आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे मागून नागरिकांना वेठीस धरणारे मुजाेर तलाठी लांबोळे, पाटील बडतर्फ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शासकीय कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, काम करून देण्यासाठी पैसे मागून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या म्हसावद व मेहरूण येथील दोन मुजोर निलंबित तलाठ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ केले आहे. हेविवेट असलेल्या म्हसावदच्या त्या तत्कालीन तलाठ्याने अनेक कारनामे केेलेले आहेत. आतापर्यंत तो कारवाईतून वाचत होता. लाचखोरी, अपहार व इतर अनेक प्रकरणांमुळे त्याच्यावर कारवाईचा फास आवळला गेला आहे. 


घनश्याम दिगंबर लांबोळे व वैशाली मोतीराम पाटील असे बडतर्फ करण्यात आलेल्या तलाठ्यांची नावे आहेत. दोघांवर यापूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. लांबोळे याने म्हसावद येथे तलाठी असताना कामकाजात सतत अनियमितता व शासकीय कर्तव्य पार पाडण्यात हलगर्जीपणा केलेला आहे. वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान करणे, या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे वर्तन केलेले आहे. वादळी वारा व पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत न दिल्याबाबत वडनगरी येथे तलाठी असताना शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. याबाबत खुलासा मागवूनही लांबोळेने सादर केला नव्हता. त्यामुळे जुलै २०१७ मध्ये एक वेतनवाढ रोखण्यात आली होती. महाभूमी अभिलेख आधुनिकीकरणाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याप्रकरणीही नोटीस बजावण्यात आली होती. पूर्वपरवानगी न घेता कामावर सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे म्हसावद येथे बोंडअळीचे पंचनामे होत नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता. या पार्श्वभूमीवर म्हसावद तलाठी कार्यालयात अपर िजल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या दप्तर तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे आढळून आलेली नव्हती. वैशली पाटील यांच्यावरही दप्तर तपासणी प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. निलंबन काळात त्यांना जामनेर तहसील मुख्यालय देण्यात आले होते. दरम्यान, या कारवाईमुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली अाहे. 


काही वर्षांपूर्वी गैरकृत्य सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये धाड टाकली होती. या धाडीमध्ये तलाठी घनश्याम लांबोळे हा एका युवतीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला होता. त्याला पोलिसांनी युवतीसह ताब्यात घेतले होेते. वाळू तस्करांसोबत तो वाळू व्यवसायात भागीदार होता. तलाठी असताना त्याने कोट्यवधींची अपसंपदा जमवलेली असल्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत त्याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लांबोळे याच्यावरील बडतर्फीच्या कारवाईचे महसूल विभागाचे काही अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. 


महिला तलाठीकडून व्हायची पैशांची मागणी 
वैशाली पाटील यांच्याकडे मेहरूण तलाठीपदाचा कार्यभार असताना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या दप्तर तपासणीत १ ते २६ प्रकारचे दाेष आढळून आले होते. फेरफार नोंदीचे ७०० अर्ज प्रलंबित, उशिराने नोंद घेणे, फेरफार करणे, विलंब शुल्क न आकारणे, अशा अनेक त्रुटींचा त्यामध्ये समावेश होता. याशिवाय तलाठी कार्यालयातील काम करून देण्यासाठी नागरिकांकडून आर्थिक स्वरूपाची मागणी करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीस न बजावणे, आदेशांचे पालन न करणे, असे अनेक गंभीर दोष आढळून आल्याचे प्रांतानी दिलेला आदेशात नमूद केले आहे. 


१३ लाखांच्या शासकीय वसुलीत अपहार 
धरणगाव तालुक्यात असताना शासकीय वसुलीचे १५ लाख रुपयांचा अपहार केला आहे. हा निधी त्याने स्वखर्चासाठी वापरलेला आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या दप्तर तपासणीमध्ये हे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे मी केलेल्या तपासणीमध्येही हा प्रकार आढळून आला. त्याने ही वसुली भरलेली नसल्याचे उपविभागीय अधिकारी पाटील यांनी सांगितले. लांबोळे याची पूर्वपीठिका अत्यंत वाईट असल्याचेही समोर आले आहे. याप्रकाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली हाेती. तसेच नागरिकांनी याविषयी नाराजी देखील व्यक्त केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...