही बुद्धिवादी लेखक-कलावंत पुढे आले. दक्षिणायन चळवळीने कलावंत आणि समाजाला जोडले, आज त्याचा पुढचा टप्पा पार झाला, असा आशावाद जागवत प्रज्ञा पवारांनी निषेध नाट्याच्या प्रयोगाचा शेवट केला. मग विचारमंचावरच्या मान्यवरांसह सभागृहात उपस्थित प्रत्येकाने कोणत्याही शपथा न घेता किंवा पोकळ प्रतिज्ञा न म्हणता  दमनकारी व्यवस्थेविरोधातल्या एकीचे प्रतीक म्हणून एकमेकांचे हात तेवढे हातात घेतले. एकीच्या वचनाशी असलेली बांधिलकी स्पर्शातून एक-दुसऱ्यापर्यंत पोहोचवली. 


मुंबईतल्या एका सभागृहात एका बाजूला असा हा निषेधाचा सूर उंचावत असताना बाहेरच्या रस्त्यांवरून हजारो भिज्ञ-अनभिज्ञ लोक आपापल्या वंचनेत ऊर फुटेस्तोवर धावत होते. त्यातले काही अधिकारशाही-हुकुमशाही व्यवस्थेतच सुरक्षितता मानणारे असतील, काहींना वृत्ती-प्रवृत्तीने फॅसिस्ट असलेल्या व्यवस्थेच्या दुष्परिणामांची सखोल जाणही असेल.   या धकाधकीत पालेकरांना अपेक्षित अभिव्यक्ती स्वांतत्र्याची लढाई त्यांचीसुद्धा  होईल का? तशी ती व्हावी ही वर्तमानाची मागणी स्पष्टच आहे. तत्पूर्वी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किमान जाणीव आणि प्रत्यक्ष लढ्यात न उतरल्याची खंत प्रत्येकांत  पेरली जाणंही तितकंच महत्वाचं आहे. समकाळात हा परिणाम निदान एका राज्यापुरता जरी साधला गेला तरी ‘चला एकत्र येऊ या’ निमित्ताने झालेल्या उत्स्फूर्त एकीचा हेतू सफल होईल!

 

 

बातम्या आणखी आहेत...